अनोखी वारी

                              अनोखी वारी 

                              


                              रुक्मिणीबाई नेहमीप्रमाणे तिच्या सुनेवर खेकसत होती. सून तिच्या वरची."ये म्हातारे, माझ्या आयवर जाऊ नको. दिसाच्या इस-पंचीस भाकऱ्या थापायच्या म्हंजी काय गंमत वाटली काय तुला? त्या करून अजून तिकडं अंगणवाडीत खिचडी शिजवायला जायचं असतंय मला. जरा येळ झाला कि ती बाय वरडती, त्यात आता येळच्या येळी फोनवरुन वर कळवावं लागतं. तुमास्नी काय कळणार हाय त्यातलं. पातळ पातळ भाकऱ्या थापत बसले तर घरला बसावं लागलं मला कायमच. जे बनतंय ते खावा गुमान, नायतर थापा भाकऱ्या तुमि." त्या दोघीचा तो अवतार पाहून ताटातली भाकरी फडक्यात बांधून घेऊन विठू तिथून उठला आणि बाहेर आला. अंगणात शेंबूड पुसत चिंट्या खापरासोबत खेळत होता आणि तिथेच कोपऱ्यात खाटेवर दिग्या घोरत पडला होता. त्याच्याकडे पाहून रात्री झिंगला असणार चांगलाच म्हणत विठूने भाकरीच फडकं सायकलला अडकवून सरळ शेताच्या दिशेने निघाला. 

                              

                               देशमुखच्या शेतातील चाकरी करण्यात विठूचा जन्म गेला होता. त्याच्यातला प्रामाणिकपणा आणि कष्टाळू वृत्ती मुळे देशमुखानेही त्याला जपला होता. आता वयामुळे फारस काम व्हायचं नाही, तरीही जमेल तितकं तो करीत रहायचा. पेरणीचे दिवस होते. शेतात काम जोरात चालू होती. पण यंदा विठूच मन कशातच लागत नव्हतं. दरसालची त्याची वारी यावर्षी चुकणार होती. त्यामुळे त्याचा चेहरा जरासा सुकलेलाच होता. आपलं काम भलं, आपण भलं असं म्हणणारा विठू पंढरीच्या विठोबाचा मोठा भक्त होता. दरवर्षी न चुकता वारीला जायचा. इतरवेळीही शेतातली काम उरकली कि संध्याकाळी भजन कीर्तनात रमायचा. त्याची बायको रुक्मिणी सारखी त्याला बोल लावायची. फारशी कसलीच महत्वकांक्षा नसलेला विठू दोन वेळच मिळालं, तरी खूप झालं म्हणत. आयुषयभर चाकरी करत राहिला. घराकडे त्याच अजिबात लक्ष नसायचं. दिसभर शेतात आणि रात्र देवळात असं सार त्याचा दिनक्रम होता. हाताशी आलेला लेक दारूच्या पायात वाया जात होता. तान्ही नातवंड, मरमर करणारी सून आणि वैतागलेली बायको. घरी हे असं चित्र होत आणि विठू मात्र विठोबाचं नाव घेत सरळ डोळे मिटून बसायचा. त्यामागे त्याची भक्ती जरी असली तरी त्या परिस्तिथीतून सुटण्याचा, तिच्याकडे कानाडोळा करण्याचा त्याने शोधलेला एक मार्ग होता. हे आत त्यालाही कुठेतरी ठाऊक होते. दरवर्षीची वारी त्याला यासाठीच प्रिय होती. चागले पंधरा वीस दिवस या सगळ्यापासून दूर जायचं, नवीन माणसात रमायचं, भजन कीर्तनात रंगून जायचं याहून मोठं सुख त्याला दुसरं कुठलं वाटत नव्हतं. 

                              

                              शेतात पोचल्यावर त्याने सायकल लिंबाखाली लावली. भाकरीच फडकं झाडाच्या फांदीला अडकवलं आणि रोजच्या कामाला लागला. शाळा बंद असल्याने इंग्रजी शाळेत शिकणारी देशमुखांची नातं आजकाल बऱ्याच वेळा शेतात येऊ लागली होती. आज्यासोबत विहिरीवर आंब्याच्या झाडाखाली ती बसलेली विठूला लांबूनच दिसली. विठू दिसला कि ती नेहमी धावत यायची, पण आज तिथेच बसलेली पाहून तोच तिच्यापाशी गेला. तिच्या समोरचा अभ्यासाचा पसारा पाहून म्हणाला "धाकल्या मालकीणबाई, लईच कामात हायसा." आज त्यावर ती खरेच मोठ्या कामात असल्याचा आव आणून म्हणाली "हो, आता माझी ऑनलाइन शाळा सुरु झालीये, विठू मामा. घरात नेटवर्क नसत म्हणून मी इथे येऊन बसलीये. आता थोड्या वेळाने माझे सर या फोनमधून मला शिकवणारं."

                              

                              "आर देवा, लईच अवघड म्हणायचं हे. यंदा सम्दच तुमचं हे ओनलेन का काय म्हणत्यात तस झालंय. इठोबाच दरसन सुदिक फोनवरच घडणार हाय मन आमास्नी." विठू कौतूकाने तिच्याकडे पहात म्हणत होता. मग तिने पुस्तकात तोड खुपसलं आणि विठू त्याच्या कामाला लागला. ती वाचत असलेल्या वाक्यातील 'गॉड' हा शब्द ओळखीचा वाटून विठू तिला म्हणाला "ह्येचा अर्थ काय धाकल्या मालकीणबाई? जरा अमालाबी शिकवा कि." हे ऐकून तिच्या अंगावरच मांस कणभर वाढलं. ती म्हणाली "विठूमामा, हे सोपं नाही. अजून हा धडा शिकवला नाहीये आमाला, पण देव सगळीकडे असतो, आधी आपल्या आतील देव शोधला, असा काहीतरी याचा अर्थ आहे." असे म्हणून तिने पुन्हा पुस्तकात तोड खुपसलं. ते एकूण विठू थोडा अंतर्मुख झाला. आपल्या आतला देव मंजी काय? देव तर देवळात असतुया, तो आपल्यामदीं कसा ईल, पण आता ह्या बुकात लिव्हलंय मंजी खरं असलं कि. दिवसभर हा विचार त्याच्या डोक्यात घोळत राहिला. 

                              

                              रात्री मग मंदिरात गेल्यावर त्याने भटाला विचारले "देव आपल्या मदी असतुया मंजे काय हो महाराज?" तो भट आधीच आपण किती ज्ञानी आहोत, हे गावभर दाखवत फिरायचा. विठूने त्याला आयती संधी दिली ज्ञान प्रदर्शनाची."अरे देव घराघरात आहे विठोबा, अगदी ह्या मांजरीच्या पिल्लात सुद्धा. आपल्याला फक्त पहाता यायला हवं." "अन मग दिसायचा कसा तो. म्हंजी शोधावं कस त्याला?" विठू विचारत होता."फार काही कठीण नाही ते विठू. सदाचरण आणि कर्तव्य पालन या दोन गोष्टी आपण करत राहिलो, तर देव आपसूक आपल्यात वास करतो. आपले मन समाधान आणि शांतीने भरून जाते आणि मग घडत त्या आतल्या देवाचं दर्शन." "तुमाला घडलं होय कधी त्या देवाचं दर्शन?" विठूच्या निरागसपणे विचारलं. मग भट जरा सावरत म्हणाला "नाही म्हणजे घडत तस, कधीकधी प्रयत्न करत रहावं लागत बाबा." असं म्हणून कुणीतरी देवासमोर वाढवलेला नारळ पिशवीत टाकून तिथून निघाला. 

                              

                              भट कसाही असला तरी त्याच म्हणणं विठूला भावलं. रात्रभर अंगणात पडून तो विचार करत राहिला आणि त्याला जाणवलं कि आतला देव शोधण्याचा मार्ग वाटतो तितका सोपा नाहीये. डोळे सताड उघडे ठेवून स्वतःकडे पाहणे, परिस्थितीकडे पाहणे, दत्त म्हणून समोर उभ्या अडचणींकडे पाहून सोपं नाही. इतके दिवस आपण निवडला तो सोपा मार्ग डोळे बंद करून घायचे, प्रश्नांकडे पहायचेच नाही, म्हणजे ते सोडवण्याचा प्रश्नच उभा ठाकत नाही. मग बऱ्याच वेळाने काहीतरी निश्चय केल्यासारखा तो उठून आत आला. कुडकुडत झोपलेल्या बायकोच्या अंगावर गोधडी टाकली आणि तोसुद्धा झोपी गेला. 

                              

                              दुसऱ्या दिवशी सकाळी जरा लवकरच उठून तो देशमुखांकडे गेला आणि दिग्यासाठी स्वतःचा शब्द खर्ची घातला. कधी काही न मागणाऱ्या विठूचा देशमुखानेही मान राखला आणि दिग्यासाठी कारखान्यावर काहीतरी काम पहातो असं आश्वसन दिल. 

                              

                              तिथून विठू घरी आला. तो घरात दिग्या झिंगून तमाशा करत होता. रात्रभर बाहेर दिवे लावून आता घरी आला होता. तो आई व बायको सोबत भांडत होता. विठू पुढे झाला, दिग्याची कॉलर धरून ओढत अंगणात घेऊन आला, दोन कानशिलात दिल्या. दिग्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. त्याला कळेना कधी तोंडातून ब्र सुद्धा न काढणारा आपला बाप आज हे काय करतोय. विठू त्याला म्हणाला "लक्ष देऊन ऐक दिग्या, हे असले तमाशे ह्यापुढ माझ्या घरात चालणार नाहीत. प्यायचं असलं तर नीट घराबाहेर व्हायचं. पुन्यांदा तोड दाखवू नको तुझं. ह्या पोरीला अन लेकरांला मी सांभाळीन. हित राह्यचं असलं तर दारूला हात बी लावायचा नाही. देशमुखाशी बोलून आलोय मी. कारखान्यात नोकरी देतो म्हणालेत. तुला कष्ट करून चटणी भाकरी खायची. समजलं काय, आता तू ठरीव रस्त्यावर भीक मागायची का बायको लेकरासगट सुखानं जगायचं." ते सगळे अवाक होऊन विठूकडे पहात राहिले. त्याने दिग्याला बाहेर काढला आणि "शुद्धीत आल्यावर घरला येऊन साग, काय ठरिवलंस ते." असं म्हणून दार लावून घेतलं. 

                              

                              रुक्मिणी आ वासून बघत राहिली. तिला तरुणपणीच विठू आठवला. पण तो नक्की कधी गप्पगप्प होत गेला, ते मात्र आठवत नव्हते. तिच्या त्या चेहऱ्याकडे पहात विठू म्हणाला "जरा च्या टाका रुक्मिणीबाई. लई दिस झाले तुमच्या हातचा फक्कड च्या पिऊन." विसमय आणि आनंदाने भरून रुक्मिणीबाई स्वयंपाकघरात गेली. भेदरलेल्या नजरेने अवाक होऊन उभ्या असलेल्या सुनेकडे पाहून विठू म्हणाला "सुनबाई तुमच्या जाड भाकरी गॉड लागत्यात बरका मला. आता आमची कवळी म्हातारी झाली. पातळ भाकरी चावत बी नाय. तुमि जावा तुमच्या कामाला, चिंत्याकडं बघतो म्या." आनंदाने डोळे पुसत जी अण्णा म्हणून ती कामाला गेली. 

                              

                              थोड्यावेळाने रुक्मिणीच्या हातचा फक्कड चहा पीत विठू रुक्मिणीला म्हणाला "दुपारच्यान तालुक्याला जाऊ डॉक्टरांकडं. गुडघ दुखत्यात नवं तुझं." भरलेल्या डोळ्यानं त्याच्याकडं पहात रुक्मिणीने होकाराथी मान हलवली. तिच्या डोळ्यातलं तो आनंद व समाधान पाहून कोनाड्यातल्या विठोबाच्या मूर्तीकडे पाहिल्ययावर विठूला जाणवलं हि आतल्या मार्गाने मनातल्या पंढरीकडे नेणारी वारी जास्त मनोहर आहे आणि हा प्रवासही खूप सुंदर आहे. त्याने समाधानाने डोळे मिटले आणि डोळ्यासमोर आलेल्या त्या सावल्या पांडुरंगाकडे पाहून तृप्त मनाने हसला.


 ___________________________________________________________________________________


अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.

ब्लॉग शेअर करा - 

                                 

ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com


__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________

फॉलोअर