अश्वत्थामा


अश्वत्थामा 



            अश्वत्थामा हा एक शूर, पराक्रमी असा योद्धा होता, अगदी महादेवासारखा. कौरव-पांडवांचे गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र. गुरु द्रोणाचार्यानी महादेवाची कठोर तपश्चर्या केल्यांनतर भगवान महादेवाइतकाच पराक्रमी पुत्र झाला. महादेवाच्या वरदानामुळे तो आपल्या कपाळावर एक रत्न घेऊन जन्माला आला. या रत्नाच्या प्रभावामुळे जन्मताच काही अपार शक्ती प्राप्त झाल्या होत्या. तसेच द्रोणाचार्यांचा पुत्र असल्यामुळे अर्जुनाइतकाच पराक्रमी धनुर्धारी होता. दैत्यराज बली, महर्षी वेदव्यास, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य, परशुराम ऋषी व अश्वत्थामा हे सर्व चिरंजीवी म्हणजेच अमर आहेत व आजही पृथ्वीतलावर अस्तित्वात आहेत. पण बाकी सर्वाना अमरत्व वरदान म्हणून मिळाले तर अश्वत्थामाला अमरत्व हे वरदान नसून शाप म्हणून मिळाले आहे.

            पांडवाच्या युद्धात गुरु द्रोणाचार्य कौरवांचे सेनापती होते, म्हणून अश्वत्थामा देखील वडिलांसोबत कौरवांच्या बाजूने युद्धात उतरला होता. युद्धात द्रोणाचार्यानी सेनापतिपद स्वीकारले तेव्हा कौरव वरचढ ठरू लागले. पांडवांची बाजू मार खाऊ लागली. तेव्हा द्रोणाचार्यांचे मनोबल खच्ची करण्यासाठी व त्यांनी शस्त्र खाली ठेवावे यासाठी कृष्णाने एक युक्ती आखली. द्रोणाचार्याचे आपल्या पुत्रावर अफाट प्रेम आहे व अश्वत्थामा मेला ही बातमी ते सहन करू शकणार नाहीत व त्यांची युद्ध करण्याची इच्छा राहणार नाही. त्यांनतर ठरवून भीमाद्वारे अश्वत्थामा या हत्तीचा वध करण्यात आला आणि रणांगणावर अश्वत्थामा मेला अशी आरोळी जिकडे-तिकडे ठोकण्यात आली. ही बातमी द्रोणाचार्यांना समजली. बातमीची पुष्टी करण्यासाठी त्यांनी सत्यवादी, विश्वसनीय व न्यायिक अशा युधिष्ठिराजवळ पोहचले. कृष्णांनी आधीच युधिष्टराला कल्पना दिली असल्यामुळे द्रोणाचार्यानी बातमीची सत्यता विचारताच युधिष्टराने स्पष्ट न सांगता "अश्वत्थामा मेला, नरो वा कुंजरो.” असे उत्तर दिले हे उत्तर ऐकताच धक्क्याने गुरु द्रोणाचार्यानी शस्त्र खाली ठेवले व संधीचा फायदा घेऊन द्रुष्टद्युम्न याने द्रोणाचार्यांचा वध केला. पुढे सूड भावनेने अश्वत्थाम्याने देखील द्रुष्टद्युम्नाचा वध करून आपल्या पित्याच्या वधाचा सूड घेतला.

            विवेकबुद्धी हरवून बसलेला अश्वत्थामा एका रात्री पांडवाच्या शिबिरात जातो व पांडवाचा शिरच्छेद करून बोरीमध्ये भरून घेऊन जातो. दुर्योधनासमोर ती बोरी उघडल्यानंतर समजते की पांडव समजून त्याने द्रौपदीच्या पाच मुलांचे शिरच्छेद करून आणले होते. दुर्योधनाला देखील अश्वत्थाम्याची ही कृती आवडली नव्हती. पांडवांना व कृष्णाला ही गोष्ट समजताच ते अश्वत्थाम्याला शोधू लागतात. क्रोधीत अर्जुन अश्वत्थाम्याला पाहताच दोघेही एकमेकांवर तुटून पडतात. एकमेकांवर शस्त्रांचा मारा करू लागतात. दोघेही धनुर्धारी असल्यामुळे दोघांनाही ब्रह्मास्त्र चालवण्याची कला अवगत होती. युद्ध एवढे तापले कि दोघांनी एकमेकांवर ब्रम्हास्त्र सोडले. जर ते ब्रम्हास्त्र एकमेकांवर धडकले असते, तर पृथ्वीचा नाश झाला असता, म्हणून कृष्णांनी दोघाना ब्रम्हास्त्र मागे घेण्याचा आदेश दिला. अर्जुन आपली सद विवेकबुद्धी वापरून अस्त्र मागे घेतो, परंतु सुडापोटी सद विवेकबुद्धी हरवलेला अश्वत्थामा ते ब्रम्हास्त्र गर्भवती असलेल्या अभिमन्यू पत्नीच्या गर्भात सोडतो. या गोष्टीमुळे कृष्ण क्रोधीत होऊन अश्वत्थाम्याच्या कपाळावरील शिरोमणी काढतात.

            शिरोमणी काढल्यामुळे अश्वत्थाम्याच्या भाळी जखम होते, त्यातून रक्त वाहू लागते.”युगानुयुगे तू ही जखम कपाळावर घेऊन या जखमेवर लावण्यासाठी तेल दारोदार फिरशील.” असा शाप भगवान श्रीकृष्ण त्याला देतात. कपाळी जखम घेऊन तेल मागत अश्वत्थामा आजही दारोदार फिरत आहे. त्याला वणवण तेल मागत दारोदार फिरताना बघितल्याचा दावा करणारे बरेचजण आहेत.


  ___________________________________________________________________________________


अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.

ब्लॉग शेअर करा - 

                                 

ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com


__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________

फॉलोअर