चिमणी आणि श्रीकृष्ण


चिमणी आणि श्रीकृष्ण 

                              


                              महाभारताचा प्रसंग होता. कुरुक्षेत्राची तयारी केली जात होती. कुठे काही खड्डे, खच, खळगे राहिले नाहीत ना, याची पाहणी करण्यासाठी स्वतः भगवान श्रीकृष्ण अर्जुनासह कुरुक्षेत्रावर पोहचले. तेवढ्यात एक चिमणी उडत उडत श्री कृष्णाजवळ आली. ती म्हणाली "भगवंता, या मनुष्याच्या भांडणात आम्हा मूक जीवांना शिक्षा का ? मी आणि माझी पिल्ले कुणाच्याही अध्यात-मध्यात नसताना या समराचे दुष्यपरिणाम आमच्या कुटुबालाही झेलावे लागत आहेत. तुमच्या हत्तीदलातल्या एका हत्तीने एका ढुश्यात रणभूमीवरील एक झाड पाडले आणि झाडावरील माझे घरटे पिल्लांसकट जमिनीवर पडले. माझ्या तान्ह्या बाळांना घेऊन मी कुठे जाऊ भगवंता ? आता तुमच्याच आशेवर आम्ही आहोत." असे म्हणून चिमणी निघून गेली. श्रीकृष्णाचे डोळे पाणावले. अर्जुनाने कारण विचारले. श्रीकृष्ण काहीच बोलले नाहीत. 

                              

                              दुसऱ्या दिवशीपासून युद्ध सुरु होणार होते. सगळे रण-धुरंधर कुरुक्षेत्रावर पोहचले. त्यावेळेस श्रीकृष्णाला चिमणीची आठवण झाली. युद्ध सुरु झाले कि ते इवलेसे जीव हकनाक बळी पडतील, या विचाराने कृष्णाने अर्जुनाच्या हातातील धनुष्य आणि बाण घेतले आणि दूर अंतरावर उभ्या असलेल्या हत्तीवर निशाणा धरला. हे पाहून अर्जुनाने कृष्णाला आठवण करून दिली "भगवंता, तुम्ही शस्त्र हाती घेणार नाही, असे वचन घेतले आहे." यावर श्रीकृष्णांनी काही न बोलता बाण सोडला. तो बाण हत्तीला न लागता त्याच्या गळ्यातील घंटेला लागून, गळ्यातली दोरी तुटून घंटा जमिनीवर पडली. काही काळात घमासान युद्ध सुरु झाले. 

                              

                              तब्बल अठरा दिवस युद्ध चालले. अनेकांचे प्राण गेले, कौरव संपले, पांडव जिकंले. दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण आणि अर्जुन पुन्हा रणभूमीची पाहणी करण्यासाठी निघाले. कुरुक्षेत्रावर रक्त-मांसाचा चिखल पडलेला. ते पाहूनच अर्जुनाचे मन विदीर्ण झाले. एके ठिकाणी कृष्णाने रथ थांबवून अर्जुनाला रथापुढे पडलेली घंटा उचलायला सांगितली. अर्जुनाने प्रतिप्रश्न न करता रथातून उतरून ती जड घंटा उचलली. 

                              

                              घंटा उचलताच त्यातून चिमणी व तिची पिल्लं भेदरलेल्या अवस्थेत दिसली. एवढ्या मोठा गदारोळात ही या इवल्याश्या जीवांना जीवदान कसे मिळाले, या विचाराने आश्चर्यचकित होत अर्जुनाने श्रीकृष्णाकडे पहिले. तर त्या वेळेस पिल्लांची आई उडत श्रीकृष्णाजवळ आली आणि त्यांचे प्राण वाचवल्याबद्दल आभार मानत बोलली "भगवंता, जे कोणीही करू शकले नसते, ते तू करून दाखवलेस. आमच्यासारख्या चिमुकल्या भक्तांची एवढ्या कठीण प्रसंगात काळजी घेतलीस, माझा विश्वास आणि माझी भक्ती राखलीस. जसा माझ्या मदतीला धावून आलास, तसाच प्रत्येक भक्ताच्या मदतीला धावून जा. त्याचे रक्षण कर आणि त्याच्या प्रयत्नांना, जगण्याच्या उमेदीला बळ दे, हीच माझी तुझ्या चरणी प्रार्थना."





  ___________________________________________________________________________________


अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.



ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com


__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________

फॉलोअर