पारंपारिक मानसोपचार

 पारंपारिक  मानसोपचार 




भल्यामोठ्या खलबत्यात ती दणादण दाणे कुटत होती.... बत्ता चांगलाच मजबूत होता.तो उचलायचा म्हणजे ताकदीचं काम होतं! तोंडाने ती काहीतरी पुटपुटत होती. त्यात संताप जाणवत होता. मधूनच तिच्या आवाजाला धार यायची तेव्हा बत्ता जरा जास्तच जोरात आपटला जायचा. खला तील दाण्याचा पार भुगा होऊन आता त्याला तेल सुटायला लागलं होतं. जेव्हा बत्त्याला तेल लागायला लागलं तशी ती थांबली. पदराने तिने घाम पुसला आणि हुश्श करून पदरानेच थोडं वारं घेतलं.

आता तिचा चेहरा जरा शांत वाटत होता. तिची आणि माझी नजरानजर झाली तशी ती म्हणाली बरं वाटलं बघ! चांगलं कुटून काढलं बत्त्याने !

माझ्या चेहऱ्यावर आश्चर्य!

अगं कोणाला? त्यावर ती म्हणाली.... आता मी कोणाला कुटून काढणार?

आहे का ती ताकद माझी? कोणापुढे माझं काहीही चालत नाही! कोणी माझं ऐकत नाही. मग असे छोटे छोटे संताप एकत्र गोळा होऊन त्याचा एक मोठा ढीग होतो बघ एखाद दिवशी! मग त्या ढिगाचं ओझं मला सहन होत नाही. माझ्याकडून काहीतरी वेडंवाकडं बोललं जाईल याची मला भीती वाटते. अशी भीती वाटली ना की मी दाणे किंवा चटण्या घेते कुटायला,आणि खलबत्त्याच्या आवाजात बडबड करते माझ्या मनाला वाटेल ती ! चटण्याही छान होतात आणि तेल सुटलेला दाण्याचा लाडू ही छान होतो. मग घरातले सगळे म्हणतात.... चटण्या आणि दाण्याचा लाडू खावा तर हीच्याच हातचा! मग मला गालातल्या गालात हसू येतं बघ. माझ्या चेहऱ्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह! म्हणजे तू नक्की काय करतेस?

    अगं डोक्यात फार संताप असला ना कि सगळी शक्ती एकवटून कोणाच्यातरी एक थोबाडीत ठेवून द्यावीशी वाटते. हात शिवशिवतात माझे . आणि फाडफाड बोलून समोरच्याला फाडून खावं अशी ईच्छा होते. पण हे असं वागणं योग्य नाही हेही पटतं मला. पण मग या त्रासाचं काय करू? तो सगळा राग मी या खलबत्त्यातल्या दाण्यांवर आणि खोबऱ्यावर काढते.

जे जे मनात असतं ते बोलून टाकते. त्यामुळे मोकळं वाटतं बघ मला !

मनावरचं ओझं हलकं होतं. अंगातली ताकद सत्कारणी लागते. आणि चटण्या, लाडू सुंदर होतात हा सगळ्यात मोठा फायदा. पुन्हा, घरात वादंग घालून घरातली शांतता नष्ट करा हेही होत नाही... आणि ती मस्त पैकी हसली ! आणि माझ्या डोक्यात ट्यूब पेटली...... अरे खरंच!किती छान घरगुती उपाय आहे हा!

   पूर्वी बायकांनी घरात फार बोलायची, आपली मतं मांडायची पद्धत नव्हती. लहानपणापासूनच त्यांना सहन करण्याची सवय लावली जायची. पण त्यातही काही बायका मूळच्या बंडखोर वृत्तीच्या असायच्याच. त्यांना मनाविरुद्ध गोष्टी पचवणे जड जायचे पण घरामध्ये अशा पद्धतीने कामं करता करता त्या मोकळ्या व्हायच्या. जात्यावर गाणी गात दळताना त्या सुरांबरोबर त्यांच्या मनाचे बंध मोकळे व्हायचे. धान्या बरोबर तिच्या मनातील टोचणारे बोचणारे अनेक सल पिठासारखे भुगा होऊन जायचे. असंच असेल कदाचित म्हणूनच पूर्वीच्या बायकांमध्ये सहनशक्ती अधिक होती असे राहून राहून वाटते.

पाट्यावर जोरजोरात वाटणे, दगडावर धुणं आपटणे, आदळ आपट करत भांडी घासणे, किसणीवर खसाखसा खोबरे किसणे, जात्याचा खुंटा ठोकणे, उखळामध्ये मुसळाने कांडणे, या सगळ्या कामांमध्ये बायकांना भरपूर ताकद लागायची. या शारीरिक कष्टांच्या क्रिया करताना त्यांच्या मनातील उद्वेग बाहेर पडायला मदत व्हायची.

आत्ताच्या काळात आपण सगळेच शारीरिक कष्ट करायचे विसरलो आहोत. त्यामुळे आतल्या आत जी घुसमट होते ती बाहेर पडायला वाव मिळत नाही. पूर्वी घरात खूप माणसं असायची. त्यामुळे वातावरणातील ताण कमी असायचा. विविध विषयांवर घरात बोलणं व्हायचं त्यामुळे एकाच विषयाभोवती संभाषण फिरायचं नाही. त्यामुळे दुःख उगाळत बसण्याची माणसांवर वेळच यायची  नाही.

  आपणही जेव्हा काही शारीरिक श्रम करतो तेव्हा शरीराबरोबर आपल्याला एक मानसिक स्वास्थ्य लाभतं. एखादी घाण झालेली गोष्ट आपण स्वतःच्या हाताने घासून पुसून लख्ख करतो तेव्हा ती घासताना मनातील कचरा, धूळ आणि जळमटं बहुधा स्वच्छ होत असावेत. म्हणून प्रत्येकाने आपल्या घरातील एखादे तरी स्वच्छतेचे काम स्वतःहून करावे. त्यामुळे तुमचे मन:स्वास्थ्य चांगले राहायला मदत होईल असे वाटते. प्रत्येकाने शारीरिक श्रमाचा कोणताही मार्ग जो आपल्याला सहज शक्य असेल आणि आवडीचा असेल तो शोधून काढावा

पण आपल्या जीवनातील राग, संताप, नैराश्य आपल्या मनात साचून राहणार नाही याची अवश्य काळजी घ्यावी!

   लेखक :- नामदेव माने




 ___________________________________________________________________________________


अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.



ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com


__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________

फॉलोअर