देवाचे गणित


 देवाचे गणित



            एकदा दोघेजण एका मंदिराबाहेर बसून गप्पा मारत होते. अंधार पडू लागला होता. थोड्या वेळाने एक माणूस येऊन त्याच्यासोबत गप्पा मारू लागला. थोड्या वेळाने त्या तिघांनाही भूक लागली. पहिला माणूस म्हणाला "माझ्याकडे तीन भाकऱ्या आहेत.” दुसरा माणूस म्हणाला "माझ्याकडे पाच भाकऱ्या आहेत, आपण तिघे मिळून वाटून खाऊ" आता आठ भाकऱ्या तिघांमध्ये कशा वाटायच्या, असा प्रश्न पडला. तर पहिल्याने सुचविले आठ भाकऱ्याचे प्रत्येकी तीन तुकडे करायचे आणि आठ भाकऱ्याचे चोवीस तुकडे करून प्रत्येकाला आठ तुकडे वाटून घेऊन खाऊन भूक शांत केली. मग पावसामुळे मंदिराच्या आवारातच झोपले. सकाळी तिसरा माणूस त्या दोघांचे आभार मानून भाकरीच्या तुकड्याच्या बद्दल आठ सुवर्णमोहरा भेट देऊन निघून गेला.

            तो गेल्यावर दुसरा माणूस म्हणाला आपण चार-चार सुवर्णमोहरा वाटून घेऊ. पहिल्या माणसाने नकार देऊन सांगितले कि "माझ्या तीनच भाकरी होत्या त्यामुळे मला तीनच सुवर्णमोहरा व तुझ्या पाच भाकरी होत्या म्हणून तुला पाच सुवर्णमोहरा घे" यावर दोघांचीही वादावादी चालू झाली. यावर समाधानकारक मार्ग काढण्यासाठी ते मंदिराच्या पुजाऱ्याकडे गेले व आपली समस्या त्यांना सांगून सोडवण्याची विनंती केली. पण दोघेही दुसऱ्याला जास्त देण्यासाठी भांडत आहेत, हे पाहून पुजारीपण चक्रावुन गेला.”या मोहरा माझ्यापाशी ठेवून जा. मला विचार करायला वेळ द्या. मी उद्या सकाळी तुम्हाला उत्तर देतो.” असे पुजाऱ्याने सांगितले.

            पुजाऱ्याला खरेतर दुसऱ्या माणसाची पाच व तीनची वाटणी बरोबर वाटत होती, पण तरी सुद्धा तो खोलवर विचार करत होता. विचार करता करताच त्याला गाढ झोप लागली. थोड्याच वेळात त्याच्या स्वप्नात देव प्रकट झाला. पुजाऱ्याने सगळी घटना देवाला सांगून योग्य मार्गदर्शन मिळावे, अशी विनंती केली. माझ्या दृष्टीने तीनास पाच अशी वाटणी उचित आहे, असे देवाला सांगितले. देवाने स्मित करून म्हटले "नाही, पहिल्या माणसाला एक व दुसऱ्या माणसाला सात सुवर्णमोहरा मिळाल्या पाहिजेत.” 

            देवाचे म्हणणे एकूण पुजारी चकित झाला.”देवा, असे कसे.” पुजाऱ्याने विचारले. देव पुन्हा हसला व म्हणाला "यात काही शंका नाही कि पहिल्या माणसाने आपल्या तीन भाकऱ्याचे नऊ तुकडे केले. पण त्या नऊ तुकड्यापैकी त्याने आठ तुकडे खाल्ले व फक्त एकच तुकडा वाटला म्हणून त्याला फक्त एकच सुवर्णमोहरा मिळाली पाहिजे. दुसऱ्या माणसाने आपल्या पाच भाकऱ्याचे पंधरा तुकडे केले, आठ तुकडे स्वतः खाल्ले व सात तुकडे वाटले म्हणून त्याला सात सुवर्णमोहरा मिळाल्या पाहिजेत, हेच माझे गणित व हाच माझा न्याय आहे.” देवाच्या न्यायाचे हे अचूक विश्लेषण पुजारी नतमस्तक झाला.

            तात्पर्य :- आपली परिस्तिथीकडे बघण्याची व समजण्याची दृष्टी व ईश्वराची दृष्टी हे एकदम भिन्न असतात. आपण ईश्वराची न्यायलीला जाणण्यात व समजण्यात अज्ञानी आहोत. आपण आपल्या त्यागाचे गुणगान करतो, पण ईश्वर आपल्या त्यागाची तुलना आपले भोग व कर्म याच्याशी करून यथोचित निर्णय घेत असतो. आपण किती श्रीमंत आहोत हे महत्त्वाचे नाही, तर आपण किती त्यागी-भोगी आहोत, त्यावर आपले मूल्यमापन होत असते व कर्माचा हिशोब होत असतो.


  ___________________________________________________________________________________


अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.

ब्लॉग शेअर करा - 

                                 

ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com


__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________

फॉलोअर