कहाणी चमचाभर तुपाची
दहा पंधरा वर्षांपूर्वी मी असाच आपला निवांतपणानं घरातल्या झोपाळ्यावर मंद झोके घेत बसलो होतो, एकटाच. कारण घरात दुसरं कोणी नव्हतंच. मुलगा, सून त्याच्या-त्याच्या ऑफिसात आणि नातू क्लासला, पत्नी तर केव्हाच देवाघरी गेली होती. साधारण श्रावण महिना चालू होण्यापूर्वीच चार-आठ दिवस असावेत. विचार केला, बँकेच्या लॉकरमध्ये आणि घरातही कपाटात बऱ्याचश्या चांदीच्या वस्तू वर्षोगणती नुसत्याच पडून आहेत, तर त्या देऊन टाकून त्याऐवजी देवाच्या पूजेसाठी लागणारी चांदीची नवी उपकरणे घ्यावीत.
दुसऱ्या दिवशी घरातल्या त्या वस्तू एका बॅगेत भरल्या. बँकेत जाऊन लॉकरमधल्याही चांदीच्या वस्तू घेतल्या, अन रिक्षाने थेट लक्ष्मी रोड गाठला. चांदीचे भाव तेव्हा आता सारखे अस्मानाला भिडलेले नव्हते. सारा व्यवहार पूर्ण करून नव्या वस्तू नीट काळजीपूर्वक बॅगेत ठेवून दुकानातून बाहेर पडून त्याच बाजूच्या फुटपाथवरून निघालो. मध्ये जराशी विश्रांती घ्यावी म्हणून एका हॉटेलमध्ये जाऊन मस्तपैकी मसाला दूध मागवले. घोट-घोट घेत होतो. घाई तर काहीच नव्हती.
एक-दोन टेबल सोडून समोरच्या बाजूला एक गृहस्थ बसला होता. एकंदरीत पाहता तोही एक जेष्ठ नागरिक वाटत होता. माझ्यासारखाच बऱ्यापैकी टक्कल, डोळ्यावर बारीक सोनेरी काड्याचा चष्मा, लाल-काळ्या पट्ट्याच्या टी शर्ट पॅन्ट, बाजूला ठेवलेली एक प्लॅस्टिकची पिशवी. का कोण जाणे, तो अधूनमधून टक लावून पहात होता माझ्याकडे. मी अस्वस्थच व्हायला लागलो. का बुवा हा असा माझ्याकडे बघतोय. त्या समोरच्या माणसाने साबुदाणा खिचडी संपवून पाणी पिऊन तोंड पुसलं. प्लास्टिक पिशवी डाव्या हाती घेऊन झटक्यात तो माझ्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसला. हि काय नसती भानगड?
"माफ करा, माझा आपला परिचय नाही, पण तू, सॉरी तुम्ही शरद दीक्षित का? रमणबाग शाळेत होतात का?"
"हो हो, का बरं, तुम्हाला कस काय ठाऊक?"
"साल्या, विसरलास मित्राला? मी सुदाम दामले, लोखण्डे तालमीजवळ रहायचो. तू सदाशिव पेठेत रहायचंस. आपली घरं पण एकमेकांना चांगली माहित होती. एका वर्गातच होतो ना आपण? लक्षात आलं का?"
"अरे दामले तू इकडे? कुठे असतोस? आता घर कुठेय? काय करतोस काय?"
"अरे हो हो, जरा हळू हळू घे ना गाडी. पूर्वी लोखण्डे तालमीजवळ, नंतर नोकरीला लागल्यावर बरीच वर्ष शुक्रवार पेठेतल्या खडक पोलीस लाइन वसाहतीत, त्यांनतर निवृत्त झाल्यावर सध्या काही वर्षांपासून बिबवेवाडीत माझा छोटासा बंगला आहे, श्रीपाद सावित्री धाम नावाचा, तिथे, एकटाच. आता म्हणशील तर इकडे जरा काम होत म्हणून आलो होतो. श्रावणासाठी जरा खास खरेदी होती अन नातवाला वाढदिवसाला सोन्याची चैन घ्यायची होती. आई-बाबा नाहीयेत आता. दोन्ही जुळी मुलं रमेश अन सुरेश हि आपापल्या संसारात रमली आहेत, त्याच्या मुलासह. म्हणून मी एकटाच. पत्नी वारली कॅन्सरनं काही वर्षपूर्वी."
थोड्या वेळानं दामले म्हणाला "अरे असं करायचं का, श्रावण आता जवळच आलाय. सोमवारी सत्यनारायणाची पूजा करायची म्हणतोय मी. तू त्या दिवशी सकाळी ये. मग रात्री मुक्कामालाच रहा. खूप खूप बोलावंसं वाटतंय रे तुझ्याशी. माझ्या मुलं सुनाच काही खरं नाही, नातवंड तर फिरकत सुद्धा नाहीत. हा पण श्रावणामुळं गुरुजींचा जरा प्रश्न पडणार असं वाटतंय."
"ती चिंता नको करुस. एक गुरुजी आहेत, हा पण दक्षिणा भरपूर द्यावी लागेल. म्हणजे पहा पूजेची दक्षिणा, भोजन दक्षिणा, जाता येताच रिक्षाभाडं असं सारं व्यवस्थित भागवावं लागेल. पण सारं व्यवस्थित होईल. उत्तरपूजेच्या संकल्पासह समजलं."
"अरे चालेल चालेल, खर्चाचा काही प्रश्न नाही. तू सारं ठरवून टाक. काही ऍडव्हान्स देऊन ठेवू का? पण कोण आहेत हे गुरुजी?"
"कोण म्हणजे मी स्वतः. मला सारं सारं येतंय सुदाम्या अजूनही."
"अरे वा वा. हे तर सोन्याहून पिवळं झालं."
हॉटेलचं बिल देऊन टाकून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. पत्ते एकमेकांना दिले होतेच.
श्रावण आला, सोमवार उजडला. नकाशासह पूर्ण पत्ता दामलेन दिला होता. मी रिक्षाने तिथे पोहचलो. दामलेंचा छोटासा टुमदार बंगला. खरच झकास होता. तो बाहेरच बागेत गवत खुरपत होता. धावत रिक्षापाशी आला. अरे अरे म्हणेपर्यंत त्याने रिक्षाभाडं रिक्षाचालकाच्या हाती कोंबलसुद्धा. प्रवेशदारावर आणि बंगल्याच्या नावावर सुंदरसे हार लावले होते. हॉलमध्ये सनईचे मंद सूर लहरत होते. त्याच्या चेहऱ्यावर मला पाहून झालेला आनंद नुसता ओसंडत होता. त्याच्या नेहमीच्या स्वयंपाकाच्या मावशींनी सारी तयारी जय्य्त केली होती. सारा स्वयंपाकही त्याच एकहाती करत होत्या. आम्हा दोघांसाठी त्यांनी मस्त बिनसाखरेची कॉफी केली आणि चालतील अशी बिस्किटेही दिली.
बाहेर दोन कार थांबल्या. सुरेश त्याच्या पत्नीसह आणि रमेश एकटाच असे आले होते. रमेशच्या घरी त्याच्या पत्नीच्या मैत्रिणीचा 'टू सेलिब्रेट द फस्ट मंडे ऑफ श्रावणा' कार्यक्रम होता. दामलें माझी ओळख करून दिली."हाय अंकल" त्यांनी म्हंटले. अन मी मनातच 'हाय रे कर्मा' म्हंटल. पूजा भोजन सार यथासांग पार पडलं. त्याची मुलं अधूनमधून भिंतीवरच्या घड्याळाकडे पहात होती. मला आपलं वाटलं, आजी आजोबाच्या हार घातलेल्या फोटोकडे पहात असतील. नमस्कारही करतील. कदाचित पण कसचं काय, जेवण झाल्या-झाल्या लगेच ते सारे निघूनही गेले, पुन्हा एकदा हाय करून.
"आता झोप काढ रे मस्तपैकी. दमला असशील सकाळपासून" तो आस्थेनं म्हणाला. खरच माझे डोळे पार मिटायला आले होते. किती वेळ झोपलो कुणास ठाऊक? जागा झालो तर बाहेर अंधारून आले होते. आम्ही बाहेर जरा एक चक्कर मारून आलो. गोळ्या घ्यायला आधार म्हणून सकाळचंच थोडस गरम करून खाऊनही घेतलं.
बेडरुममध्ये बसल्यावर मला दामले म्हणाला "तुला म्हंटल होत ना मी, तुझ्याशी खूप बोलायचंय म्हणून. तर आता सार सांगतो दोस्ता. रमणबागेतून एम एस सि झाल्यावर तू तर कॉलेज जॉइन केले. मला ते शक्यच नव्हतं. परिस्थितीच तशी नव्हती. वडील म्हणजे आमचे अप्पा. एका जरा मोठ्या स्टेशनरी मार्ट मध्ये नोकरी करत होते.
शिवाय धाकटा भाऊ तर शाळेतच होता. मग मी पण एक फालतूशी नोकरी पकडली निमूटपणानं. तुला आठवत असेल बघ मी शाळेच्या फुटबॉल टीममध्ये बऱ्यापैकी खेळाडू होतो. केवळ त्या पुण्याईवर पुढे पोलीस खात्यात निवड झाली. काही वर्षांनी मग आम्ही सारेजण खडक पोलीस लाइन शुक्रवार पेठेत रहायला गेलो. धाकट्या भावाचं शिक्षण संपून बऱ्यापैकी सर्व्हिस त्याला मिळाली. अप्पाच्या मित्राच्या मुलीशीच माझं लग्न झालं. धाकट्या भावानं छोटासा प्लॅट वडगावला शेरीला घेतला. सार तस मार्गी लागलं अन आईचा कॅन्सरनं घास घेतला. दरम्यानच्या काळात कोण कुठला देव पावला कोण जाणे, खात्या अंतर्गत परीक्षेत मी पी एस आय झालो. दाराशी सायकल ऐवजी मोटारसायकल आली. मुलाची प्रगतीपण छान झाली.
तर बघ असाच श्रावण महिना अन पहिला सोमवार होता. मी ड्युटी अड्जस्ट करून घेतली होती. दुपारी घरी आलो. संध्याकाळी दिवेलागणीच्या सुमारास बायकोनं उपवास सोडण्याच्या दृष्टीने जरा लवकरच स्वयंपाक केला. देवाला दाखवून ताट वाढली. गोड म्हणून पानात साखरांबा होता. प्रभानं तूप वाढायला घेतलं. भात-वरण अन साखरबांवर पण तूप घातलं. "जरा अजून एक चमचा तूप साखरंब्यावर घाल. छान लागत." अप्पा म्हणाले. मी एक उपरोधिक कटाक्ष त्याच्याकडे टाकला. माझी ती नजर अप्पानी अचूक पकडली अन एकदम कसनुसं हसले रे मित्रा. बायको पण त्यांना बोलली. ते सहन न होऊन अप्पानी भरल्या पानाला नमस्कार केला आणि पानावरुन उठले. बाहेरच्या पडवीत निघून गेले. नित्याप्रमाणे मधलं दार ओढून घेतलं.
सकाळी बायकोनं अप्पाना उठवायला सांगितलं. मी दार ढकललं. सवयीप्रमाणे अप्पानी नीट घड्या घालून सगळं ठेवलं होत. अन, अन अप्पा गादीवर नव्हतेच मुळी. मी मागेपुढे सगळीकडे पाहिलं, पण कुठेच काही नाही. शेवटी वसाहतीच्या सार्वजनिक संडासाच्या लाइनीतही पाहिलं. कुठेच सापडले नाहीत.
मला बंदोबस्ताची ड्युटी लागली होती. जाणं तर भागच होत. बायको म्हणाली "तुम्ही जा हो ड्युटीवर. बहुतेक पहाटे पर्वतीला फिरायला गेले असतील. जेवायच्या वेळेपर्यंत येतील." मी दिवसभर ड्युटी करून घरी आलो. तरी अप्पाचा पत्ताच नव्हता. फडगेटवर जाऊन रिपोर्ट केला. गुपचूप घरी काही ना सांगता ससून हॉस्पिटलला चौकशी करून आलो. पण काहीही उपयोग झाला नाही.
ज्यांनी मला हे जग दाखवले, ज्याच्या हाताचं बोट धरून मी पहिलं पाऊल टाकलं, ज्याच्या खांद्यावर बसून मी आजोळच्या कुस्त्या पहिल्या, त्या माझ्या अप्पाना मी माझ्या जीवनातून उठवून लावलं होत. कुठे गेले असतील विश्वाच्या अफाट पसाऱ्यात ते? ज्याच्या हाताने चिमणचारा खाल्ला, त्याच्याकडे साध्या एक चमचाभर तुपाखातर विखारी नजर टाकली मी. पार माझ्या जन्मापासून मी अप्पाचा आणि ते माझे होते. माझं मन मनचं होत कि मनामनाच्या बेड्या हाती पायी ठोकून गेंड्याची शंभर कातडी अंगावर बांधून त्याला एखाद्या आधारकोठडीत डांबलं होत कुणी ?
काही दिवस आसपास कुजबुज झाली, मग सार थंडावल. आम्ही कधी-कधी कौटूंबिक सहलींना जायचो. खरं म्हणजे मी मनातून धास्तावलेलाच असायचो. कुठे अचानक अप्पा दिसतील का? तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी मी हळूच कुठे-कुठे नजर टाकायचो. खरं म्हणजे मनाशी मी म्हणायचो निर्लज्जपणाने कि 'आता एवढ्या वर्षांनी मला अप्पा कुठे आढळूच नये, दिसले तरी मी त्यांना ओळखूच शकणार नाही, असे बदललेले असावेत. '
कालचक्र सुरूच असत ना. माझ्या पत्नीला अन्ननलिकेचा कॅन्सर झाला. साऱ्या उपचारां नंतरही काही उपयोग झाला नाही. तिला खाणंपिणं मुश्किल झालं अन अखेरचा श्वास घेतला. नंतर मी निवृत्त झालो. सरकारची भक्कम पेन्शन आहे. नशिबानं मुलं हुशार होती. त्यांच दैव उजळले, छान मार्गी लागली. त्याच्या पंखांमध्ये बळ आलं, आपापली घरटी झाली, दोघांचे लग्न झाले, मला नातवंड झाली. बंगला केव्हाच पूर्ण झाला होता. आता मी एकटा, अगदी एकटा-एकटा पडलोय रे. कितीतरी वर्षांपासून वेळप्रसंगी दुखणखुपण्याचं बघतात, सढळ हाताने खर्चही करतात, चोवीस तास मेल नर्सही ठेवावा लागलाय कधी-कधी. पण तुला कदाचित खोटं वाटेल, कुणीही कधीही चुकूनसुद्धा मला म्हणाल नाही कि 'अण्णा पुरे आता चला आमच्याकडेच. ' आजच्याच तू पाहिलंस ना? हा सुद्धा नियतीचाच न्याय म्हणायचं ना. माझ्या बाबतीत पुरेपूर दुर्दैव दुसरं काय?
ज्या माझ्या उपरोधिक कटाक्षानं मी अप्पाना घायाळ केलं, लाचाराप्रमाणे ते बिचारे कसनुसं हसले, ती माझी दृष्टी, नजर अनेक वर्षाच्या डायबिटिसमुळे डायबिटिक रेटिनोपॅथीच्या पंजात सापडलीय. चिकार खर्च झाला आतापर्यंत. काय करणार तरी काय नेत्रज्योतीचं? प्रकाशच जर निमाला तर मी अंध होऊन पुढचं जीवन कस काय घालवणार? या अवस्थेत झोप येतीय का रे दीक्षित? कंटाळलास का रे माझ्या रडकथेला?"
"छे रे दुपारी एवढी झकास झोप झालीये ना अन रडकथा कसली म्हणतोयस प्रभ्या? कुणावर कसली वेळ येईल काही सांगता येत का? एवढ्या वर्षांनी योगायोगानं आपली भेट झाली अन मी तुझ्याकडे आलो ते काय फक्त पुख्खा झोडायला? मग मित्र कशाला म्हणायचे तू बोल पुढं."
"बोलायला तोंड कुठेय मला. जुन्या जमान्यातली कुटूंबवत्सल सुगरण माझी आई अन साधे सरळ अप्पा आणि मी हा असा त्याचा दिवटा, करंटा, नेभळट चिरंजीव. एखादा बापाबरोबर स्वतःही उपाशी झोपला असता. निव्वळ निष्क्रिय आळशी अजगरासारखाच वागलो ना. झडझडून शोध घेतला का अप्पाचा सार आकाश पातळ एक करून. तुला सांगतो रे, सरसरून काटा येतो अंगावर विचार केला कि. डोक्यावरची सावली सोडून, मायेच्या मुलं माणसाविना, अंगावरच्या फक्त कपड्यानिशी, खिशात फुटकी कवडीही नाही, अशा अवस्थेत एवढी वर्ष अप्पा कुठे कसे-कसे भटकले असतील, उन्हा-पावसात, थंडी-वाऱ्यात काय हाल झाले असतील, काय खाल्लं असेल, काही दुखलं-खुपलं तर काय केलं असेल माझ्या पित्याने. आता तर ते या जगातही नसतील ना रे. सावरीच्या गादीवर मखमली रझई पांघरून मी झोप काढत असताना एखाद्या तरटा-गोणपाटावर ते कुठे, कसे झोपले असतील? एखाद्या देवळाच्या ओवरीत नाहीतर दुकानाच्या फळी पायरीवर अखेरचा श्वास घेतला असेल ना रे माझ्या बापानं. अन मी त्याचा हा निगरगट्ट मुलगा हातीपायी धड धाकट असताना मुन्सिपाल्टीच्या लोकांनी बेवारस मृतदेह गाडीतून नेला असेल ना वासलात लावायला. उठ रे मित्रा चल, बाहेर हॉलमध्ये सत्यनारायणासमोर मला फरफटत खेचून ने अन तुला असेल-नसेल ती सारी सारी ताकत एकवटून मला चांगला थोबाडून काढ. जमिनीवर ढकलून लाथाबुक्क्यांनी बुकलून काढ. पार नाकातोंडातून रक्ताच्या धारा वाहू देत रे या नालायकाच्या."
प्रभाकर थरथर कापत होता. डोळे लालबुंद झाले होते त्याचे. ओक्सबोक्शी रडतच बोलत होता. मी झटक्यात त्याच्या जवळ सरकलो. त्याच्या डोक्यावरुन पाठीवरून थोपटत मायेन म्हणालो "दामले एवढा नको रे त्रास करून घेऊ. जे होऊन गेलं ते ब्रम्हदेवालाही नाही निस्तारता येणार ना. पुढचं सारं तर अज्ञानतेच्या घनगर्द काळ्या कभिन्न पाताळगर्ते सारखंच असत रे. तू आता ज्या पश्चातापाच्या वणव्यानं परस्पर होरपळून गेला आहेस, पुरालाही लाजवणाऱ्या अश्रुपुरात चिंबचिंब झाला आहेस, त्यामुळे मी नक्की सांगतो कि तुझ्या अप्पाच्या आत्म्याने त्याच्या या लेकराला अगदी हमखास क्षमा केली असेल. खात्री बाळग. शांत हो रे दोस्ता." बळेबळे मी त्याला बेडवर आडवा केला. म्हंटल "त्याच्याकडे ये असं तुला तुझी मुलं म्हणत नाहीत ना. अरे जाऊ दे ते. तू तुझी हि सुंदर वास्तू उभारलीस ना छान पैकी. आई अप्पाच नावही दिल आहेस ना. मग त्याचीच हि मायेची पाखर सोडून कशाला कुठे जायचं." अगदी अगदी प्रसन्नपणाने दामले हसला. माझा दुसरा हात त्याने घट्ट पकडून ठेवला होता. मी हुंदका आवरत हळूहळू त्याला थोपटत राहिलो. माझा हात हलकेच सोडवून घेतला. तो भाबडा जीव निद्राधीन झाला. मंद मंद घोरायलाही लागला.
दुसऱ्या दिवशी झोपेतून सकाळी उठायला मला जरा उशीरच झाला. दामले केव्हाचाच उठला होता. सत्यनारायण पूजेचं सार त्यानं नीट आवरून पॅक करून ठेवलं होत. प्रत्यक्ष द्यायला म्हणून दोन पान, सुपारी, नारळ आणि त्याखाली दक्षिणा वगैरे होती. चौरंगावर ते पाहून मी म्हणालो "हे बघ दामले हे सत्यनारायणाचं जे सार आहे ना ते प्रसाद म्हणून वापरून टाक. शास्त्र म्हणून अकरा रुपये, नारळ माझ्या हाती देऊन मला नमस्कार कर अन तिथे ठेवलेले पैसे आहेत ना, त्याच तुझ्या नातवंडांना आवडेल असा खाऊ दीक्षित आजोबांकडून म्हणून द्यायचा न विसरता बर का. तू नाही नको म्हणायचं प्रश्नच येत नाही. ती माझी दक्षिणा आहे आणि मी ती अशीच वापरायची ठरवली आहे. अन हो, सकाळच चालणं म्हणून मी या लेनने सरळ थेट मेनरोड पर्यंत जाऊन नंतर रिक्षा पकडणार आहे. हसतमुखानं मला निरोप द्यायचा आहेस, नाहीतर पुन्हा तुझ्याकडे फिरकणार नाही."
बंगल्याच्या दारापर्यंत तो आला. हुंदका आवरून मला मिठी मारून म्हणाला "येत जा रे दोस्ता अधूनमधून. खूप समाधान सांत्वन वाटलं तुझ्या काल रात्रीच्या बोलण्यानं."
मी निघालो. कमालीचा संयम मनावर ठेवून, एकदाही मागे वळून न बघता, थेट मेनरोड गाठला, तृप्त तृप्त मनाने.
तर अशी हि चमचाभर तुपाची कहाणी.
___________________________________________________________________________________
अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.
ब्लॉग शेअर करा -
ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com
__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________