बाप

 बाप



बायको "गोड बातमी" सांगते ते ऐकून

टचकन डोळ्यात पाणी येते 

तेव्हा पुरुषाचा बाप होतो...


नर्सने ओंजळीत ठेवलेला काही पौंडाचा जीव जबाबदारीच्या प्रचंड ओझ्याची जाणीव करून देतो,

तेव्हा पुरुषाचा बाप होतो....


बायकोबरोबर जागवायच्या रात्री डायपर बदलणे आणि पिल्लाला कडेवर घेऊन फेऱ्या मारण्यात व्यतीत होउ लागतात,

तेव्हा पुरुषाचा बाप होतो...


मित्रांबरोबरच्या पार्ट्या आणि नाके नीरस वाटून संध्याकाळी पावलांना घराची ओढ लागते,

तेव्हा पुरुषाचा बाप होतो...


"लाईन कोण लावणार" म्हणत सिनेमाची टिकिटे टेचात ब्लॅकने खरेदी करणारा तोच जेव्हा शाळेच्या फॉर्मच्या लायनीत पहाटे पासून तासंतास इमानदारीत उभा रहतो,

तेव्हा पुरुषाचा बाप होतो...


ज्याला उठवताना गजर हात टेकतात तोच जेव्हा पिल्लाचा नाजुक हात किंवा पाय झोपेत आपल्या अंगाखाली येऊ नये म्हणून रात्रभर सावध झोपू लागतो,

तेव्हा पुरुषाचा बाप होतो...


खऱ्या आयुष्यात एका झापडित कुणालाही लोळवू शकणारा पिल्लाबरोबरच्या खोट्या फाइटिंग मध्ये त्याच्या नाजुक चापटीनेदेखील गडाबडा लोळतो,

तेव्हा पुरुषाचा बाप होतो...


स्वतः कमीजास्त शिकला असला तरी पोराला "नीट अभ्यास कर रे" असे पोट तिडकिने सांगू लागतो,

तेव्हा पुरुषाचा बाप होतो...


आपल्याच कालच्या मेहनतीच्या जोरावर आपला आज मजेत जगणारा अचानक पोराच्या उद्यासाठी आपलाच आज कॉम्प्रोमाइज करू लागतो,

तेव्हा पुरुषाचा बाप होतो...


ऑफिसात अनेकांचा बॉस बनून हुकुम सोडणारा शाळेच्या POS मध्ये वर्गशिक्षिकेसमोर कोकरु बनून, कानात प्राण आणून तिच्या इंस्ट्रक्शन्स अज्ञाधारकपणे ऐकतो,

तेव्हा पुरुषाचा बाप होतो...


आपल्या अप्रेझल आणि प्रमोशनपेक्षासुद्धा तो शाळेच्या साध्या यूनिट टेस्टच्या रिझल्टची देखिल जास्त काळजी करू लागतो,

तेव्हा पुरुषाचा बाप होतो...


आपल्या वाढदिवसाच्या ट्रीट पेक्षा पोराच्या बर्थडे पार्टीच्या तयारीत तो गुंगुन जातो,

तेव्हा पुरुषाचा बाप होतो...


गाडीतून सतत फिरणारा तो पोराच्या सायकलची सीट पकडून सायकलच्या मागे धावू लागतो,

तेव्हा पुरुषाचा बाप होतो...


आपण पाहिलेली दुनिया, केलेल्या चूका पोराने करू नयेत म्हणून प्रिचिंग सुरु करतो,

तेव्हा पुरुषाचा बाप होतो...


प्रसंगी पोराच्या कॉलेज अडमिशनसाठी पैशाची थैली सोडतो किंवा याचनेकरिता "कॉन्टेक्ट्स" समोर हात जोडतो,

तेव्हा पुरुषाचा बाप होतो...


"तुमचा काळ वेगळा होता, आता जमाना बदलला, तुम्हाला काय कळणार नाही. This is generation gap!" असे आपणच केव्हातरी बोललेले संवाद आपल्यालाच ऐकू आल्यावर आपल्या बापाच्या आठवणीने हळवा होऊन मनातल्या मनात त्याची माफी मागतो,

तेव्हा पुरुषाचा बाप होतो...


पोरगा शिकून परदेशी जाणार, मुलगी लग्न करून परक्या घरी जाणार हे दिसत असून त्याकरिता स्वतःच प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा पुरुषाचा बाप होतो....


पोर मोठी करताना आपण कधी म्हातारे झालो हे लक्षात येत नाही आणि लक्षात येते तेव्हा उपयोग नसतो,

तेव्हा पुरुषाचा बाप होतो...


कधी पोरांच्या संसारात अडगळ बनून, 

कधी आपल्या म्हातारीबरोबर वृद्धाश्रमाची पानगळ बनून,

अगदीच नशीबवान असला तर नातवंडांसमवेत चार दिवस रमून...

कसेही असले तरी भावी पिढीला भरभरून आशीर्वाद देत कधीतरी सरणावर चढतो,

तेव्हा पुरुषाचा बाप होतो...!!!!




 ___________________________________________________________________________________


अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.

ब्लॉग शेअर करा - 

                                 

ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com


__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________

फॉलोअर