संत कान्होपात्रा


संत कान्होपात्रा 



            पंढरपूरपासून सात कोसांवर मंगळवेढे येथे राहणाऱ्या धनाढ्य शामा नायकिणीची मुलगी म्हणजे कान्होपात्रा. वडील कोण ते माहित नाही, पण शामाचा असा अंदाज होता कि गावचा नगराध्यक्ष सदाशिव मालगुजर तिचा पिता असावा. लहानपणी तिच्या पायात बांधलेले चाळ कोडकौतूकाचे नव्हते तर वेश्यावृत्तीला अपरिहार्य असं नृत्य शिकण्यासाठी होते. रूप आणि तारुण्याच्या जोरावर लोकांकडून पैसे वसूल करावेत, असच वातावरण अवतीभोवती होते. आईचाही आग्रह तसाच होता, पण भक्तीचा अंकुर तिच्या हृदयात फुलला होता. कान्होपात्रा जितकी रूपवान तितकीच बुद्धिमानही होती. ती मेनका या अप्सरेचं प्रतिरूप होती, असे लोक म्हणायचे. गायन व नृत्यात तिने अगदी लहानपणापासून प्राविण्य मिळवले होते.

            हळूहळू तीची कलानैपुण्य व सौदर्याची कीर्ती दूरवर पसरली होती. तिची आई अत्यन्त धनवान असून राजमहालासारखा तिचा भव्य प्रासाद होता. अनेक दासी तिच्या सेवेला तत्पर होत्या. शामाने कान्होपात्रेच्या शिक्षणाची चोख व्यवस्था केली होती. कान्होपात्रेने आपलं गणिका व्यवसाय पुढे चालू ठेवावा, राजदरबारी रुजू व्हावे, असे शामाला वाटत होते तर कान्होपात्रेला त्याची किळस वाटत होती. मुलीच्या रुपागुणांना योग्य असा पुरुष कान्होपात्रेला मिळावा, असे शामाला वाटत होते पण कान्होपात्रेने स्पष्ट्च सांगितले कि माझ्यापेक्षा रूपवान पुरुष असेल, तर मी त्याच्या जवळ राहीन, त्याचा विचार करेन. अर्थात ही अट कठीण होती.

            एकदा मंगळवेढ्यातील धनाढ्य व्यक्ती सदाशिव मालगुजार याची नजर कान्होपात्रेवर पडली. त्यांनी कान्होपात्रेचे नाचगाणे बघण्याची इच्छा व्यक्त केली. शामाने काहीतरी कारण सांगून कान्होपात्रेला कसबसं सदाशिव समोर आणले. त्याची विषारी नजर तिच्यावर पडली. याच्या सारख्या नीच माणसासमोर मी नाचगाणे करणार नाही, असे तिने त्याच्या तोंडावर स्पष्टच सांगितले. भडकलेल्या सदाशिवने सूड सत्रास आरंभ केला. शामाने कान्होपात्रा त्याचीच मुलगी असल्याचे सांगून पाहिले. पण तो इतका वासनांध झाला होता कि हे सारे खोटे आहे असे त्याचे म्हणणे होते. शामा आणि कान्होपात्रेचा छळ सुरु झाला. सारे वैभव ओसरले. त्याच्या विरुद्ध न्याय कोण देणार. अखेर शामाने त्याची माफी मागितली. त्याने तीन दिवसात कान्होपात्रेला आपल्या समोर आणून उभे करण्याचा आदेश दिला.

            या संकटाने डगमगून न जाता कान्होपात्रा देवासमोर हात जोडून जप करायला लागली. रात्रभर ती जप करत होती. पहाटे डोळा लागला आणि भजन टाळाचा गजर एकूण तिला जाग आली. वारकऱ्यांची एक दिंडी आषाढी निमित्त भजन गात पंढरपुरास चालली होती. त्याक्षणी मनातला अस्पष्ट विचार तिने पक्का केला. तिची म्हातारी दासी हौसाक्का वारकरी होती. बळजबरी अत्याचारातून सुटण्याची संधी जणू देवानेच तिला दिली होती. हौसाच्या संगनमताने तिने फाटके विटके कपडे घातले आणि पंढरपूरला निघाली. तिच्या मनाला विठ्ठलाची ओढ लागली होती. मध्य रात्रीच्या अंधारात तिने मंगळवेढे सोडले.

            यापुढे रूपवती कान्होपात्रेने निर्भयतेने पूर्णपणे विठ्ठलावर विसंबून आपला दिनक्रम ठरवला. पंढरपूरला आल्यावर तिने पांडुरंगाचे दर्शन घेतले. त्यावेळी ती संपूर्णपणे विठ्ठलाच्या चरणी एकाग्र झाली. आपलं सगळं अस्तित्व विठ्ठलाच्या पायावर समर्पित करून तिने त्याचे दास्यत्व स्वीकारले. कान्होपात्रा स्वरचित अभंग गाऊ लागली आणि तिचा स्वर्गीय आवाज ऐकून लाखो वारकरी तल्लीन झाले. तिथे येणारे सारे विठ्ठलावरच्या प्रेमामुळेच येत असत. त्या अभंगातला भाव त्याच्या हृदयाला भिडत असे. वृद्ध हौसाबाईने दोघीसाठी झोपडी बांधली. कान्होपात्रा दिवसातून दोनदा विठ्ठलाचे मंदिर झाडून पुसून स्वछ ठेवत असे. पहाटे, रात्री ती देवासमोर भजन व नृत्य करी. लोकांना वाटे ती देवाचं वेड घेतलेली गरीब शेतकऱ्याची पोर आहे. कान्होपात्रा दिवसेंदिवस विठ्ठलाच्या भक्तीत खोल बुडून गेली. लोक तिचा आदर करू लागले. भोगविलासाची इच्छा तिला नव्हतीच. मूळचा ओढाच परमार्थाकडे असल्याने तिच्या ज्ञानी मनी विठ्ठल राहू लागला. मन त्याच्या चरणी एकाग्र होऊ लागले.

            एके दिवशी एका इसमाने यवनी बादशहाजवळ कान्होपात्रेच्या लावण्याचे वर्णन केले. बादशहाने दूताला तिला घेऊन यायला सांगितले. कान्होपात्रेला न्यायला शिपाई पंढरपुरात आले.”बादशहाने तुला बोलवले आहे. चल आमच्या बरोबर. जर तू आली नाही, तर तुला जबरदस्तीने न्यावे लागेल.” घाबरून कान्होपात्रा बोलली "थांबा, मी माझ्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन येते.” कान्होपात्रा थेट मंदिरात गेली. पायावर डोके ठेवून विठ्ठलाचा धावा करू लागली.”पांडुरंगा, माझे रक्षण कर. सर्वांच्या मदतीला तू धावून येतोस, मग माझ्या मदतीला कधी येणार. जर हे शिपाई मला घेऊन गेले, तर सर्वाचा तुझ्या वरील विश्वास उडेल. माझा अंत पाहू नको.” असे म्हणत कान्होपात्रा पांडुरंगाचा धाव करू लागली.”विठ्ठला, मी माझ्या आशा इच्छा सर्व सोडल्या आहेत, आतातरी भेट.” कान्होपात्रेची हि विनवणी फळाला आली. कान्होपात्रेची शुद्ध हरपली. तिने विठ्ठलाच्या पायावर ठेवलेले मस्तक वर उचललेच नाही. विठ्ठलाच्या चरणी तिने प्राण सोडला. मंदिराच्या पुजाऱ्यांनी हे पाहिल्यावर घाईगडबडीने कान्होपात्रेस देवळाच्या आवारात दक्षिण दिशेस पुरले आणि काय चमत्कार तेथे लगेच तरटीचे झाड उगवले.

            विठ्ठल मंदिराच्या आवारात आजही तरटीचे झाड आहे. विठ्ठलाच्या सानिध्यात मंदिर परिसरात फक्त एकाच संतांची समाधी आहे, ती कान्होपात्रेची. तिच्या भक्तीने अखेर तिला सर्वातून मुक्ती मिळाली. विठ्ठलाचे पाय न सोडता त्याच्या चरणी देहत्याग घडावा, हे पराकोटीच्या भक्ती शिवाय शक्य नाही. कुणी गुरु नाही, काही परंपरा नाही, भक्तीच वातावरण नाही अशा परिस्थितीत केवळ आपल्या भक्तीने तिने ईश्वरप्राप्ती करून घेतली. म्हणून कान्होपात्रा अद्वितीय ठरते. तिच्या भक्तीमुळे समाजही तिच्या पायाशी नतमस्तक झाला व तिला संतपदही मिळाले.



  ___________________________________________________________________________________


अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.

ब्लॉग शेअर करा - 

                                 

ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com


__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________

फॉलोअर