भक्तीची शक्ती
सूद
नावाचा माणूस एका गावात रहात होता. चुकीच्या लोकांच्या संगतीत राहिल्याने तो डाकू
बनला होता. लोकांना मारून त्याचे पैसे लुटायचा. एके दिवशी एक बाई आपल्या अकरा
वर्षाच्या मुलासोबत जंगलाच्या रस्त्याने जात असताना हा डाकू जबरदस्तीने तिच्या
गळ्यातील सोन्याचा हार हिसकावून घेतो. ती बाई स्वतःचा व मुलाचा जीव वाचवण्यासाटी
डाकूंकडे दयेची याचना करते, पण
आपल्या स्वभावाप्रमाणे तो डाकू तिच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी करतो. हे
पाहून मुलगा रागाने दगड उचलून त्याच्या डोक्यात घालतो. डोक्यातून रक्त वाहू
लागल्याने डाकू चिडून मुलालाही चाकूने मारून पळून जातो. आरडाओरडा ऐकून गावातील लोक
पळत येऊन तात्काळ बाईला व मुलाला दवाखान्यात नेतात. ते दोघेही वाचतात. दुसऱ्या
बाजूने डाकू जंगलात पळून जात असताना त्याला वाटेत साप चावून मरतो.
चित्रगुप्त व यमराज यमपुरीत बसून हा सारा प्रकार पहात होते. डाकुचा
मृत्यू होताच यमलोकातून यमाचे दूत त्याच्या आत्म्याला नेण्यासाठी पृथ्वीवर येतात व
त्याचा आत्मा घेऊन यमलोकात जातात. यमलोकात चित्रगुप्त आपल्या पुस्तकात डाकूने
केलेल्या सर्व पापाचा लेखाजोखा पाहून पापाची शिक्षा देतात. त्याच्या आत्म्याचा
नानाप्रकारे खूप छळ केला जातो. चित्रगुप्त डाकूला सांगतात कि "तू ज्या अकरा
वर्षाच्या मुलाला चाकूने मारले आहेस, त्याच्या पापाची शिक्षा भोगण्यासाठी पृथ्वीवर एका पुरोहिताच्या घरी
जन्म घेऊन अकरा वर्ष जगशील."
त्याच गावात एक पंडित रहात असून त्याच्या बायकोला मुलबाळ नव्हते. पंडित
भोलेनाथाचे परमभक्त असून भोलेनाथाची पूजा पूर्ण भक्तीने व श्रद्धेने करून रोज
गोरगरिबांना, साधूसंतांना
भोजनही देत असत. भोलेनाथ पंडितांच्या खऱ्या भक्ती व सत्कर्मावर प्रचंड प्रसन्न
होऊन प्रत्यक्षात दर्शन देऊन "तुला पुत्र होईल, पण तो अकरा वर्षच जगेल. " असा वर दिला पुढे
पंडितांच्या त्याच्या पत्नीच्या
पोटी मुलाच्या रूपाने डाकुचा जन्म झाला. पंडित आपल्या मुलाला धर्म, कर्म, पूजा याचे मोठ्या भक्तीने
ज्ञान देतात. मुलाचे नाव शंकर ठेवतात. अकरा वर्ष व्हायला फक्त एकच महिना बाकी असताना पंडित
शंकरच्या मामाला बोलावून भरपूर पैसे देऊन त्यांना काशीला जाऊन सलग तीस दिवस
शंकराच्या हातून यज्ञ व
दानधर्म करण्यास सांगतात. ऋषीमुनी, साधुसंत, गोरगरीबांना रोज सकाळ-संध्याकाळ भोजन
देऊन महामृत्युंजयचा जप
करायला सांगतात.
शंकर व मामा दुसऱ्या दिवशी काशीला निघून जातात. तेथे पोहचल्यावर पंडितांनी
सांगितल्याप्रमाणे सगळे करू लागतात. तिसाव्या दिवशी शंकरची तब्येत बिघडते. विश्रांतीसाठी
आत पाठवतात. संध्याकाळी मामा सर्व आटोपून आत जाऊन पाहतात तर शंकर मेलेला असतो. मामा
जोरजोरात रडू लागतो. यमलोकाचे दूत शंकराच्या आत्म्याला घेऊन यमलोकात पोहचतात. यमलोकात
चित्रगुप्ताने शंकराच्या पापपुण्याचा लेखाजोखा मांडलेला असतो. तो उघडताच
चित्रगुप्त शंकराचा आत्मा त्याच्या शरीरात परत ठेवण्याची आज्ञा यमराजाला देतात. यमराजाने
आत्मा शरीरात ठेवताच शंकर जिवंत जिवंत होतो. मामाच्या आनंदाला पारावार रहात नाही.
यमलोकात यमराज चित्रगुप्ताला प्रश्न करतात. तेव्हा चित्रगुप्त उत्तर
देतात "शंकराने केलेली सत्कर्म भगवान, शंकराची
पूजा, हवन, साधुसंताना, गोरगरिबांना, ऋषी मुनींना भोजन, भक्तीचे सामर्थ्य
याच्यामुळे शंकराच्या कुंडलीतील मागील जन्मातील पापाचा भोग संपला. या जन्मात सत्कर्माचा
हिशोब अधिक होता. त्यामुळे त्याचे वय आता ९० झाले आहे. सृष्टीच्या नियमाच्या पालनाकरता त्याचा
आत्मा त्याच्या शरीरात परत पाठवावा."
___________________________________________________________________________________
अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.
ब्लॉग शेअर करा -
ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com
__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________