मांडव्य ऋषींचा शाप
महाभारत काळात खांडववनात मांडव्य नावाचे ऋषी रहात होते. एक दिवस ते
आपल्या आश्रमात ध्यानधारणेत मग्न होते. इतक्यात काही लोक आश्रमात घुसले व 'आमच्या मागे लुटारू लागले
आहेत' असे
सांगू लागले. मांडव्य ऋषींनी त्यांना आश्रय दिला खरा, परंतु आश्रय दिलेले ते लोकच
खरे लुटारू होते. त्यांनी राज्यातील एका जवाहिऱ्याच्या दुकानात दरोडा टाकला होता. त्यांचा
पाठलाग राजाचे शिपाई करीत होते. पाठलाग करता करता शिपाई आश्रमात घुसले. दरोडेखोरांना
शिपाई आल्याची चाहूल लागताच सर्व चोरीचे दागदागिने, हिरे-मोती टाकून ते पळून गेले. शिपायांना ही माणसे
ऋषीचीच आहेत असे वाटल्यामुळे ऋषींना पकडून राजाकडे घेऊन गेले.
राजाने ऋषींना
विचारल्यावर ऋषींनी ती माणसे आपली नाहीत असे सांगितले. ऋषी खोटे बोलत आहे असे
समजून राजाने चोरी केल्याबद्दल दोषी ठरवून वध स्तभांवर मृत्युदंडाची शिक्षा द्यावी
असे सुनावले. ऋषींना सुळावर चढविले गेले. पण सूळ अंगात घुसल्यावर देखील ऋषींना काही फरक
पडला नाही. सेवकांनी राजाला जेव्हा ते तपस्वी मांडव्य ऋषी असल्याचे सांगितले, तेव्हा राजाला आपली चूक
लक्षात आली. त्याने ऋषींची क्षमा मागून तुरूंगवासातून मुक्तता केली.
मांडव्य ऋषी रागाने यमराजाजवळ आले. "माझ्या आयुष्यात मी असा
कोणता गुन्हा केला आहे, कि मला
अशा प्रकारे खोट्या आरोपासाठी शिक्षा भोगावी लागली" असे विचारले. तेव्हा
यमराजाने सांगितले. "तुम्ही बारा वर्षाचे असताना एका फुलपाखराला पकडून
त्याच्या शेपटीवर टोकदार काट्याने टोचत होते. फुलपाखरू वेदनेने तडफडत होते. तुम्हाला
ती मजा वाटत होती. त्या अपराधामुळे तुम्हाला हि शिक्षा भोगावी लागत आहे. "
मांडव्य ऋषी रागाने लालबुंद झाले. "बाराव्या वर्षी कोणालाही
धर्म-अधर्म याचे ज्ञान येत नाही. आपण शूद्र गुन्ह्यासाठी मला मरणप्राय वेदना
देणारा मोठा दंड दिला आहे. म्हणून मी तुला शाप देतो, कि तू शूद्र योनीत एक दासीपुत्र म्हणून पृथ्वीवर
जन्माला येशील. " मांडव्य ऋषींच्या शापामुळे परिश्रमी दासीच्या पोटी यमराजाचा
जन्म झाला. महाभारतात महात्मा विदुर म्हणून ते प्रसिद्ध झाले.
___________________________________________________________________________________
अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.
ब्लॉग शेअर करा -
ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com
__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________