महाभारतातील हनुमान


 महाभारतातील हनुमान 



            महाभारतातील कर्ण-अर्जुन युद्ध हे जवळ जवळ त्या युद्धाची सांगताच होती. कर्ण पर्वात अर्जुनच्या रथाबद्दल सविस्तर माहिती आपल्याला मिळते. आपण या युद्धाची पूर्वपीठिका थोडी जाणून घेऊया, म्हणजे आपल्याला अर्जुनाच्या दिव्य रथाबद्दल पूर्ण माहिती होईल. भीम व अर्जुन कौरव पक्षीय वीराशी लढत होते. अर्जुनाचे कर्णाबरोबर द्वैरथ युद्ध होणार होते. कर्णसुद्धा अर्जुनाला शोधत रणांगणावर फिरत होता. इतक्यात कर्णाचा सारथी शल्य याला अर्जुनाचा रथ दिसला. त्या रथावरील ध्वजेवर असणाऱ्या हनुमानावरून त्याने अर्जुनाचा रथ लांबूनच ओळखला. अर्जुनाच्या रथाबद्दल माहिती सांगताना शल्य कर्णाला म्हणतो कि "हे कुंतीकुमार, अर्जुनाच्या ध्वजेच्या अग्रभागी एक भयंकर वानर दिसून येत आहे. तो शक्तिशाली हनुमान असून सर्व बाजूला भेदक नजरेने पहात आहे. त्यामुळे कौरववीर अत्यन्त भयभीत झालेले आहेत.”

            नंतर कर्णाच्या आज्ञेने अश्वत्थामा, कृतवर्मा, कृपाचार्य वगैरे वीर अर्जुनाबरोबर युद्ध करण्याच्या उद्धेशाने त्याच्यावर बाणाचा वर्षाव करू लागले. अश्वत्थाम्याने अर्जुन आणि श्री कृष्णावर बाणाचा वर्षाव केलाच, पण ध्वजावर बसलेल्या हनुमानावरसुद्धा बाणांचा वर्षाव केला. परंतु अर्जुनाने त्याच्या बाणांना बाणांनीच प्रत्युत्तर दिले. अश्वत्थामा, कृपाचार्य वगैरे वीरांचे कडे फोडून अर्जुन कर्णापर्यंत पोहचला. कर्णाच्या कृतीमुळे हनुमान खूपच नाराज होऊन कर्णाकडे नजर रोखून पहात होते. काहीतरी भयंकर घटित होणार याची कुणकुण कृष्णाला लागली. कृष्ण मोठयाने ओरडून हनुमानाला म्हणाले "तू माझ्याकडे बघ, आणखी काही काळ तू कर्णाकडे असेच पहात बसलास, तर कर्ण तुझ्या दृष्टिरोखानेच मारला जाईल. केवळ तुझ्या दृष्टीचा सामनाही कर्ण करू शकत नाही. या युद्धात मी तुला शांत बसण्यास सांगितले आहे.” त्यामुळे हनुमान शांत झाला.

            शेवटी घनघोर युद्ध सुरु झाले. दोन्ही बाजूने दिव्य अस्त्राचा भयभीत करणारा करणारा वर्षाव सुरु झाला. संपूर्ण आसमंतात वीज कडाडल्याप्रमाणे आवाज येऊ लागला. तुंबळ संघर्षांनंतर अर्जुनाने कर्णाचा वध केला. शेवटी भीमाने दुर्योधनाचा गदायुद्धात वध केला. पांडवांचे सर्व शत्रू ठार मारले गेले. त्यांनतर विजयाने आनंदित झालेले पांडवपक्षीय योद्धे आपापले शंख वाजवू लागले व सर्वजण कौरवांच्या शिबीरात पोहचले. श्री कृष्णांनी अर्जुनाचा रथ दुर्योधनाच्या शिबीराकडे नेला. त्यांनी अर्जुनाला सांगितले कि "प्रथम तू तुझे धनुष्य व बाण घेऊन खाली उतर. तू उतरल्यावर मी रथातून उतरीन. असे करण्यातच तुझे कल्याण आहे.”

            अर्जुन कृष्णाच्या सांगण्यानुसार प्रथम रथातून खाली उतरला. नंतर घोड्याचा हातात घेतलेला लगाम सोडून कृष्णही खाली उतरले. कृष्ण खाली उतरताच अर्जुनाच्या ध्वजेवर असणारे हनुमान अंतर्धान पावले. त्यांनतर त्या दिव्य रथाचे प्रयोजन संपले होते. रथ अग्निमध्ये जळून खाक झाला. युद्धमध्ये मुळातच तो दिव्य रथ अस्त्र शत्राच्या माऱ्यामुळे खिळखिळा झाला होता. कृष्ण त्या रथावर होते, म्हणून तो टिकून होता. कृष्ण उतरताच तो जळून भस्म होऊन अग्नी समर्पित झाला.


  ___________________________________________________________________________________


अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.

ब्लॉग शेअर करा - 

                                 

ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com


__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________

फॉलोअर