जिवतीची पूजा
श्रावण महिन्यात दररोज केली जाणारी पूजा म्हणजे जिवतीची पूजा.....चित्रांचा हा कागद देवघरा जवळ लावून त्याची पूजा केली जाते....पण अनेक घरात दरवर्षी कागद चिकटवतात... रोज हळद कुंकू वाहतात... नैवेद्य दाखवतात... पण हे लावण्या मागचा विचार मात्र कुठेच व्यक्त होत नाही... घरात बोलला जात नाही
या पूजेसाठी आघाडा आणि दुर्वा या वनस्पती आणतात
आघाडा आणि दुर्वा या वनस्पतीच्या पानांना पुजेत एवढे महत्त्व यासाठी असते की त्याचे अनेक आरोग्यवर्धक फायदे आहेत.
या वनस्पती फक्त पूजेत समाविष्ट करण्यासाठी आणू नका... या औषधी वनस्पती श्रावण भाद्रपदातील पावसाळी हवेत आहारात समाविष्ट करायला हव्यात.... याची आठवण व्हावी म्हणून या कळत येणाऱ्या पूजेत त्यांचा समावेश केलेला आहे.... त्या रितिरिवाजाचा भाग नसून आपल्याला आठवण व्हावी यासाठीची ती योजना आहे
का करत असतील ही पूजा....यामधे चित्र आहेत ....
ज्या चित्राची पूजा करतात त्यांना काहीतरी सांगायचं आहे
पहिल चित्र आहे भक्त प्रल्हाद आणि नरसिंहाच...... काय सांगायच असेल यातून.... तर मनोमन भक्ती करणाऱ्या आपल्या लेकराची म्हणजे प्रल्हादाची ती अगाध शक्ती म्हणजे विष्णू रक्षण करतो ... यात प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यपू चा वध नरसिंहाच्या रुपात भगवान विष्णू करतात.... इथे अहंकाराचा वध आहे.... दुसऱ्यावर वर्चस्व गाजवताना केलेल्या अन्यायाचा वध आहे.... आणि भक्त प्रल्हाद या बालकाचे रक्षण केले आहे.. खरतर त्या अद्वैतासमोर आपण सर्वच लहान बालकासमानच आहोत...म्हणून हे परमेश्वरा तुझ्या प्रेमळ भक्ताचे, बालकाचे रक्षण कर ....अस या चित्रातून सांगायचं आहे...
दुसर चित्रात कालियामर्दन ही कथा आहे....श्रीकृष्ण हा विष्णू देवाचाच हा अवतार..... गोपाळांना , गोकुळातील लोकांना त्रास देणा-या सर्पाचा बंदोबस्त श्रीकृष्णानं केला..... इथेही अन्यायालाच शासन केल आहे .....बालगोपाळांच, भक्तांच रक्षण केल आहे... अहंकारी सर्पावर आरुढ झालेली विष्णू देवता योग्य समज देऊन कालियाला पळवून लावते.... यातून हेच सांगायचं आहे अन्याय सहन करू नका...योग्य वेळी योग्य ती समाज दया.... समाज देताना शब्दांचा योग्य वापर करा... इतरांना मदत करा... संकटाचा नाश करा...आणि अद्वैतावर विश्वास ठेवा....
तिसर चित्र आहे जरासंधाच्या जन्माच.... जरासंधाचा जन्म झाला तो दोन शकलांमधे .... जरा या यक्षिणीने ही शकल जोडली. जरा याक्षिणीने सांधला म्हणून हा जरासंध..... याच जरा यक्षिणीच्या सोबत जिवंतीका नावाची यक्षिण होती ... या याक्षिणीने या बालकाला जीवदानी दिले....दिर्घायुष्य दिले....म्हणून जिवंतिका ही लहान मुलांचे रक्षण करणारी आहे असे समजतात. ही दीर्घायुष्य देते...मुलांच्या आजूबाजूला वेगवेगळ्या रुपात ती असते... असं मानलं जात... हे सगळं प्रतिकात्मक आहे
चौथ्या चित्रात हत्तीवर हातात अंकुश घेतलेला बुध देव आहे.... बुद्धिमत्ता ,वक्तृत्व देणारा हा ग्रह आहे .. तर हत्ती उन्मत्तपणा दाखवतो....
बृहस्पती म्हणजे गुरु वाघावर चाबूक घेऊन आहे.... शैक्षणिक , अध्यात्मिक प्रगती , विवेकनिष्ठ विचार देणारा गुरु.... आणि अहंकाराच प्रतिक वाघ....
यातून सांगायच आहे की बुद्धी, वाचा , विवेकबुद्धी शाबूत ठेवा....उन्मत्तपणा आणि अहंकार यावर अंकुश ठेवा.... वेळ पडली तर मनाला चाबूक दाखवा.... संयम सोडू नका
लहान मुलांची काळजी घ्यावी , रक्षण कराव, त्यांना दिर्घायुष्य लाभाव म्हणून जीवती च्या चित्रासमोर प्रार्थना करायाची असतें ....संस्कारकृती करायची असतें त्याचप्रमाणे मुलांवर उत्तम संस्कार व्हावेत यासाठी या चित्र रूपातून दिला गेलेला अर्थ मुलांपर्यंत या निमित्ताने पोचवायचा आहे..... ही पूजा करत असताना आठवड्यातून एकदा मुलाचे औक्षण करा... औक्षण का करायचे याबद्दल असणार महत्व वेगळ्या व्हिडिओत लवकरच सांगेन ....
घरातील प्रत्येकाच्या उज्वल आणि सुरक्षित भवितव्यासाठी शुभ इच्छा व्यक्त करायाची असतें ..
मनोमन सतत कृतज्ञ रहाव यासाठी प्रतिकात्मक चित्राची पूजा केली जाते
एकंदरीत या प्रतिमेतून जे व्यक्त होत त्यासाठी फक्त आईने नाही तर आई आणि वडील दोघांनी ही प्रार्थना करायला हवी....प्रत्येक मुलं ही आई आणि वडील दोघांची जबाबदारी आहे
आणि तसाही स्त्री तत्व प्रत्येक मनुष्यात आहे....त्याला स्त्री पुरुष भेद नाही.....
काय असतें ही संस्कारकृती
कशी करायची प्रार्थना
कोणावर अन्याय होत असेल तर...प्रतिकार करेन..
असहाय्यता दिसली तर मदत करेन.....
समज देऊन क्षमा करता येत असेल तर जरुर करेन.....
आपल्या मातृभूमीवर, मातृभाषेवर आपल्या संस्कृतीवर प्रेम करेन , त्यांचा अभिमान बाळगेन , त्यांचे रक्षण करेन
स्वतःच्या शरीराची, आहाराची योग्य काळजी घेईन
स्वतःच्या अहंकारवर उन्मत्तपणावर अंकुश ठेवेन..राग लोभ मद मत्सर या भावना ताब्यात ठेवेन...लहान थोर कोणाशीच उद्धटपणे बोलणार नाही....संवाद साधताना योग्य भाषा वापरेन, आवाजातील चढ उत्तर योग्य ठेवेन
बुद्धिमत्तेच्या ताकदीवर कितीही मोठे झालो तरी पाय जमिनीवर रहातील....विवेकबुद्धी जागी राहिल याचे भान ठेवेन
प्रत्येक बाबतीत समाधानी वृत्ती जोपासेन
निसर्ग शक्तीवर मनापासून प्रेम करेन.... तिचा आदर करेन....
सर्व प्राणी पक्षी झाडे, यांची काळजी घेईन...
जमीन, पाणी, हवा दुषित करणार नाही..जबाबदारीने वागेन...पंचतत्वांचे ऋण कायम ध्यानात ठेवेन ...
ज्या वागणूकीने मला त्रास होईल तशी वागणूक मी दुसऱ्याला देणार नाही
हे परमेश्वरा,
तुझ्या सर्व लेकरांचे,घरातील लहान मुलांचे रक्षण कर.... त्यांचे अरोग्य उत्तम राहू दे... भविष्य उज्वल आणि समृद्ध होऊ दे
अशी प्रार्थना करावी....
काळानुरूप आता हे ही म्हणावे
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळेन
मोबाईल, TV, आणि विविध व्यसनांपासून स्वतःचे रक्षण करेन
कोणत्याही विषयातील स्वातंत्र्य, हक्क उपभोगताना स्वैरचार करणार नाही... विवेकाने वागेन
हिंदू जीवन पद्धतीचा कायम आदर करेन.... विकसित होण्याचा दृष्टीकोन देणाऱ्या हिंदू जीवन पद्धतीत सदसदविवेक बुद्धीने योग्य असे अर्थपूर्ण बदल करेन....
ही प्रार्थना मोठ्या आवाजात करावी..... घरातील मुलांच्या कानावर, स्वतःच्या कानावर हे पडायला हव.....
या संस्कारकृतींमधून आपलें विस्मृतीत गेलेले विचार परत स्वच्छ होतील आणि मुलापर्यंत अनेक आवश्यक विचार अगदी सहज पोहोचतील.....दरवर्षी श्रावण महिना रोज हे म्हणाल्याने ते मुखोदगत होणार आहे आणि मोठ्यांनी कृतीत आणले तर सर्व लहान मूले नकळत अनुकरण करतील ...
चला तर मग या वर्षी पासून अशी प्रार्थना आणि प्रतिज्ञा करून बघू या.
___________________________________________________________________________________
अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.
ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com
__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________