हनुमानाने अहंकार संपविला
भगवान श्री कृष्णाला विष्णूचा अवतार मानले जाते. विष्णूनेच रामाचा, कृष्णाचा अवतार घेतला. देव कृष्णाला जांबवंती, सत्यभामा, कालिदीं, मित्रबिंधा, सत्यभद्रा अशा आठ बायका होत्या, यामध्ये सत्यभामेला तिच्या सौदर्याचा व राणी असण्याचा अभिमान होता, दुसरीकडे सुदर्शन चक्र स्वतःला सर्वात शक्तिशाली मानत होता आणि गरुडाला त्याच्या वेगवान उड्डाणाचा अभिमान होता.
एके दिवशी श्री कृष्ण द्वारकेत राणी सत्यभामासोबत सिंहासनावर बसले होते. गरुड आणि सुदर्शन चक्र त्यांच्या सेवेत जवळच उभे होते. बोलता बोलता राणी सत्यभामेने मुद्दाम विचारले "हे भगवंता, तू त्रेतायुगात रामाचा अवतार घेतलास. सीता, तुझी पत्नी माझ्यापेक्षा सुंदर होती का ?" सत्यभामेला कृष्णाने काही उत्तर देण्याआधीच गरुड म्हणाले "देवा, जगात माझ्यापेक्षा वेगाने कोणी उडू शकेल का ?" हे ऐकून सुदर्शन चक्र लगेच म्हणाले "माझ्याइतकी मदत तुम्हाला कोणी करू शकत नाही आणि मी तुम्हाला मोठया युद्धात विजयश्री मिळवून दिली. जगात माझ्यापेक्षा बलवान कोणी आहे का ?"
द्वारकाधीशाला या तिघांच्याही मनात अहंकार आल्याचे समजले. देव हळूच हसला आणि याचा अहंकार कसा नष्ट करायचा याचा विचार करू लागला. त्याला एक युक्ती सुचली.
त्यांनी गरुडाला सांगितले " तू हनुमानाकडे जा आणि त्यांना सांग भगवान राम माता सीतेसोबत त्याची वाट पहात आहेत. " देवाची आज्ञा घेऊन गरुड हनुमानाला आणायला गेले. श्री कृष्णाने सत्यभामेला " तू सीता म्हणून तयार हो " असे सांगितले आणि द्वारकाधीशाने रामाचे रूप घेतले. सुदर्शन चक्राला राजवाड्याच्या प्रवेशदारावर पहारा देण्याची आज्ञा दिली. " माझ्या परवानगी शिवाय कोणालाही महालात प्रवेश देऊ नये " असे म्हणाले. सुदर्शन चक्र राजवाड्याच्या प्रवेशदारावर स्थिर झाले.
इकडे गरुड हनुमानाकडे पोहचला आणि म्हणाला " हे वीर हनुमान, प्रभू रामचंद्र माता सीतेसहीत द्वारकेत तुम्हाला भेटायला आले आहेत. मला तुम्हाला आणण्याचा आदेश दिला आहे. मी माझ्या पाठीवर वेगाने तुम्हाला घेऊन जाईन." हनुमान नम्रपणे गरुडाला " तू जा पुढे, मी येतो " असे म्हणाले. गरुडाने 'हे म्हातारे वानर कधी पोहचणार माहित नाही. माझे काम झाले, मी देवाकडे जातो' असा विचार करून गरुड घाईघाईने द्वारकेला निघाले. पण राजवाड्यात पोहचल्यावर महालात हनुमान भगवंताच्या समोर बसलेले गरुडाला दिसले. गरुडाची मान शरमेने झुकली. रामाच्या रूपातील कृष्णाने हनुमानाला विचारले कि " पवनपुत्रा, तू इतक्या सहज महालात कसा आलास ? तुला प्रवेशदारावर कोणी अडविले नाही का ? " हनुमानाने हात जोडून डोके टेकविले आणि तोंडातून सुदर्शन चक्र काढून भगवंतासमोर ठेवले. " हे प्रभो, मला तुम्हाला भेटण्यापासून कोणी रोखू शकेल का ? या सुदर्शन चक्राने थांबवण्याचा थोडासा प्रयत्न केला होता, म्हणून ते तोंडात ठेवून मी तुम्हाला भेटायला आलो. मला माफ करा." शेवटी हनुमानाने हात जोडून श्रीरामांना "मी तुम्हाला ओळखिले, माझा राम आहे. पण माता सीतेच्या जागी कोणत्या दासीला आज एव्हढा आदर देऊन तुमच्या सोबत सिहांसनावर बसविले आहे ?" असे विचारले. आता राणी सत्यभामेच्या अभिमानाचा चक्काचूर होण्याची पाळी होती. तिच्यात सौदर्याचा जो अहंकार होता तो क्षणार्धात चकणाचुर झाला. राणी सत्यभामा, सुदर्शन चक्र, गरुड यांचा अभिमान गळून पडला. त्यांना भगवंताची लीला समजली. तिघाच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले व ते देवाच्या चरणी नतमस्तक झाले.
___________________________________________________________________________________
अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.
ब्लॉग शेअर करा -
ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com
______________________________________________________________________________________________________________________________________________________________________