देवी सीतेची जन्मकथा
वेदवती नावाची भगवान विष्णूची एक परमभक्त होती. विष्णूवर तिचे प्रेम जुळल्याने त्याची पत्नी होण्याची जबरदस्त इच्छा तिने बाळगली होती. त्यांना प्रसन्न करण्यासाठी तिने एका अरण्यात घनघोर तपस्या केली. एक दिवस रावण असाच जगंलात फेरफटका मारण्यासाठी निघाला असता त्याचे लक्ष तपस्या करीत असलेल्या सुंदर आणि लावण्यवती अशा वेदवतीकडे केंद्रित झाले. तिचे सौदर्य पाहून रावण तिच्यावर मोहित झाला. त्याने तिला तू माझी पत्नी हो असे सांगितले. वेदवतीने विष्णूला मनाने केव्हाच पती म्हणून स्वीकारले होते. त्यामुळे तिने रावणाला स्पष्ट नकार दिला. रावणाला तो भयंकर अपमान वाटला. त्याच्या पराक्रमाचा अहंकार आणि लंकापती असून नकार दिल्याने त्याच्या अंगाचा तिळपापड झाला. शेवटी जबरदस्तीने रावणाने तिचा हात धरला. रावण अतिप्रसंग करीत आहे, हे तिच्या लक्षात आले. तिने रावणाला तू माझ्या मार्गात येऊ नको असे सांगितले. याचा रावणावर तिळमात्र परिणाम झाला नाही. शेवटी वेदवती रागाने एखाद्या निखाऱ्यासारखी लालबुंद झाली. पुढील जन्मी तुझी मुलगी म्हणून जन्म घेईन व तुझ्या मृत्यूचे कारण बनेन, असा शाप देऊन क्षणार्धात भस्म झाली.
कालांतराने मंदोदरी गर्भवती होते. रावणाला खूप आनंद होतो. मन्दोदरीला कन्यारत्न झाल्याची बातमी रावणाला समजते. त्याच वेळेस आकाशवाणी होते, हि पुत्री तुझ्या मरणाचे कारण बनेल. रावणाला लगेच वेदवतीच्या शापाची आठवण होते. रावण त्या कन्येला मन्दोदरीच्या इच्छेविरुद्ध नोकराकरवी दूर समुद्रात फेकतो. वरूण देवतेला ही कन्या साक्षात लक्ष्मी असल्याचे समजते. त्यामुळे समुद्रदेवता पृथ्वी मातेला या कन्येला आपल्या कवेत सामावून घेण्याची विनंती करते. त्यानुसार पृथ्वीमाता कन्येला आपल्या उदरात सामावून घेते. ती पृथ्वीमाता म्हणजे मिथिला नगरीतील एक शेत असते. कालांतराने राजा सीरध्वज जनक एकदा दुष्काळ पडल्याने शेतकऱ्याच्या समृद्धीसाठी पर्जन्य यज्ञ करतो. त्या यज्ञाची सांगता म्हणून राजाला स्वतः नांगर चालवावा लागतो. राजाला शेत नांगरताना जमिनीत एक मोठी पेटी सापडते. त्यात एक कन्या असते सीरध्वज जनक याने तिला दत्तक कन्या म्हणून वाढविले. ती शेतात सापडल्याने तिचे नाव सीता ठेवले. पूर्व तपस्येनुसार उपवर झाल्यावर तिचा विवाह स्वयंवर पद्धतीने सूर्यवंनशी राजपुत्र प्रभू श्री रामचंद्र यांच्याशी झाला. रावणाने सीतेचे हरण केल्यावर प्रभू श्री रामचंद्रांनी युद्ध करून रावणाचा वध केला. अशा तह्रेने देवी वेदवती रावणाच्या मृत्यूचे कारण बनली.
___________________________________________________________________________________
अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.
ब्लॉग शेअर करा -
ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com
______________________________________________________________________________________________________________________________________________________________________