मंचकी निद्रा
आई तुळजाभवानी हि वर्षातून २१ दिवस निद्रा घेते. उरलेले ३४४ दिवस देवी अष्टोप्रहर जागरूक असते. निद्रासमयी देवीला १०८ साड्यांच्या वेष्टनात ठेवले जाते व विधीवत मंचकावर निद्रेसाठी ठेवले जाते. सुवासिनी एकमेकींना हळदकुंकू लावून देवीच्या गादीचा कापूस वेचतात, पिंजतात त्यानंतर नवीन कपड्याने तयार केलेल्या गादीच्या खोलेमध्ये हा कापूस भरला जातो. मातेचे शेजघर स्वच्छ केले जाते. चांदीच्या पलंगावर नवार बांधून पलंगावर ३ गाद्या, ३ लोड ठेवण्यात येतात.पंलगपोस लावून बाजूला मखमली पडदे लावण्यात येतात. पतंगे कुटुंबीयांना देवीचे शेजघर तयार करण्याचा मान आहे. पंचामूर्ताने देवीचा अभिषेक करून वाघे कुटुंबीयांकडून आलेली हळद म्हणजे भंडारा मूर्तीला लावून त्यानंतर भोपे [ पुजारी ] देवीची मूळ मूर्ती उचलून हातावर शेजघरात आणतात आणि चांदीच्या पलंगावर मूर्ती निद्रिस्त करून धुपारती केली जाते. त्यानंतर प्रभाळ पूजा केली जाते.
देवीची मंचकी निद्रा वर्षातून ३ वेळा विभागलेली आहे. देवीची निद्रा ही १.घोरनिद्रा ,२. श्रमनिद्रा, आणि ३. मोहनिद्रा अशी ३ विभागात विभागलेली आहे . निद्रेच्या काळात मातेला सकाळ , संध्याकाळ सुगंधीत तेलाचा अभिषेक केला जातो.
नवरात्रीच्या आधी महिषासुराचा वध करण्यापूर्वी देवी योगनिद्रेत होती. वाढत्या अत्याचारामुळे ब्रह्मा, विष्णु , महेश यांनी देवीला आठ दिवसात योगनिद्रेतून उठवून भक्तांचे रक्षण करण्याची विनंती केली. या निद्रेतून जागे होऊन देवीने घोर रूप प्रकट केले म्हणून या निद्रेला घोरनिद्रा म्हणतात. त्यानंतर देवीने महिषासुराचे चाललेले धर्मावरील कारस्थाने पाहून युद्धास तयार झाली व नऊ दिवस असुरासोबत युध्द केले व नवव्या दिवशी असुर शरण आला व युध्दामुळे देवीला थकवा आल्यामुळे शारदीय नवरात्रानंतर ५ दिवस देवी निद्रेत जाते. त्या निद्रेला श्रमनिद्रा असे म्हणतात. या निद्रेसाठी देवीचे माहेर असलेल्या नगरहून नवीन पलंग येतो त्यावर देवी निद्रा घेते. त्यानंतर शाकंबरी नवरात्राच्या दरम्यान पौष शुद्ध प्रथमा ते अष्टमी या काळात देवी निद्रिस्थ असते. देवीची निद्रा ही सृजनाची प्रतीक असून ९ व्या दिवशी प्रकटदिन असतो. त्यामुळेच या निद्रेला मोहनिद्रा असे म्हणतात. हे नऊ दिवस म्हणजे नऊ महिन्याचे सूचक आहे.
अवघ्या विश्वाचा भार सोसणारी देवी ही गादीवर झोपलेली असते म्हणून पुजारी,भक्तगण गादी त्या काळात वापरीत नाहीत. त्यानंतर दुपारी तुळजाभवानी मातेची १२ वाजता घटस्थापना केली जाते व शारदीय नवरात्राला प्रारंभ होतो.
___________________________________________________________________________________
अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.
ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com
______________________________________________________________________________________________________________________________________________________________________