निर्गुण पादुका

 

निर्गुण पादुका




            दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे. अवतार समाप्तीच्या वेळी श्री नृसिंह सरस्वतींनी भक्तांसाठी दिलेला हा प्रसादच आहे. भीमा नदीमधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त झाल्यावर सर्व भाविकांना या पादुकास्थळी श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी दर्शन दिले. गाणगापूर येथील पादुकांना निर्गुण पादुका म्हटले जाते. येथील पादुकांना केवळ अष्टगंध व व केशराचे लेपण केले जाते. कुठल्याही प्रकारे पाणी स्पर्श करीत नाही. या पादुका चाल असून त्या  त्यांच्या आकाराच्या संपुटात ठेवल्या जातात. संपुटांतून त्या बाहेर काढल्या जात नाहीत. संपुटांना झाकणे आहेत व पूजेच्या वेळी झाकणे काढून आतच लेपनाविधी होतो व अन्य पंचोपचारासाठी ताम्हणात उदक सोडतात.

।। प्रसिद्ध आमचा गुरु जगी नृसिंह सरस्वती,  विख्यात ज्यांचे  स्थान  गाणगापूर ।।

            भीमा-अमरजा संगमात असलेल्या श्री क्षेत्र गाणगापूर ला भक्तांचे पंढरपूर देखील म्हणतात. हजारो भक्त येथे रोज दर्शनासाठी येत असतात. हे स्थान अत्यंत जाज्वल्य आहे. या जागृत स्थानात सर्व तऱ्हेचे पावित्र्य सांभाळावे लागते. भगवान दत्तात्रयांचे तृतीय अवतार श्री नृसिंह सरस्वती यांचे येथे तब्ब्ल २३ वर्षे वास्तव्य होते. या वास्तव्यात त्यांनी या क्षेत्री अत्यंत अविस्मरणीय अशा अनेक लीला केलेल्या आहेत. निर्गुण पादुकांच्या द्वारे त्यांचे येथे अखंड वास्तव्य आहे. आज श्री क्षेत्र गाणगापूरास जेथे निर्गुण मठ आहे, त्या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती निवासास होते. तेथे आज श्रींच्या निर्गुण पादुका प्रतिष्ठापित आहेत. तेथे खाली एक तळघर आहे. ज्या गुहेत स्वामीमहाराज रोज ध्यानासाठी बसत असत, ती गुहा बंद केली आहे. पण पूर्वीचे पुजारी सांगतात श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी त्याठिकाणी स्वहस्ते श्री नृसिंह यंत्राची स्थापना केलेली आहे. तसा उल्लेख जुन्या नोंदीतही आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे शिष्य श्री सरस्वती व भास्कर स्वामिनी श्रीशैलगमत गेल्यावर बराच काळ त्या जागेवर राहून पूजाही करत होते. पुढे महाराजांच्या आज्ञेने ती गुहा चिणून बंद करण्यात आली. श्री नृसिंह सरस्वती गुप्त झाल्यानंतर अनेक महान भक्तांच्या वास्तव्याने ही भूमी अधिकच पवित्र बनली आहे. येथे सेवा केल्याने लाखो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आहेत. पिशाच्च विमोचनाचे तर हे महतीर्थच आहे. श्रद्धाळू भाविकांना येथे आजही साक्षात्कार दर्शन होते. तसे दर्शन झालेले काही विद्यमान महाप्रभूंच्या आज्ञेने जगाला सन्मार्ग दाखवीत आहेत.
            निर्गुण पादुका हे मंदिर गाणगापूर गावाच्या मध्यभागी आहे. या मंदिराची बांधणी नेहमीच्या मंदिराप्रमाणे नसून धाब्याच्या मोठ्या वाड्याप्रमाणे आहे. वाड्याच्या पूर्वेस व पश्चिमेस दोन महाद्वारे आहेत. पश्चिम महाद्वारावर नगारखाना असून तो त्रिकाल पूजेच्या वेळी वाजविला जातो. नव्याने बांधण्यात आलेले महाद्वार पादुका मंदिराची शोभा वाढविते. श्री निर्गुण मंदिराच्या पूर्वेस महादेव, दक्षिणेस औदुंबर असून खाली गणपती व पार्वती यांच्या मूर्ती आहेत. पश्चिमेस अस्वय्या वृक्ष असून वृक्षाभोवताली नागराज, मारुती व तुळशीवृंदावन आहेत. मठात मंदिर सेवेकऱ्यांच्या अनुष्ठानासाठी एकूण तेरा ओवऱ्या आहेत. त्यापैकी पाच पूर्वेस, सात उत्तरेस व एक पश्चिमेस आहे. मठाच्या दक्षिण बाजूस श्री गुरुपादुकांचा गाभारा असून तो उत्तराभिमुख आहे. त्यासमोर एक प्रशस्त सभामंडप आहे. गाभाऱ्याला फक्त उजव्या हातालाच एक दरवाजा आहे. आत पश्चिमेकडील कोनाड्यात चिंतामणीची एक मूर्ती आहे. ही गणपतीची मूर्ती वालुकामय असून ती स्वतः नृसिंह सरस्वतींनी स्थापन केली आहे. या  गणेश मंदिरासमोर  दक्षिण बाजूस एक लहान दरवाजा असून तो पाश्चिमाभिमुख आहे. या  दरवाजातून ओणव्याने आत प्रवेश केल्यावर समोरच्या भिंतीला एक लहानसा झरोका दृष्टीला पडतो. या झरोक्यातून आत डोकावल्यानंतर समोर त्रिमूर्तींचे दर्शन घडते. ही मूर्ती आसनस्थ असून पश्चिमाभिमुख आहे. या त्रैमूर्तींच्या आसनावरच श्री गुरूंच्या निर्गुण पादुका ठेवलेल्या आहेत. या पादुका सुप्पा व चल असून त्या खास वैशिष्टयपूर्ण अशा आहेत. त्या अन्यत्र आढळणाऱ्या पादुकांप्रमाणे पावलांच्या आकाराच्या नसून गोल आकाराच्या असून तांबूस काळसर रंगाच्या आहेत. या दिव्य शक्तीने भारलेल्या आहेत.
            श्री नृसिंह सरस्वती महाराज हे ज्यावेळी श्रीशैल यात्रेस निघाले, त्यावेळी सर्व भक्तांच्या व शिष्यांच्या आग्रहास्तव प्रार्थनेवरून आपल्या निर्गुण पादुका येथे ठेवल्या. त्या पादुकांना सगुण आकार असूनही त्यांना निर्गुण पादुका म्हणतात. कारण आपण आपल्या मनातील संकल्प ज्यावेळी या ठिकाणी सांगतो, त्यावेळेस दत्तप्रभू आपले काम या पादुकांद्वारा करतात. दर्शन सगुण असले तरी कार्य करणारी परमेश्वरी शक्ती हि निर्गुण व निराकारी असते. म्हणूनच या पादुकांना निर्गुण पादुका असे म्हणतात. भक्त कल्याणार्थ ठेवलेल्या या पादुकांमुळे लाखो भक्तांची संकटातून मुक्तता झाली आहे. 



==========================================================================




___________________________________________________________________________________

अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.

ब्लॉग शेअर करा - 

                                 

श्री गुरु देव दत्त :- मुख्य ब्लॉग ला जाण्यासाठी या वाक्यावर क्लिक करा

ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com

______________________________________________________________________________________________________________________________________________________________________

फॉलोअर