समीकरण
उद्या तिचा वाढदिवस. लग्नानंतरचा पहिलाच.
लग्नही अगदीच नवं. फक्त महिनाभरापूर्वीचं.
तरी बाबांना सांगत होते की हा वाढदिवस तरी होऊन जाऊ दे इथेच पण त्यांना त्या आधीचाच मुहूर्त हवा होता.
त्या घरी कशी धमाल यायची वाढदिवसाला.
माझ्या वाढदिवसापासून घरात आंबे खायला सुरवात व्हायची.
भाऊ तर नेहमी चिडवायचा, तुझा वाढदिवस ना मला तुझ्यापेक्षा जास्त आंब्यासाठीच आवडतो. कारण तेव्हापासून आपल्या घरातला आंबे महोत्सव सुरू होतो.
आंबे महोत्सव.. खरंच तर होतं ते...बाबा माझ्या वाढदिवसाचा महोत्सवच तर करायचे.. कितीही महाग असू दे.. एक डझन आंबे तरी त्या दिवशी न चुकता आणायचेच..माझा वाढदिवस अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावरही भारी ठरायचा.. मला आठवतय तेव्हापासून तरी यात खंड पडलेला नाही.. आता या घरचा वाढदिवस कसा असेल हा विचार करत करतच ती झोपली.
सकाळी नवरा, सासू सासरे सगळ्यांनी तिला विश केलं. सासूबाईंनी तिच्या आवडत्या भेंडीच्या भाजीपोळीचा डबा दिला. ती नवऱ्याने घेतलेला नवा सलवार कमीज घालून ऑफिसला निघणार इतक्यात आई बाबांचा फोन आला विश करायला. त्यांच्याशी बोलून ती ऑफिसला गेली.
संध्याकाळी सासूबाईंनी तिला ओवाळलं आणि तिचा बाबीसावा वाढदिवस म्हणून तिला २२ वस्तू भेट म्हणून दिल्या. नवा ड्रेस आणि त्यावर जाणाऱ्या सगळ्या ॲक्सेसरीज आणि एक सुंदर पर्स. त्या पाहून तिला एकदम भरून आलं.
नवरा म्हणाला "मॅडम चला लवकर तयार व्हा. आपण जेवायला बाहेर जातोय."
सासूबाईंनी दिलेला ड्रेस आणि त्यावरचा सगळा मॅचिंग थाट करून बाईसाहेब निघाल्या.
सासू, सासरे, नवरा आणि ती..चौघं जवळच्याच एका तारांकित हॉटेल मधे पोचले. इतक्या हायफाय हॉटेलमधे जायची तिची पहिलीच वेळ. तिथलं वातावरण पाहून ती एकदम भांबावून गेली.
आत्ता इथे हे तिघंही असते तर काय मज्जा आली असती असा विचार ती करतच होती इतक्यात तिथे खरंच तिथे तिचा भाऊ आला. त्याच्यामागे त्यांची नेहमीची लाल रंगाची शबनम पिशवी खांद्यावर लटकवलेले बाबा होते आणि त्याच्यामागे आई जी तिच्यासारखीच बावरली होती.
त्यांना पाहिल्यावर आधी तर तिचा डोळ्यांवर विश्वासच बसेना. आश्चर्यचकित होऊन तिने नवऱ्याकडे पाहिले तर तोही हसून तिच्याकडेच पाहात होता. तिचा तो आनंद डोळे भरून पाहत मनात साठवत असल्यासारखा.
त्याने हळूच तिचा हात हात घेतला आणि विचारलं "कसं वाटलं सरप्राईज?"
"अरे.. मस्त.." तिला पुढे बोलवना. तिने फक्त हातातला त्याचा हात दाबला.
मग वेटरने एक छानसा केक आणून ठेवला. हॉटेलमधे बर्थडे सॉंग वाजायला लागलं आणि टाळ्यांच्या गजरात तिने केक कापला.
नंतर बाबांनी त्यांचं नेहमीचं गिफ्ट म्हणून डझनभर हापूस तिच्या हातात ठेवले आणि तिच्यासाठी वाढदिवस सर्वार्थाने सफळसंपूर्ण झाला.
मग नंतर ही प्रथाच पडली. दरवर्षी बाबा आंबे घेऊन तिच्या सासरी येऊ लागले आणि याही घरी त्या दिवशीपासून आंबे महोत्सव साजरा होऊ लागला. पुढे भाऊ परदेशी गेला, आईने तर कायमसाठीच निरोप घेतला पण बाबा मात्र कायम ही प्रथा पाळत राहिले. न चुकता.
तिचा वाढदिवस, तिचे बाबा आणि त्यांनी तिच्यासाठी आणलेला वर्षाचा पहिला आंबा हे असं समीकरणच होऊन गेलं. नवरा गमतीने म्हणायचा सुद्धा 'तुमच्या मधे येऊन तुमच्या आनंदाचं समीकरण बिघडवायची मला अजिबात इच्छा नाही. चालू दे तुमचं बापलेकीचं खास सेलिब्रेशन.'
नंतर अनेक वर्ष, आईच्या जाण्यामुळे झालेला एक अपवाद वगळता, हे समीकरण असंच चालू राहिलं. अगदी अचूक.
पुढे ती नवऱ्या बरोबर लंडनला राहायला गेली. पण तरीही तिच्या वाढदिवसाला व्हीडीओ कॉल करून बापलेक दोघं वर्षाचा पहिला आंबा एकत्र खाऊ लागले. त्यात यंदाच्या वाढदिवसापर्यंत कधीच खंड पडला नाही.
यंदाचा मात्र तिचा हा पहिलाच वाढदिवस होता.. बाबांशिवायचा..
या वर्षी आयुष्याचंच समीकरण बिघडलं होतं.
पण तरीही घरातलं वातावरण बिघडू नये म्हणून डोळ्यात सारखं सारखं येणारं पाणी लपवून आनंदी राहाण्याची तिची धडपड त्याला दिसत होती.
शेवटी त्याने ठरवलं आणि तो जाऊन हापूसचा बॉक्स घेऊन आलाच.
तिला म्हणाला, "हे बघ तुझी मनस्थिती मी समजू शकतो पण आजच्या दिवशी तुला असं रडतांना पाहून बाबांना काय वाटेल याचा विचार कर. त्यांनी इतकी वर्ष तुझा आनंद जपला. आता त्यांच्यानंतर ती जबाबदारी माझ्यावर आहे. हो ना? हा, आता घटक बदलले की समीकरण चुकणारच त्यामुळे मी नाही म्हणत की मी त्यांची जागा घेईन वगैरे कारण ते मला जमणारही नाही आणि करायचंही नाही. मला फक्त तुझा प्रत्येक आनंद जपायचाय. आजच्या दिवशी अजून एक नवं समीकरण लिहायचंय आणि येणाऱ्या काळात ते पक्कं करत जायचंय."
असं म्हणून त्याने आंब्याची एक फोड तिला भरवली.
आज त्याच्यातला पती आणि पित्यामधल्या वेलांटीची अदलाबदल सहजपणे करू शकणारा एक हळवा पुरूष तिला दिसला व ती डोळे पुसत त्याच्या मिठीत विसावली.
___________________________________________________________________________________
अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.
ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com
__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________