गांधारीचा शाप
आपल्या भारत देशाला अतिशय प्राचीन असा इतिहास आहे. आज आपण जितका भारत पाहतो, तो अनेकवेळा विभागून शिल्लक राहिलेला आहे. प्राचीन भारत हा भरपूर लांबपर्यंत पसरलेला होता. प्राचीन भारताचे अनेकवेळा विभाजन होऊन अफगाणिस्तान, नेपाळ, पाकिस्तान, तिब्बेट, भूतान, बांगलादेश, ब्रह्मदेश असे अनेक देश तयार झालेत. हे सर्व देश पूर्वी भारत देशातील फक्त लहान लहान राज्ये होती.
तर आज आपण ज्या ठिकाणाची कथा जाणून घेणार आहोत, त्याचे नाव आहे 'गांधार'. प्राचीन भारताच्या वायव्य दिशेला असलेले गांधार राज्य आज 'कंधार' म्हणून ओळखले जाते. गांधारातून कंधार कसे झाले या बाबत वेद व्यासजीच्या महाभारतात बरेच काही सांगितले आहे.
सुमारे ५५०० वर्षांपूर्वी राजा सुबल हे गांधारवर राज्य करायचे. त्याच्या मुलीचे नाव गांधारी होते. गांधारीचा विवाह हस्तिनापूरचे राजकुमार धृतराष्ट्राशी झाला होता. गांधारीला शकुनी नावाचा भाऊ होता. वडिलांच्या मृत्यूनंतर संपूर्ण राज्य शकुनीच्या हातात आले. जेव्हा भीष्माने राजा सुबलच्या पूर्ण कुटूंबाचा नाश केला होता, तेव्हा त्याचा बदला घेण्यासाठी शकुनीने कौरव आणि पांडवांना आपापसात लढवून संपूर्ण हस्तिनापूर नष्ट करण्याचा कट रचला होता. आपल्या १०० पुत्रांना गमविल्यानंतर गांधारीला फार दुःख झाले होते. आपल्या १०० पुत्रांचा मृत्यू ज्या युद्धात झाला, त्या युद्धाला संपूर्णपणे आपला भाऊ शकुनीच कारणीभूत असल्याने तिला शकुनीवर अनावर होईल इतका क्रोध आला. त्या क्रोधाच्या आवेशात येत गांधारीने शकुनीला शाप दिला "गांधार राजा, ज्याने माझ्या १०० पुत्रांची हत्त्या केली, त्या तुझ्या राज्यात कधीही शांतता राहणार नाही."
त्यानंतर गांधार राज्यात आजपर्यंत कधीही शांतता टिकली नाही. महाभारताच्या युद्धात हरल्यानंतर कौरवांचे शेकडो वंशज आपल्या मामाच्या प्रांतात म्हणजे गांधारमध्ये आश्रय घेऊन राहू लागले. तेथून ते नंतर पुढे आजच्या काळातील इराक व सौदी अरेबियात गेल्याचेही उल्लेख आहेत. नंतरच्या काळात तेथे मौर्य साम्राज्याने राज्य केले. या काळात येथे बौद्ध धर्माचा मोठा प्रसार झाला. यानंतर येथे मुघलांचा हल्ला झाला. ११ व्या शतकात गजनीने या भागावर ताबा मिळविला. पुढे ब्रिटिशांनी आक्रमण केले. नंतर सोव्हिएत युनियनचे सैन्य येथे घुसले. नंतर तालिबानने हा भाग आपल्या ताब्यात घेतला. मग अमेरिकी सैन्याने तालिबानी दहशतवाद्यांशी सामना करून हा भाग ताब्यात घेतला आणि आता तालिबानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे.
गांधारीच्या त्या शापाची पुन्हा चर्चा सुरु आहे. 'गांधारीच्या शापातून गांधार अद्याप वरती आलेला नाही' असे म्हणतात.
___________________________________________________________________________________