मथुरा राज्याचा उदय
मथुरा हे नाव जरी ऐकलं तरी डोळ्यासमोर येते ती यमुनेकाठी वसलेली एक सुंदर नगरी ज्या नगरीला श्री कृष्णांचे वास्तव्य लाभले. पौराणिक तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेले हे शहर भारताच्या उत्तर प्रदेश राज्यात आहे. मथुरा या नगरीचा उल्लेख महाभारतात प्रामुख्याने आढळतो. पण ही नगरी रामायणाशी ही जोडली गेलेली आहे. याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी खालील माहिती उपयोगी पडेल.
फार पूर्वी मथुरेचा हा भाग अतिशय घनदाट अरण्यमय होता. तिथे मधू नावाचा राक्षस राज्य करीत होता. तो जातीने राक्षस असला तरी वृत्तीने देवासमान होता. त्याच्या या राज्याला मधुपुरी अथवा मधुबन असे नाव पडले होते. या अरण्यात अनेक ऋषी मुनी निर्वेधपणे तपश्चर्या यज्ञभाग आदी कार्ये करीत असत. इतर प्रजाही सुखी होती. पण म्हणतात ना, ओटी आलेला नारळ आणि पोटी आलेला मुलगा कसा निघेल सांगू शकत नाही, अगदी तसेच इथेही घडले. मधुच्या नंतर त्याचा मुलगा लवण हा राजा झाला. पण तो अत्यंत दुष्ट आणि जुलमी होता, असुरी वृत्तीने वागणारा होता. ऋषीमुनींच्या तपश्चर्येचा यज्ञभाग कार्यांचा विध्वंस करू लागला. तेव्हा प्रमुख ऋषीमुनी अयोध्येला प्रभू श्री रामचंद्रांकडे गेले. रामचंद्रांनी त्यांना अभय देऊन आपला भ्राता शत्रुघन याला सैन्यासह लवणाचे पारिपत्य करण्यास पाठविले. शत्रुघन आपल्या शुरसेनेसह मधुवनात आला. लवणाचा पराभव करून त्याला ठार मारून मधुवनाचा सगळा भाग निर्भय केला. प्रभू श्री रामचंद्रांच्या आज्ञेनुसार आपले राज्य तेथे स्थापन केले. त्याच्या शुरसेनेने मोठमोठ्या जुनाट वृक्षांनी भरलेले ते घनदाट जंगल तोडून तेथे सुंदर वसाहत निर्माण केली. शुरसेनेच्या पराक्रमाच्या स्मृतिप्रीत्यर्थ शत्रुघन ने त्या वसाहतीला शूरसेन नाव दिले आणि मथुरा नावाची उत्कृष्ट राजधानी निर्माण केली. या नगरीभोवती उंच तटबंदी मोठमोठ्या नगरवेशी ठेवल्या. यमुनाकाठी दुसरी अयोध्याच जणू निर्माण केली . अशा या मथुरा नगरीत सूर्यवंशी शत्रुघन ची वंशपरंपरा कित्येक वर्षे चालू हॊती.
___________________________________________________________________________________
अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.
ब्लॉग शेअर करा -
ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com
__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________