नैवेद्य ग्रहण


नैवेद्य ग्रहण



आपण देवाला दाखवलेला 'नैवेद्य' देव खरंच खातात का?


आणि जर खात असतील तर तो 'नैवेद्य' संपलेला दिसत कां नाही?


आणि जर खात नसतील तर मग 'नैवेद्य' दाखवायचा तरी कशाला?


एकदा वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असताना एका शिष्याने हा प्रश्न आपल्या गुरूला विचारला. 


गुरुने ह्या प्रश्नाचं लगेच काही उत्तर दिलं नाही. ते आपला वर्ग घेत राहिलेत, पण त्यादिवशी वर्ग संपल्यानंतर त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना पुढला 'श्लोक' शिकवला :-


 "पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते । 

पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।।"


श्लोक शिकवल्यानंतर गुरूंनी शिष्यांना सांगितलं की आता सर्वांनी पुस्तकात बघून हा श्लोक पाठ करायचा आहे. 


एका तासानंतर गुरूंनी ज्या शिष्याने त्यांना प्रश्न विचारला होता त्याला विचारलं, "तुझा श्लोक पाठ झाला की नाही? यावर त्या शिष्याने पुस्तकातील 'श्लोक' आपल्या गुरूला जसाच्या तसा पाठ म्हणून दाखवला. यावर गुरूंनी नकारार्थी मान हलवली. तेव्हा शिष्य गुरूंना म्हणाला, "गुरुजी, हवं तर तुम्ही पुस्तकात पहा, माझ्या म्हणण्या मध्ये काहीच चूक झालेली नाही मी तो 'श्लोक' जसाच्या तसा पाठ म्हटलेला आहे.!!"


यावर, पुस्तकाकडे पहात गुरु म्हणाले, "अरे 'श्लोक' तर पुस्तकातच आहे, तर मग तो तुझ्या मेंदूपर्यंत कसाकाय जाऊन पोहोचला?" यावर शिष्याला काहीच उत्तर देता आलं नाही. 


तेव्हा गुरु म्हणाले, "पुस्तकात जो 'श्लोक' आहे तो 'स्थूल रूपामध्ये' आहे. तू जेव्हा श्लोक पुस्तकात पाहून वाचलास तेव्हा तो 'श्लोक सूक्ष्म स्वरूपात' तुझ्या मेंदूमध्ये शिरला आणि त्याच 'सूक्ष्म स्वरूपात' तो तुझ्या मेंदूमध्ये राहणार आहे आणि जेव्हा तू पुस्तकात पाहून 'श्लोक' पाठ केलास तेव्हाही पुस्तकामध्ये 'स्थूल रूपाने' असलेल्या श्लोकामध्ये काहीही फरक पडलेला नाही. अशाच प्रकारे संपूर्ण विश्वामध्ये व्याप्त परमात्मा; आपल्या द्वारे दाखवल्या गेलेल्या 'नैवेद्याचं' सूक्ष्म रूपामध्ये 'ग्रहण करत असतो' आणि त्यामुळे स्थूल स्वरूपातील वस्तुमध्ये कसलाही फरक पडलेला आपल्याला दिसत नाही आणि अशा रीतीने 'देवानं सूक्ष्म स्वरूपात ग्रहण केलेलं अन्न' आपण 'प्रसाद' म्हणून ग्रहण करीत असतो."


शिष्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळालं होतं. 



 ___________________________________________________________________________________


अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.

ब्लॉग शेअर करा - 

                                 

ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com


__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________

फॉलोअर