युगपुरुषाचा जन्म


युगपुरुषाचा जन्म

                    शेटफळ नावाचे मान प्रदेशातील जेमतेम चारपाचशे घराचे दुष्काळी गाव होते. कुलकर्ण्यांच्या कुटूंबातील लेक बाळंतपणासाठी माहेरी आलेली. दिवस भरत आलेले.  कोणत्याही वेळेस ती बाळंत होईल.  अशा अवघडलेल्या अवस्थेत गावात ना दवाखाना ना हॉस्पिटल.  बहुतेक बाळंतपण घरीच व्हायचे.  गावातील अनुभवी सुईण करीत असे.  अंधाऱ्या खोलीत ती माऊली कळांनी  तडफडत होती.  घरातील आया बाया 'धीर धर, धीर धर, थोडी कळ सोस, जरा नेट लाव' असे सल्ले देत होत्या.  कोणी पाय चोळत होत्या, कोणी घामाने थबथबीत कपाळ पुसत होत्या, कोणी तिला धीर देत होत्या.  नऊ महिने आईच्या कुशीत वाढलेला तो इवलासा जीव या विश्वाच्या अफाट पसाऱ्यात दाखल झाला, पण त्या जिवाने ना तोंडाने हू कि चू केले, ना तो रडला.  बाळंतपण करण्यासाठी जमलेल्या बायांच्या मनात पाल चुकचुकली.  सुईण चिमटे काढतीय, डोक्यावर थापटा मारतीय, इवलेसे बोट धरून ओढतीय, पण बाळ हू कि चू करत नव्हतं.  सगळ्याची खात्री पटली मेलेले पोरच जन्माला आलेले आहे.  त्या जिवाच्या आईला  ग्लानीत असल्यामुळे काय होतंय याचा अंदाज नव्हता.  'माझं बाळ, माझं बाळ' असा आवाज अर्धवट शुद्धीत असलेल्या आईच्या तोंडातून अस्पस्ट येत होता.  आजीने तोंडाला पदर लावला.  तिच्या तोंडातून एक हुंदका बाहेर पडला.  बाकीच्या बायकांनीही डोळ्याला पदर लावला.  आजी बाळंतिणीच्या अंधाऱ्या खोलीतून जड पावलांनी बाहेर ओटीवर आली.  रामाला हाक मारून त्याच्या कानात काहीतरी सांगितले.  रामाने कोपऱ्यातील फावडे उचलले आणि गावकुसाबाहेर खड्डा  खणण्यासाटी बाहेर पडला.  बाकीच्या पुरुषमंडळींना न सांगताच काय घडले याचा अंदाज आला.  'परमेश्वराची इच्छा' असे म्हणत त्यांनी सुस्कारे सोडले. आजी परत बाळंतिणीच्या खोलीत आली.  तिन मन घट्ट करून तो नवजात मुटकुळं उचललं आणि बाहेर ओसरीवर बसलेल्या आजोबाच्या हातात देण्यासाठी वळली, तोच बाळाची आई शुद्धीवर आली आणि 'कुठे न्हेताय माझ्या बाळाला, मला त्याला पदराखाली घेऊ द्या' असे ओरडली.  हातात घेतलेल्या त्या जिवाकडे पाहून आजीनं हंबरडा फोडला.  म्हणाली "बने पदराखाली कशी घेते.  पोर जिवंत नाही"  या वाक्यावर आईने टाहो फोडला व ती हमसाहमशी रडू लागली.  आजोबा बाळंतिणीच्या खोलीच्या दाराशी येऊन उभे राहिले.  आजी पुढील क्रियाकर्म करण्यासाठी तो निपचित जीव आजोबाच्या हातात देऊ लागली, एव्हढ्यात सुईण आजीला म्हणाली "आजे पोर जरा माझ्याकडे दे.  कायतरी बला आहे" कसली बला न काय आमचं नशीब फुटकं.  पहिल्या पोरीच्या पाठीवर पोरगा झाला आणि वाटले विठ्ठलच पावला.  पण तो कसला पावतोय.  जन्मला तोच निघून गेला, हाती राहील ते नुसते कलेवर.  "आजे थांब.  जरा पोर जित असणार.  त्याच अंग अजून गरम लागतंय.  दे माझ्याकडे" असे म्हणून सुईणीने तो जीव आजीच्या हातातून उचलून घेतला.  कुठला जिता आलाय, पोर जन्माला आला कि पहिलं रडतयं, हातपाय झाडतय, हे जन्मताच गप्पगार.  सुईणीने  ते बाळ  शेगडीजवळ दोन पायांच्या झोळीत घेतले डाव्या हाताने उजव्या हातातील काचेच्या बांगड्या मागे सारल्या.  पुढची एक बांगडी मनगटाजवळ आणून भुईवर आपटली.  त्यातील एका तुकड्याने त्या जिवाच्या शरीरावरचा तलम पातळ पापुद्रा बाजूला केला.  बोटाने तोंडातला चिकटा बाहेर काढला.  मोठा श्वास घेत दोन्ही गाल फुगवून कानात मोठी फुंकर मारली आणि जवळच्या शेगडीतल्या निखाऱ्याचा एक बारीक तुकडा चिमट्याने उचलला आणि काही मिनिटांपूर्वी जन्मलेल्या त्या कोवळ्या जिवाच्या तळपायावर हळूच टेकवला.  त्या जिवाने झटका देऊन पाय झाडला आणि जिवाच्या आकांताने रडायला सुरु केले. अंधाऱ्या खोलीत घुमलेला तो आवाज बाहेर ओसरीवर गेला.  माना खाली घालून बसलेल्या पुरुष मंडळींच्या माना झटका बसाव्या तशा वर झाल्या.  नजरा आतल्या खोलीकडे वळल्या.  आजीचे डोळे आश्चर्याने विस्फारले.  तिचा चेहरा आनंदाने फुलला.  आईच्या गालावर आसवं ओघळली.  सुईणीने बाळ आईच्या हातात सोपविले आणि तिन त्या जीवाला पदराखाली घेतलं.  जर त्या सुईणीला बाळ जिवंत आहे अशी शंका आली नसती आणि रामाने खणलेल्या खड्ड्यात तो जीव मातीखाली मातीशी एकरूप झाला असता, तर आपण 'आधुनिक वाल्मिकी, शब्धप्रभू, महाकवी, अलौकिक महाकाव्य गीत रामायण, अनेक सुमधुर गीते-भावगीते, कथा, पटकथा आणि ग दि माडगूळकर अर्थात 'गदिमा' या तीन अक्षरांना कायमचे मुकलो असतो.  साक्षात सरस्वतीचा वरदहस्त असलेला मराठी भाषेचा हा इतिहास घडविणारा युगपुरुष जन्माला यावा, हि प्रभू श्री रामचंद्रांची इच्छा होती, असे म्हणावे लागेल.




ग. दि. माडगुळकर



___________________________________________________________________________________

अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.

ब्लॉग शेअर करा - 

                                 

ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com

______________________________________________________________________________________________________________________________________________________________________

फॉलोअर