श्री रामचंद्रांचा मृत्यू
श्री रामचंद्रांनी अयोध्येवर अनेक वर्ष राज्य केले. प्रभूला आपले अवतारकार्य संपविण्याची आठवण राहिली नाही. सर्व देव चिंतातुर झाले. भगवान विष्णूंना परत आणणे गरजेचे होते. सर्व देव यमराजाकडे गेले व ही कामगिरी सोपविली. पण यमाने हे कार्य करण्यास स्पष्ट नकार देऊन जोपर्यंत हनुमान अयोध्येत आहेत, तोपर्यंत मी त्या नगरीत पाऊलही टाकू शकत नाही, असे सांगितले. शेवटी सर्व देवांनी ही जबाबदारी काळावर सोपविली. परंतु काळालाही हनुमंताची भीती होती. म्हणून त्याने साधूचा वेष धारण केला आणि दुर्वास ऋषींना बरोबर घेऊन अयोध्येला आले.
काळ राजवाड्यात आला व त्याने रामरायाला भेटण्याची इच्छा प्रकट केली. रामरायाची भेट झाली. रामरायानी त्याला ओळखिले. काळाने एकांतात बोलण्याची विनंती केली. रामरायानी त्याला महालाच्या एका खोलीत नेले. लक्ष्मणाला दारात पहारा देण्यासाठी उभे केले आणि कोणालाही आत न सोडण्याची आज्ञा दिली व आज्ञा मोडणाऱ्याला मृत्यूदंड दिला जाईल असे बजावले. लक्ष्मण पहारा देत उभे राहिले.
एकांतात काळाने रामरायाला आपले अवतार कार्य संपविण्याची विनंती केली व प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाला मृत्यू अटळ आहे या सत्याचीआठवण करून दिली. रामरायानी आपली विवशता बोलून दाखविली. लक्ष्मण व हनुमंत यांच्या भक्तीने मी भांडला गेलो आहे, ते मला अवतार संपवू देणार नाहीत. त्यावर काळाने लक्ष्मणाला बाजूला करण्याची जबाबदारी ऋषी दुर्वासांनी घेतल्याचे सांगून तुम्ही हनुमंताला बाजूला करा अशी विनंती केली. रामरायानी त्याला शब्द दिला.
तोपर्यंत ऋषी दुर्वास तेथे आले. दारावर पहारा देत असलेल्या लक्ष्मणाला त्यांनी रामास भेटायचे आहे असे सांगितले. लक्ष्मणाने त्यांना नकार देत रामरायाची आज्ञा सांगितली. पण ऋषी दुर्वासांनी अत्यंत क्रोधीत होऊन आपली भेट नाकारणाऱ्या रामरायास आता मी शापच देतो असे म्हणू लागले. लक्ष्मणापुढे धर्मसंकट उभे राहिले. ऋषींना आत जाऊ द्यावे तर बंधू आज्ञेचे उल्लंघन होईल व मृत्यूदंडाला सामोरे जावे लागेल, नाही जाऊ दिले तर पितृतुल्य बंधूस ऋषी शाप देतील.शेवटी लक्ष्मणाने मृत्यूला सामोरे जायचे ठरविले. रामाला विचारून येतो असे सांगून लक्समण महालात आले. इकडे ऋषी दुर्वास गुप्त झाले. लक्ष्मणाला पाहताच रामाने आपल्या आज्ञेची आठवण करून दिली. परंतु ऋषी दुर्वास आल्यामुळे आज्ञेचा भंग करावा लागला, असे लक्ष्मणाने सांगितले. रामाने त्याला मृत्यूदंड घेण्यास सांगितले. अयोध्येच्या बाहेर निघून जा हाच तुला मृत्यूदंड आहे, असे सांगितले. प्रत्यक्ष काळाला समोर बसलेला पाहून लक्ष्मण काय समजायचे ते समजला. तो राजमहालाच्या बाहेर पडून शरयू नदीच्या तीरावर गेला. शरयू नदीत आपला देह त्यागून आपल्या मूळ रूपात पुन्हा शेषनाग होऊन रामाच्या येण्याची वाट पाहत बसला.
इकडे रामाचा काळाने निरोप घेतला. रामराया खोलीच्या बाहेर आले. हातातली अंगठी महालाच्या दोन दगडी फरश्यांमध्ये एक लहान फट होती, त्यात टाकली. हनुमंताला बोलावून अंगठी अडकल्याचे सांगितले. हनुमान अंगठी काढू लागले. पण फट लहान असल्याने काही केल्या अंगठी निघेना. हनुमंत सुक्ष्म रूप धारण करून त्या फटीत गेले, पण त्या फटीतून हनुमंत थेट पाताळात गेले.
इकडे लक्ष्मणाचा वियोग सहन होत नाही, आपणही शरयूतीरावर आत्मसमर्पणासाठी जात आहोत, असे सांगून प्रभू शरयूतीरी जाण्यास निघाले. सर्व प्रजाजन शोक करू लागले विनवू लागले, पण प्रभू शरयूतीरी जाऊन लक्ष्मण गेलेल्या वाटेने आत जाऊन गुप्त झाले. इकडे पाताळात गेलेल्या हनुमंताला पाताळातील देवांनी सांगितले, समोर पडलेल्या अंगठीच्या ढिगाऱ्यातील प्रभुंची अंगठी ओळखूंन घेऊन जा. अंगठीचा ढिगारा खूप मोठा व सगळ्या अंगठ्या प्रभूच्याच होत्या. हनुमंत त्यातील प्रभूंची अंगठी शोधत होते. तेव्हा देवांनी प्रभूच्या अवतार समाप्तीचा अर्थ सांगितला. हे ऐकताच हनुमंत वायुवेगाने पृथ्वीतलावर येऊन शरयूतीरी गेले. तेथे शोकमग्न नगरवासीयांसहित प्रभूचा धावा केला. प्रभूंनी शेषशायी भगवान विष्णूच्या रूपात सर्व नगरजणांना व हनुमानाला दिव्य रूपात दर्शन दिले व श्री रामाच्या रूपातील अवतार कार्य संपविले.
______________________________________________________________________________________________________________________
अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.
ब्लॉग शेअर करा -
ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com
______________________________________________________________________________________________________________________
______________________________________________________________________________________________________________________