गाणगापुरातील अष्टतीर्थांचे महत्त्व
गाणगापुरातील अष्टतीर्थांचे महत्त्व अनन्य साधारण आहे.
आठ वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या या तीर्थांना खालीलप्रमाणे क्रमाने जाऊन स्नान व दर्शन करता येतात.
१. षटकुळ तीर्थ २. नरसिंह तीर्थ ३. भगीरथी तीर्थ ४. पापविनाशी तीर्थ
५. कोटी तीर्थ ६. रुद्रपाद तीर्थ ७. चक्र तीर्थ ८. मन्मथ तीर्थ
काशी, गया व प्रयाग या तीनही ठिकाणी तीर्थयात्रा केल्यावर जे पुण्य प्राप्त होते, ते पुण्य या अष्टतीर्थात स्नान केल्याने प्राप्त होते. येथे स्नान केल्याने भक्तगणांमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण होतो. तर पाहूया अष्टतीर्थांची माहिती.
१. षटकूळ तीर्थ
षटकुळ तीर्थात स्नान केल्याने प्रयागस्नानाचे फळ मिळते आणि अपमृत्यु टळतो. कारण पूर्वी जालंधर नावाच्या दैत्याने देवांचा पराभव केल्याने पुष्कळ देव मरण पावले होते. त्यांच्या संजीवनीत अमृत देत असताना काही भाग सांडून त्याचा जो प्रवाह झाला तीच ही अमरजा नदी होय.
२. नरसिंह तीर्थ
नरसिंह तीर्थात स्नान करून संगमेश्वराची पूजा केल्यास श्रीशैल मल्लिकार्जुन ची पूजा केल्याचे फळ मिळते आणि आपले मनोरथही पूर्ण होतात. हे तीर्थ संगमावरील देवळासमोर आहे.
३. भागीरथी तीर्थ
भागीरथी तीर्थावर स्नान केल्यास माणिकर्णिकेवर स्नान केल्याचे पुण्य मिळते. कारण पूर्वी एका शिवभक्ताने शंकरास प्रसन्न करून वर मागितला होता कि आपणास दररोज माणिकर्णिकेत स्नान व श्री विश्वेश्वरय्याचे दर्शन घडले पाहिजे. त्यावर तथास्तु म्हणून शंकर गुप्त झाले आणि त्या ठिकाणी एक कुंड व महादेवाची मूर्ती प्रकट झाली. तेथून निघालेला प्रवाह भीमा नदीस मिळाला आहे. पंढरपूरचे आराध्ये आणि बडवे हे त्याच शिवभक्तांची वंशज असल्यामुळे ते काशीस न जाता येथेच काशीचे सर्व विधी पार पाडतात.
४. पापविनाशी तीर्थ
पापविनाशी तीर्थात स्नान केल्यावर माणूस सर्व पापांतून मुक्त होतो. महाराजांच्या पुर्वाश्रमातल्या भगिनी रत्नाबाई यांचा कुष्ठरोग व कातडीचे विकार पापविनाशी तीर्थात स्नान केल्यानंतर इथेच बरे झाले.
५. कोटी तीर्थ
कोटी तीर्थात स्नान केल्याने जंबूद्विपातील सर्व तीर्थांचे स्नान केल्याचे पुण्य मिळते. येथील एक दान हे प्रत्येकी कोटी दानासारखे असते.
६. रुद्रपाद तीर्थ
रुद्रपाद तीर्थात स्नान केल्यास गया स्नानाचे पुण्य प्राप्त होते. येथे विष्णुपाद असून गयेतील प्रथेप्रमाणे क्षौर-श्राद्ध विधी येथे करतात.
७. चक्रतीर्थ
चक्रतीर्थात स्नान केल्यास द्वारावती तीर्थात स्नान केल्याच्या चौपटीने पुण्य मिळते. त्यात अस्थी टाकल्यास त्या चक्रवर्ती होतात.
८. मन्मथ तीर्थ
कल्लेश्वर देवस्थानाच्या समोर मन्मथ तीर्थ आहे. या ठिकाणी स्नान करून श्री कल्लेश्वराची पूजा केल्यास गोकर्ण तीर्थ स्नानाचे फळ आणि महाबळेश्वराचे अर्चन पुण्य मिळते.
कल्लेश्वर नावाचे हे देवस्थान गाणगापूरच्या पूर्वेला २०० मीटरवर आहे. या ठिकाणी नृसिंह सरस्वतींनी अनेक लीला केल्या, ज्या सर्वश्रुत आहेत. नरकेसरी नावाचा एक वृद्ध कल्लेश्वराशिवाय इतर कोणत्याही देवाला मानत नसे. कल्लेश्वराशिवाय इतर कोणत्याही देवाची उपासना करीत नसे. श्री नृसिंह सरस्वतीला हे समजल्यावर त्यांनी नरकेसरीला स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला आणि दाखवून दिले कि बाह्य रूप जरी वेगळे असले तरी परमेश्वर एकच आहे. येथेच घडतो द्वैत अद्वैत चा साक्षात्कार.
___________________________________________________________________________________
अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.
ब्लॉग शेअर करा -
श्री गुरु देव दत्त :- मुख्य ब्लॉग ला जाण्यासाठी या वाक्यावर क्लिक करा.
ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com
______________________________________________________________________________________________________________________________________________________________________