बाप आणि आई माझे विठ्ठल रखुमाई

 बाप आणि आई माझे विठ्ठल रखुमाई




    डाव्या बाजूला वळून विठूमाऊलीने बघीतले रखुमाईची जरा वेगळीच गडबड दिसली. मग विठूमाऊलीने विचारले. काय माई गडबड कसली भक्तजणाच्या स्वागतासाठी काही वेगळी नवीन का तयारी?


   रखुमाई मग हळूच म्हणाली, माऊली जाऊन येते मी चार दिवस माहेरी.आईची सय येते भारी.


 अग हे ग काय?आषाढी चार दिवसावर आली. भक्तजणाची वारी उभी आता वेशीवरी. तु जवळ नसल्यावर भक्तजण होईल ग बावरे. 


   तुमचे आपले काहितरीच  भक्तजणाचे प्रेम फक्त माऊलीवरी. टाळ मृदंगाच्या गजरात फक्त माऊली दुमदुमते. मी या स्वरात कुठेच नसते.


  अग वेडाबाई हे कोणी तुझ्या मनात भरवले.नवीन पिढीचे वारे का तुझ्या डोक्यात शिरले?नाही हो  नाथा नाही, कोणी कशाला सांगायला हावे, मीच अनुभवते.


  आषाढी कार्तिकीला मला पंढरपुरात सगळा भार उचलावा लागतो. जो तो येतो मलाच विचारतो. माई बरोबर झाली ना तयारी? कोठे उणीव नाही ना, माऊली नाराज नको व्हायला!


    इथे पण सगळ्यांना तुमच्या नाराजीची काळजी.तरीही सोडून देते. मी पण हातातलं काम सोडते सगळे व्यवस्थित होते आहे ना पडताळून येते. अहोरात्र कामात व्यस्त असते.


   तुम्ही आपले कंबरेवर हात ठेवून फक्त सुचना देतात.सगळ्या कामाचे श्रेय घेऊन बसतात. मन कोठे तरी दुखावत.परत वारकरी येतात, तुमच्या पायावर डोके ठेवतात, धन्य झालो माऊली म्हणून समाधान मानतात.


    अलोट गर्दी मंदीरी, मिळाला चान्स तर माझ्या पायी त्यांचा माथा विसावतो. भक्तजण कायम तुमच्याबरोबर मला गृहीत का धरतो?


 माऊली खरे सांगु सगळे बदलय आता!आताची माई, माऊली पेक्षा चार काकण जास्त आहे. ती ते सिध्द करते. मुख्य म्हणजे बोलून दाखवते.


  खर सांगू माऊली मला पण हेच दु:ख आहे. मी सगळे व्यवहार सांभाळते.कोठे काय, कधी, याची मी तुम्हांला जाणिव करून देते. भक्तांचे गार्‍हाणं ध्यानात ठेवते. पण माऊली मी कुठेच का नसते?


   आता माझाही स्वाभीमान दुखावत आहे. मी केलेले कार्य माझेच हेच मलाही सिध्द करायचे आहे. किती दिवस तुमच्या बाजूला तटस्थपणे उभी राहू तेही मन मारून?


    माझ्या अस्तित्वाची मला जाणीव झाली. आता ही आषाढी वारी तुम्ही एकटेच निभावून न्या.तुम्हांलाही कळू द्या आणि भक्तजणालाही? बघा जमतंय का? जाऊन येते माहेरी!


    अग माई,नको हा हट्ट करू? सतत तुझ्या जवळ असण्याची सवय मला लागली तुच तर हे नका करू ते नका करू, करून मला आयतोबा बनवलेस!अग नारी शिवाय नर म्हणजे मीठा शिवाय स्वयंपाक ग! 


   नको करू हा अट्टाहास, तुझ्या शिवाय माझा काय संसार? दोघे मिळून तर सांभाळतो आहोत जगताचा कारभार.


   ऐवढेसे कारण माई तुला नाराज व्हायला.चल आज पासून तु सांभाळ सगळ्या जगताची धुरा,मी निवृत्ती घेतो.भक्तजणांचे गाऱ्हाणी ऐकून घे, मार्ग दाखव. सगळे सगळे तुच कर.फक्त मी, तु कोठेही येऊ देऊ नकोस. मी दुरून फक्त परिक्षण करतो. रुप पालटून घेऊ चालेल?


    नको, नको नाथा जमणार नाही मला. एवढी मोठी जबाबदारी, मी कसे सांभाळू एवढा भक्ताच्या लोंढा?


    उगाच आपलं बोलले पण आता समजले. ज्यांचे त्याचे काम ज्यांनी त्यानी करावं, कोणतेही काम मोठं छोटे नसते.भगवंत कुवतीप्रमाणे वाटून देतो. सगळ्यांनी हातभार लावायचा आणि हा संसाराचा गाडा चालवायचा.


   पटलं ना मग ,पण नाथा आता एक मात्र होईल. या विठूमाऊली बरोबर रखुमाई पण भक्ताच्या मुखी सदा राहील.तुच ऐक जरा भक्त जणांचा नाम घोष,"जय जय विठोबा रखुमाई"खरय हो मी माझ्या विचारात सगळे विसरले होते बाई! 


      खरे सांगु तुला एक माई, जसा चष्मा घालावा तसं जग दिसते.डोळे आणि कान यात चार बोटाचे अंतर असते. सुजाण आहेस जास्त विस्तारून सांगायची गरज नाही.


   नाथा, नाथा म्हणत रखूमाई मनातला  अविचाराचा पसारा आवरत, भरलेले गाठोडे (अहो माहेरी जाण्यासाठी) उलगडून आवरू लागली.मनातल्या अंहपणा व्देष, मत्सराचे गाठोडे बांधून वळचणीला टाकले.


     भक्तजण जवळ आले होते. टाळ चिपळ्यांसहित मधूर स्वर कानी पडत होते. "माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी!"..बाप आणि आई माझे विठ्ठल रखूमाई! 


   रखुमाईचा स्वर जड झाअला.माझीच लेकरं,हा कसला मला भेदभाव सुचला? चुक झाली नाथा, माऊली! माईचा कंठ दाटून आला.तिने डोळ्याला पदर लावला.


   माई सावर स्वतहाला गालातल्या गालात हसत विठूमाऊली बोलली,

   "विठोबा राजा रखुमाई राणी,

   चंद्रभागेला झुळझुळ पाणी.

   उभा विटेवरी कर कटेवरी,

    भजन करती वारकरी.

 नाथा,नाथा म्हणत रखुमाई देखील लाजली.


  "आषाढी एकादशी निमित्त लेख विठूमाऊली चरणी समर्पित!"






 ___________________________________________________________________________________


अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.

ब्लॉग शेअर करा - 

                                 

ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com


__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________

फॉलोअर