अस्तित्व


अस्तित्व 

                              



                              आज आई खूप रडत होती. बाबांनी घरातले सगळे देव पिशवीत भरले होते आणि नदीत विसर्जन करायला निघाले होते. आईचा देवावरचा प्रचंड विश्वास बाबांना खपायचाच नाही. माणसाचा स्वतःच्या मनगटावर विश्वास हि त्याची ठाम धारणा होती. कमकुवत माणसे देवाच्या नादी लागतात आणि स्वतः कष्ट करत नाहीत आणि आईच तेच होत चाललं आहे हि त्याची तक्रार होती. आता हे देव नकोच घरात, काही चागलं झालं कि आईच ठरलेलं वाक्य 'देवाची कृपा' आता बाबांनी विडाच उचलला होता कि "बघू, हिचे देव स्वतःच तरी रक्षण करू शकतात का ? नदीत विसर्जन करण्यापासून स्वतःला वाचवू शकतात का ?" रागाच्या भरात त्यांनी देवघरातून सगळे देव उचलले आणि पिशवीत भरले. भर्रकन गाडी काढली आणि एकटेच नदीच्या दिशेने निघाले. 

                              

                              इकडे रडून रडून डोळे अक्षरशः सुजले होते. आज आईच अजिबात ऐकत नव्हते बाबा आणि म्हणाले "याद राख, एकजरी देव विकत आणलास तर" आईला तर सुचतच नव्हते काय करावे ते. तिला वाटत होत 'निदान घरात राहू द्यावे देव. हा तर मी पूजा करणार नाही. पण असे देव्हारा रिकामा करू नये. ' शेवटी तिची शक्ती होती. एरव्ही बाबा एकदम प्रेमळ माणूस, पण देवावर अजिबात विश्वास नाही आणि त्यामुळेच आईच आणि त्याच खटकायचं ते पूजेवरूनच. 

                              

                              इतके दिवस निदान पूजा तरी करू द्यायचे, पण कालपासून आई गणपतीबाप्पाच्या आगमनासाठी तयारी करत होती. आज अर्ध्या दिवसांनी बाजारातून सजावटीच्या पूजेच्या तयारीसाठी सगळं घेऊन घरी आली. किती हा टाईमपास असं वाटून तेवढ्या वेळात बाबांच्या रागाचा पारा चढलेला होता. आईला फारच मोठा धक्का बसला. आईला माहित होत काही दिवसांनी राग उतरल्यावर बाबांना त्याची चूक समजेल हि, पण गणेशोत्सव संपल्यानंतर उपरती होऊन काय उपयोग. खूप चलबिचल वाढली होती मनाची तिच्या. देव असतो कि नसतो ह्या विषयावर तिला बोलायचंच नव्हतं. देवाची पूजा केल्यावर मनाला प्रसन्न वाटतं, आनंद मिळतो, हा साधा सरळ हिशोब होता तिचा. परत बाबांनी देवाचं काहीही करावं, अशी अपेक्षा कधीच केली नव्हती तिने. तिला साधी मनोभावे पूजा करायची असायची. काही चागलं झालं कि देवाच्या कृपेने होते आहे हि भाबडी असेल पण श्रद्धा होती तिची. बाबांना हे पातक करण्या पासून कसे थांबवायचे, सुचतच नव्हते तिला. देवाचा सन्मान बाबांनी कधीच केला नव्हता. आईची हरकत नव्हतीच त्याला. शेवटी ज्याची त्याची श्रद्धा असे म्हणून पुढे चालायची ती. देवावर विश्वास ठेवावा का नाही हे ज्याने त्याने आपापल्या अनुभवावरून ठरवावे, पण दुसऱ्यांनी काय विचार करावा, मग ती हक्काची बायको का असेना, ठरवायचं अधिकार कोणालाच नसावा. 

                              

                              बाबांची आलिशान गाडी बंगल्यातून बाहेर पडत होती. तेवढ्यात अनुची शाळेची बस आली. पाचवीतली अनु रडत रडत बसमधून खाली उतरली. बाबांना गेटवर पाहून तर अजून हुंदके देऊन रडायला लागली. अनु म्हणजे जीव कि प्राण होती. बाबांचा तिला रडताना पाहून गाडी गेटमध्येच ठेवून बाबा धावत गेले तिच्यापाशी. तिला कडेवर घेतलं आणि विचारलं "काय झालं ? का रडते आहेस बाळा ? काही लागलं का ? कोणी बोललं का ? साग, बाबा आहे ना, बघून घेईल कोणी माझ्या छकुलीला त्रास दिला."

                              

                              रडता रडताच तिने तिच्या दोन्ही मुठी उघडल्या, तर हातात मातीचा गोळा होता. ती बोलायला लागली "बाबा तो मनोज फार फार वाईट आहे. आमच्या शाळेत आज मातीचा गणपती बाप्पा बनवायचं वर्कशॉप होते. मी इतका सुंदर बाप्पा बनवला होता. मॅमनी पूर्ण क्लासला दाखवला आणि मला शाबासकी दिली. शाळा सुटल्यावर मनोजने माझा बाप्पा हिसकावून शाळेतल्या माठात टाकून दिला. सगळं बाप्पा विरघळला. एवढीच माती मी हात घालून मिळवली. बाबा, इतका वाईट आहे मनोज. मी कधीच बोलणार नाही आता त्याच्याशी. असं कधी बाप्पाला पाण्यात फेकतात का ? पण मला ड्रॉयव्हर काका म्हणाले तू ह्या मातीपासून परत बनव देवबाप्पा. बाप्पाला कोणीच मोडू शकत नाही. बाबा, मला बाप्पा बनवायला कोण मदत करेल ? आता ही माती पण उरली नाही." बाबांना एकाएकी एकदम भरूनच आले. अश्रूंनी डोळे भरून गेले, लाडक्या लेकीच्या डोळ्यातील हतबलता पाहून."मला बाप्पा बनवायचा आहे बाबा. त्या मनोजला खूप रागवा तुम्ही." असे बोलून अनुराधा परत जोरजोरात रडायला लागली. 

                              

                              बाबांनी खिशातल्या रुमालाने तिचे डोळे व तोड पुसून दिले आणि म्हणाले "चल, आपण बनवू बाप्पा. पण त्या आधी मला एक काम करायचे आहे." असे म्हणून बाबांनी गाडी जागेवर लावली आणि सांभाळून पिशवी बाहेर काढली. अनु म्हणाली "बाबा, हे काय ? आपले देव का पिशवीत ठेवलेत ?" तसे बाबा आईकडे बघून म्हणाले "आईने ठरवलंय कि ह्यावर्षी गणेश चतुर्थीला गणपतीबाप्पा तू, तुझी आई, तुझे बाबा बनवून देव्हाऱ्यात ठेवणार. हा गणपती कधीच पाण्यात जाणार नाही. आपण सुपारीच्या गणपतीचं विसर्जन करायचं. आज आपल्याला सगळे देव स्वछ करायचे आहेत. बाकी सगळी तयारी आईने केली आहे. म्हणू ह्यावर्षी देव मी स्वतः चमकावणार आणि स्थापित करणार." अनु आणि बाबांनी बनवलेल्या गणपतीबाप्पाला आता देव्हाऱ्यात अढळस्थान मिळणार होते."अनु, जा पटकन हातपाय धुवून ये. आपण नवीन माती आणायला जाऊ आपल्या बागेतून."

                              

                              आई शांतपणे बाजूला उभी राहून बाबांचा बदललेला अवतार बघत होती. अनु गेल्यावर हळूच म्हणाली "का हो, दुसऱ्याच्या लेकीच्या डोळ्यात पाणी पाहून हृदय द्रवल नाही तुमचं, पण स्वतःच्या लेकीच्या डोळ्यात आलेले अश्रू काही क्षण पण सहन झाले नाही." बाबा हसून म्हणाले "हो, खरय तुझं, नाही बघवलं मला अनुला कासावीस होताना. पण माझे डोळे उघडले त्या विघ्नहर्त्याने. मी फार तोऱ्यात तुला म्हणालो होतो कि बघू तुझे देव स्वतःचे रक्षण करतात का. निघालो होतो सगळ्यांना नदीत विसर्जन करायला आणि त्या गेटच्या बाहेर सुद्धा त्यांनी मला जाऊ दिले नाही. अनुच्या रूपात माझे डोळे उघडले. देव नावाचं काही मूर्त रूप आहे का, हे मी नाही सांगू शकणार, पण एक अज्ञात शक्ती आहे जी कुठेतरी, कधीतरी तुम्हाला स्वतःची जाणीव करून देते, एवढं मात्र नक्की." आई समाधानाने बोलली "मलातर ती शक्ती नेहमीच जाणवते. आपल्यावरची कित्येक विघ्न देवाने दूर केली, पण आज विघ्नहर्त्याने स्वतःवरच विघ्न दूर केलं." तेवढ्यात अनु आली आणि ते तिघेही गणपती बाप्पा बनवण्यासाटी बागेतून माती घेऊन आले.





 ___________________________________________________________________________________


अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.



ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com


__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________

फॉलोअर