विश्वास
एक कीर्तनकार महाराज तीर्थटनाला निघाले.
वाटेत एका गावात मुक्कामी थांबले. ईश्वरसेवा म्हणून तेथील मंदिरात कीर्तन करू
लागले. गावकऱ्यांना त्याचे कीर्तन खूप आवडले. महाराजांची कीर्ती पसरू लागली. पंचक्रोशीतून
कीर्तनासाठी बोलावणे येऊ लागले. त्याच्या कीर्तनात भाविकांना पांडुरंगाच्या
दर्शनाची अनुभूती येत असे.
ही गोष्ट बादशहाच्या कानावर गेली. त्याने
महाराजांना आपल्या दरबारात बोलावून विचारले "तुम्ही मोठे कीर्तनकार आणि
पांडुरंगाचे भक्त अशी तुमची कीर्ती ऐकली. तुमच्याशी देव बोलतो, तुमचे ऐकतो, असे लोकांकडून समजले. तुम्ही तुमची
भक्ती सिद्ध करा. समजा मी जर एक गाय मारली, तर तुम्ही ती जिवंत केली पाहिजे. नाहीतर
ढोंगी बनून तुम्ही माझ्या प्रजेची दिशाभूल केल्याबद्दल मी तुम्हाला ठार मारीन.”
त्यावर महाराज म्हणाले "मी परीक्षा द्यायला तयार आहे, पण माझ्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी
तुम्ही निरपराध गायीपेक्षा तुमच्या जवळच्या कोणातरी व्यक्तीचा बळी द्यायला तयार असाल तर
सांगा.”
बादशहा चक्रावला. महाराजांकडून अशा
प्रश्नाची अपेक्षा नव्हती. त्याचा प्रश्नार्थक चेहरा पाहून महाराज म्हणाले
"तुम्ही तुमच्या राजपुत्राचा बळी देता का? मी माझ्या पांडुरंगाला सांगून त्याला
परत जिवंत करून
दाखवतो.” बादशहा स्वतःच्याच बोलण्यात अडकला. गायीच्या जागी स्वतःच्या मुलाचा बळी
देण्याच्या कल्पनेनेही त्याचे हातपाय थरथरू लागले.”तुमच्या भक्तीची परीक्षा
द्यायला मी माझ्या मुलाचा बळी देऊ शकत नाही. मात्र तुम्ही आता तुमची ही कीर्तन प्रवचन सेवा
थांबवा व तुमचा मुक्काम इथून हलवा.” बादशहा म्हणाला. महाराज म्हणाले "तुम्हाला माझ्या भक्तीचा
त्रास झाला कि तुमच्या विकृत मानसिकतेचा? तुम्ही गायीचा जीव द्यायला तयार होतात, पण मुलाच्या जीवाचा प्रश्न आल्यावर
तुम्ही तुमचा
विचार बदलला. त्यापेक्षा तुम्ही राजपुत्राचा नुसता बळी द्यायची तयारी दाखवली असती
तरी मी तुम्हाला नक्कीच अडवले असते. कारण कोणाच्याही जिवापेक्षा आमचा पांडुरंग
मोठा नाही, तर प्रत्येक जीवात
आमचा पांडुरंग आहे. तुम्ही म्हणालात तर मी गाव सोडून जाईन, पण तुम्ही अशी कोणाचीही परीक्षा बघू नका, हि विनंती करतो.”
महाराजांचे बोलणे ऐकूण बादशहा वरमला त्याने महाराजांची
क्षमा मागून त्यांचा आदर सत्कार केला. त्यांना नमस्कार करून म्हणाला "महाराज
तुमच्या पांडुरंगानेच माझ्या मुलाचे प्राण वाचवले, अन्यथा माझ्या अहंकारापोटी मी त्याचे
प्राण घ्यायलाही कमी केले नसते, पण
तुम्ही मला भगवंतांच्या अस्तित्वाची ओळख करून दिलीत. आजवर गावकऱ्याकडून ऐकले कि
तुमच्या कीर्तनात पांडुरंग भेटतो, तो
आज मला तुमच्यात दिसला.”
___________________________________________________________________________________
अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.
ब्लॉग शेअर करा -
ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com
__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________