पाठीवरचे मांडे


पाठीवरचे मांडे 




            निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही चारही भावंडे ज्ञानी होती. निवृत्तीनाथांनी गहिनीनाथाकडून मिळालेले योगज्ञान, ब्रम्हविद्या आपल्या भावंडाना दिली. चारही भावंडे ओव्या, विराण्या, अभंग रचून लोकांमध्ये आध्यत्मिक ज्ञानाचा प्रसार करत होते. पोथीपुराण, कर्मकांड, जातीव्यवस्था यामुळे सामान्य लोक आध्यत्मिक ज्ञानापासून वंचित रहात होते. या संतांनी तो अडथळा मोडून सामान्य लोकांना भक्तीचा प्रेमाचा मार्ग शिकवला. त्याचे भक्त अनुयायी वाढत होते. ज्यांना आपण संन्यासाची पोरे म्हणून चिडवले, ती इतकी विलक्षण निघताहेत कि लोक त्याचे भक्त बनावेत, हे काही जणांच्या पचनी पडत नव्हते. विसाजीपंत सावकार हे त्यापैकीच एक होते. ते प्रतिष्ठित असून धर्मशाश्त्राचा चांगला अभ्यास होता. त्यांना या भावंडांचा मत्सर वाटत होता. त्यांनी दाखवलेल्या चमत्काराच्या कथा त्याच्या कानी पडत होत्या. तरी त्यांना त्यावर विश्वास बसत नव्हता.

            एक दिवस निवृत्तीनाथांना मांडे खायची इच्छा झाली. हा पदार्थ मातीच्या खापरावर बनवतात. ते खापर घरी नव्हते. मुक्ता ते खापर घेण्यासाटी कुंभाराकडे गेली. या भावंडाना कुणीही काहीही द्यायचे नाही, असा विसाजीपंतांनी लोकांना दम दिला होता. त्यामुळे जागोजाग फिरूनसुद्धा मुक्ताला खापर मिळाले नाही. मुक्ता हिरमुसून घरी आली. आपल्या दादाला हवा तो पदार्थ बनवता येणार नाही, याचे तिला खूप वाईट वाटले. तिचा पडलेला चेहरा पाहून ज्ञानेश्वरांनी "काय झाले" असे विचारले. मुक्ताने "मांडे करायचे आहेत, पण कोणी खापरच दिले नाही. " हे सांगितले. ज्ञानेश्वर म्हणाले "बस एवढेच ना? तू कशाला दुखी होतेस. तू तयारी कर. आपण छान मांडे करू. "

            ज्ञानदादाने आश्वासन दिल्यावर तो ते नक्कीच पूर्ण करतो, याची मुक्ताला खात्री होती. मुक्ताने तयारी करून ज्ञानादादाला विचारले "कुठाय रे दादा खापर? कशावर थापू मी मांडे?' दादा म्हणाला "थाप माझ्या पाठीवर" असे म्हणून ज्ञानेश्वर ओणवे झाले. त्याची पाठ तापून लाल व्हायला लागली. मुक्ताने आनंदाने दादाच्या पाठीवर मांडे थापले. हा सगळा प्रकार विसाजीपंतांनी खिडकीतून लपून पहिला.

            मुक्ताला खापर मिळाले नाही, हे त्यांना समजले होते. आता ही मुले काय करतील, हे बघायला ते आले होते. मजा तर त्यांनी पहिलीच, पण वेगळी. ज्ञानेश्वराची ती लीला पाहून तेच विचारात पडले. ही भावंडे दिव्य आहेत, याची त्यांना खात्री पटली. आपण उगाचच यांचा तिरस्कार केला, त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला, याचा त्यांना पश्चाताप झाला. त्यांना ते देवासमान वाटू लागले. त्यांनी आपल्या चमत्काराने बनवलेले मांडे त्यांना खावेसे वाटू लागले. त्याच्यासाठी तो देवाच्या हस्ते बनवलेला प्रसाद होता. पण त्या भावंडांचे स्वतःचे जेवण चालू असताना कसे खावे. त्याचे जेवण होइपर्यंत थांबले. ज्ञानेश्वर पानावरुन उठताक्षणी तडक आत जाऊन त्याच्या उष्ट्या पत्रावळीवर उरलेले अधाशासारखे खायला लागले. ज्ञानेश्वर आश्चर्याने म्हणाले "अरे, असं खेचरासारखे काय करताय. " विसाजीपंत तृप्त झाले. त्या भावंडाची क्षमा मागितली. त्याचे शिष्यत्व पत्करलं.

            कोणी म्हणतात ज्ञानेश्वराचे शिष्य झाले, कोणी म्हणतात मुक्ताईचे स्वतः विसाजीपंताच्या एका अभंगात सोपानदेव आपले गुरु असल्याचा उल्लेख आहे. त्या चार भावंडांचे आयुष्य, ज्ञान शिकवण सगळंच एकमेकांशी इतकं जोडले आहे कि ते वेगळे नाहीतच. ह्याच विसाजीपंतांना विसोबा खेचर असे म्हणतात. या प्रसंगी डोळे उघडल्यावर ते स्वतः भक्तिमार्गावर आयुष्यभर चालले. पुढे संत नामदेवाचे गुरु झाले.



 ___________________________________________________________________________________


अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.

ब्लॉग शेअर करा - 

                                 

ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com


__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________

फॉलोअर