गपचूप जेव


गपचूप जेव




1970-80 च्या दशकातल्या पिढीवर हेच संस्कार झाले.  गपचूप जेव आणि गपचूप जेव.


" गपचूप जेव " ची कारणं अशी होती :


ठसका लागणार नाही.

तोंडांतलं बाहेर सांडणार नाही.

जेवणाकडे लक्ष दे.

पानात काय वाढलंय ते लक्षात घे.  चव बघ.

चावून खा.

19-20 मिनीटात जेवण संपव.

गरम अन्न आहे तोच खा.

पोटातल्या भुकेचा आणि ताटातल्या पदार्थांचा अंदाज घे म्हणजे जास्तीचे घेतलेच जाणार नाही आणि पानात आहे ते संपेल.

आणि


 last but not the least,


पुरूषांची पंगत झाल्यावर मुलं व नंतर बायकांची जेवणं व्हायची आहेत ह्याचं भान असून देत.


सकाळपासून रांधा, वाढा, उष्टी काढा यातच गुंतलेल्या बायकांना जेवायला मात्र सगळ्यात उशीरा मिळायचे.


काळ बदलला. चुकीच्या प्रथा उदा. मुलं आणि बायकांनी नंतर जेवायचे हे बंद झाले. सगळे गोलाकार एकदम जेवू लागले.  चांगली गोष्ट झाली.  थोड्या फार गप्पा सुरू झाल्या. शाळेतल्या गमती जमती, ऑफिसात काय झालं हे ताटावरच सांगितलं जायचं.  इथपर्यंत ठीक होतं.


पण आताशा मुलांचं जेवण हा एक चीड आणणारा प्रकार होऊ लागला आहे. 


आधी आज जेवायला काय आहे हा प्रश्न.  त्यावरून ह्यांच्या चेह-यावरचे भाव ठरणार. भुवया त्रासिक उंचावणार, तोंडं वेडीवाकडी होणार, काय आहे  " त्यावरून " भूक ठरणार.  " त्यावरून " पोट बिघडलेलं आहे हे ठरणार. "त्यावरून" मित्रानी बोलावले आहे हे ठरणार.  अगदीच कुठे जायचं नसेल तर आंबट चेह-यानी कसेतरी दोन घास खाल्यासारखे करणार. अन्न उरणार. घरातल्या बाईची, करणारीची पंचाईत होणार. दुस-या दिवशीची शिळवड वाढणार. 


त्याहीपेक्षा चीड आणणारी गोष्ट डायनिंग टेबल ही हल्ली बाहेरून आल्यावर हातातल्या वस्तू ठेवायची जागा झाली आहे.  टेबल खुर्ची ओढून चहू बाजूनी बसून मधे अन्न ठेऊन सगळे जेवत आहेत हे दृष्य घरात क्वचितच दिसते.  ते बघायचे असेल तर हाॅटेलात जा. तिथे अगदी जरूर दिसेल.  पण घरात ? नाव नको.  सदान् कदा TV चालू.  आताशा डोकं खुपसलेलं मोबाईलमधे.  आणि मुलं काय, मोठी काय, पुरूष काय अन् बायका काय, सगळे डिश घेऊन, हो हो डिश बरंका, ताट नाही त्या TV समोर चरत असतात.  बोडणात वाढल्या सारखे सगळे पदार्थं कुठेही " घालतात " आणि परत उठायला नको म्हणून एकदाच काय ते घेऊन जे जाऊन बसतात टीव्ही समोर आणि रवंथ करत की इतका वेळ आणि कष्ट घेऊन ज्या कुणी वाण सामानाचं रूपांतर चविष्ट पदार्थात केलेलं असतं त्याला चीड आणणारं हे प्रकरण असतं.  काय केलंय, काय घेतलंय डिश मधे, किती घेतलंय, परत हवयं का या कशा कशाचे भान नसते.  उदर भरण हा एकमेव हेतू ठेऊन गिळले जाते.  अरे बाबांनो जरा सांगा कसं झालंय ते.  अगदी नसेल चांगलं झालं तरी तसं सांगा, पण सांगा असं ओरडून सांगावसं वाटतं.  अर्ध्या एक तासानी जेव्हा अन्न चिवडून चिवडून संपतं आणि डिशमधे बोटं उगाचच चाचपडत राहातात तेव्हा हे महाशय उठणार आणि डिश सिंकमधे ठेवणार.  बास. झालं यांच काम. इतरांना अन्न उरलंय का, मागच्या लोकानी जेवलंय का. कशाचंही भान नसलेली ही पिढी बघितली की खरंच पटतं


गपचूप आणि गप का जेवावं ते.


एक गमतीदार किस्सा सांगून लिहायचं थांबवते

 

अशाच एका घरात वरील प्रसंगात  आई स्वयंपाकघरातून ओरडून हाॅलमधल्या टीव्ही समोर जेवत असलेल्या मुलाला विचारते

" अरे मटकीची उसळ आवडली का ? "


TV किंवा मोबाईलवरची नजर तसूभरही न ढळता मुलगा तसाच म्हणतो कसा


" हो गं आई, आवडली.  मधे मधे बोलू नकोस.  माझी लिंक तुटतीए  ".

मागून येऊन आई मुलाच्या पाठीत धपाटा घालत म्हणते " अरे कार्ट्या, मटकीची उसळ ना आज केलीए, ना वाढलीए. कुठून आवडली रे तुला ? "



 ___________________________________________________________________________________


अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.

ब्लॉग शेअर करा - 

                                 

ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com


__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________

फॉलोअर