ताडका
सोन्याचे
हरीण बनून सीतामातेला आकर्षित करून घेणाऱ्या आणि श्री रामाला पर्णकुटीपासून दूर
नेणाऱ्या मारीच राक्षसाची आई ताड़का होती. प्रचंड शक्तिशाली सुकेतु नावाचा अंत्यत बलवान यक्ष
होता. त्याला मुलबाळ नव्हते, म्हणून त्याने संतान प्राप्तीसाठी
ब्रम्हदेवाची घोर तपचर्या केली. ब्रम्हदेव प्रसन्न झाले त्यांनी सुकेतुला वर मागण्यास सांगितले. सुकेतूने हजार
हत्तीचे बळ असलेले अपत्य मागितले. ब्रम्हदेवाने तथास्तु म्हणून अपत्य प्राप्तीचे
वरदान दिले.
काही कालांनंतर सुकेतुला अतिशय सुंदर रूपवान अशी कन्या झाली. वरदान
म्हणून त्या कन्येच्या अंगात हजार हत्तीचे बळ होते. म्हणून तिचे नाव ताड़का ठेवले. ताड़का हा संस्कृत
भाषेतील स्त्रीलिगी शब्द आहे. ताडकाचा अर्थ ताडाच्या झाडाच्या पानासारखा विशाल, ताडाच्या खोडासारखा बलशाली
होतो. लग्नाच्या वयात आल्यावर सुकेतूने तिचा विवाह सुंद या राक्षसाशी करून दिला. सुंद
पासून मारीच नावाचा एक पुत्र झाला. मारीच हा सुंदचा मुलगा असूनही राक्षस नव्हता, पण खूप उग्र व उपद्रवी
स्वभावाचा होता. ताडका आणि तिचा परिवार अयोध्येच्या जवळ असणाऱ्या सुंदरवनात रहात होता.
आपल्या शरीरात असणाऱ्या बलामुळे ताडका, सुंद आणि मारीच उन्मत्त झाले होते. ते ऋषी मुनींचा
छळ करून त्यांना त्रास देत होते. त्याच्या प्रताडणेमुळे सुंदरवनाचे नाव ताडकवन झाले होते. त्याच्या
त्रासाला सर्वजण कंटाळून गेले होते. एकदा मारिचने पूर्ण वनात हाहाकार माजवला. ऋषींचे
यज्ञ उधळून
लावले. कंटाळून सगळे अगस्त्य ऋषींकडे गेले. त्याच्या कृत्यामुळे ऋषींनी शाप दिला व
तो एक राक्षस बनला. हे पाहून सुंद क्रोधीत झाला व अगस्त्य ऋषींना मारण्यासाठी
हल्ला केला. सुंद पुढे सरकताच अगस्त्य ऋषींनी आपल्या शापाने त्याची राख केली. पतीचा
मृत्यू पाहून रागाने ताडकेने ऋषीवर हल्ला केला. ऋषींनी तिलाही शाप दिला, त्यामुळे तिचे सुंदर, अत्यंत कोमल शरीर कुरूप होऊन
महाभयंकर राक्षसात रूपांतर झाले. त्रेतायुगात प्रभू रामाच्या हातून तुझा उद्धार
होईल, असे सांगितले.
पण बदललेले रूप पाहून क्रोधीत होऊन ताडकेने बदलाच्या भावनेने निरपराध मानवावर घोर अत्याचार करण्यास सुरुवात केली. एकदा ऋषी विश्वमित्र सुंदर वनातून जात होते. त्यांना ही सर्व परिस्थिती समजली. त्यांनी प्रभू रामाला व लक्ष्मणाला पाचारण केले. "ताडकाच्या अत्याचारातून सर्वाना मुक्त करण्यासाठी मी तुम्हा दोघांना येथे बोलावले आहे. ती एक स्त्री आहे, याचा विचार न करता तिचा वध करायचा, कारण ती एक शापित जीवन जगत आहे. सर्वावर अत्याचार करत आहे" अशी विश्वामित्रांनी आज्ञा केली. प्रभू रामांनी गुरूच्या म्हणजे विश्वमित्राच्या आज्ञेनुसार ताडकाचा वध करण्यासाठी सुंदरवनात गेले. तेथे त्यांनी आपल्या धनुष्याचा टणत्कार केला. त्यामुळे असह्य असा ध्वनी निर्माण झाला. ज्यामुळे सर्वत्र आरडाओरडा झाला. जो ऐकून वन्य प्राणी घाबरून पळू लागले. या सर्व प्रकारामुळे ताडका अनावर रागाने अक्राळविक्राळ गर्जना करत तेथे आली. तेथे रामाला धनुष्य बाणाने सज्ज झालेला पाहिला. तिला वाटले हा तर विश्वमित्रांनी आणलेला राजपुत्र आहे, तो नक्कीच माझे साम्राज्य उध्वस्त करू शकतो. ती क्रोधीत होऊन प्रहार करण्यास पुढे झाली, तत्क्षणी रामाने आपल्या दिव्य बाणाचा प्रहार केला. बाण वर्मी लागून ताड़का जागीच गतप्राण झाली. तिचे रूपांतर तिच्या पूर्वस्वरूपात झाले. ती एक सुंदर यक्षिणी झाली. तिने श्री राम, विश्वमित्र याना वंदन केले आणि आकाशात अदृश्य झाली.
___________________________________________________________________________________
अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.
ब्लॉग शेअर करा -
ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com
__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________