पांडुरंग आणि सखुबाई


पांडुरंग आणि सखुबाई



            कृष्णा नदीच्या तीरावर करवीर नावाचे तीर्थक्षेत्र आहे. फार वर्षांपूर्वी तेथे सखूचे सासर होते. तिच्या पतीचे नाव दिगंबर होते. तिची सासू मात्र तिला खूप त्रास देत असे. तिचा हर प्रकारे छळ करत असे. उपाशी ठेवत असे मारहाणही करत असे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिची सासू तिला कामाला जुपुन ठेवी. सारे काम करूनही सासूची बोलणी ही नित्यानीच असत. सखू मात्र हे निमूटपणे सहन करत असे. भोळी भाबडी सखू काम करताना नेहमी विठ्ठलाचे स्मरण करी. तिच्या मुखी सारखे पांडुरंगाचेच नाम असे.

            आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरीला जाणारी दिंडी तिच्या गावी आली. दिंडी कृष्णेच्या तीरावर थांबली. तेथे वारकऱ्यांचे भजन चालू केले. महाराज कीर्तन करायला उभे राहिले. नेमकी त्याच वेळी सखू पाणी भरण्यास आली होती. कीर्तनकार पंढरीचा महिमा वर्णू लागले. पांडुरंगाची गाणी गाऊ लागले. विठ्ठलनाम कानावर पडताच सखूचे लक्ष तिकडे गेले. महाराजांचे कीर्तन ऐकण्यात ती तल्लीन झाली. सर्व वारकऱ्यांना पाहून तिलाही पंढरीला जावेसे वाटले. तिला विठ्ठलदर्शनाची अनिवार ओढ लागली. काही झाले तरी आपण पंढरपूरला जायचेच असे तिने ठरविले. त्या निश्चयाचा भरात सखूने आपली घागर शेजारणीकडे देऊन तिला घरी नेऊन देण्यास सांगितले. ती दिंडीसोबतच पुढे निघाली. विठ्ठलनामाच्या जयघोषात सखू अगदी दंग झाली.

            इकडे शेजारीने सखूच्या घरी घागर नेवून दिली. सखू कुठे गेली असे सासूने विचारताच शेजाररीने सगळी हकीकत कथन केली. हे ऐकून सासू रागाने लालबुंद झाली. तिने लगेच आपल्या मुलाला बोलावून घेतले आणि ताबडतोब सखूला घेऊन येण्यास सांगितले. दिगंबराने भराभर चालत दिंडी गाठली आणि सखूला मारझोड करत घरी घेऊन आला. दोघांनी मिळून तिला एका खोलीत कोंडून ठेवले. तिला अन्नपाणीही द्यायचे नाही असे ठरवले.

            पांडुरंगाचे दर्शन होणार नाही, या गोष्टीचे सखूला वाईट वाटले. तिने पांडुरंगाचा धावा सुरु केला. व्याकूळ होऊन ती पांडुरंगाला आळवू लागली. सखूची निस्सीम भक्ती आणि भोळ्या भावामुळे पांडुरंग प्रसन्न झाला. पांडुरंगाने रुक्मिणीला खरी गोष्ट सांगितले आणि स्त्रीवेष घेऊन सखूपाशी आला. सखूच्या बंद खोलीत जाऊन त्याने तिची विचारपूस केली. आपणही पंढरीचे वारकरी असल्याचे तिने सांगितले तेंव्हा सखूने आपली सारी व्याकुळता तिच्यासमोर व्यक्त केली. त्या स्त्रीने तू पंढरीला जावून दर्शन घेऊन ये तोपर्यंत मी इथे सखू म्हणून राहीन असे सांगितले. हे एकूण सखूचा आनंद गगनात मावेनासा झाला.

            सखू पंढरपूरला आली. पांडुरंगाचे रूप बघून धन्य धन्य झाली तिला जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. तिथेच तिने आपले प्राण ठेवले. दिंडीत आलेल्या तिच्या गावकऱ्यांनी तिचे अंत्य संस्कार केले. इकडे एकादशी दिंगबराने सखूच्या खोलीचे दार उघडले. सखूच्या रूपातील पांडुरंग सखूची सारी कामे करू लागला. तिच्या सासूने सांगितलेली सारी कामे पांडुरंग निमूटपणे करत असे. सखू पुन्हा घरी गेलीच नाही तर पांडुरंग तितेच अडकून राहतील अशी रूकमिनीला चिंता वाटू लागली. तिने सखूची राख व अस्थी एकत्र केल्या आणि सखूला जिवंत करून घरी पाठवून दिले. सखू घरी पोहचत असताना वाटेतच तिला पांडुरंगाच्या वेषातील सखू भेटली. इकडे ज्या गावकऱ्यांनी सखूचे अंत्यसंस्कार केले होते. ते सखूच्या घरी आले तर सखू त्यांना काम करताना दिसली. त्याना आश्चर्य वाटले. त्यांनी सखूच्या सासूला आणि नवऱ्याला सारा वृतांत सांगितला. सासूने व नवऱ्याने विचारताच सखूने सारी घटना कथन केली ते ऐकूण गावकरी स्तब्ध झाले. सासूला आणि नवऱ्याला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला.

 

 ___________________________________________________________________________________


अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.

ब्लॉग शेअर करा - 

                                 

ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com


______________________________________________________________________________________________________________________________________________________________________________

फॉलोअर