लंकेची पार्वती


लंकेची पार्वती



                    आपण अनेकवेळा लंकेची पार्वती हा शब्द ऐकला असेल. लंकेची पार्वती ही एक उपमा असून ती निर्धन अथवा अत्यंत गरीब स्त्रीसाठी वापरली जाते. पण पार्वती ही एक देवी आणि लंका ही सोन्याची नगरी असूनही लंकेची पार्वती म्हणजे निर्धन  स्त्री असा अर्थ का घेतला जातो, काय आहे यामागील कारण हे आपण जाणून घेणार आहोत.

                    एकदा देवी पार्वतीने लक्ष्मीला भेटायला जाण्याचा विचार केला. तिने भोलेनाथांची परवानगी घेतली. पार्वतीला वाटले लक्ष्मी आपले खूप आदरातिथ्य करेल, पण प्रत्यक्ष मात्र काही वेगळे घडले. घरी आलेल्या पार्वतीला लक्ष्मीने पाणीही विचारले नाही. उलट अभिमानाने स्वतःचा तोरा मिरवत तिचे सारे राजभवन, धन, वैभव, नोकर-चाकर दाखवून खूप हिणवलं आणि "ज्याला सार जग त्रिपुरारी म्हणून ओळखत, तो तुझा भिक्षुक नवरा कुठे आहे? चिताभस्म, त्रिशूळ, फावडी आणि फाटकं मृगाजिन घेऊन कुठे बस्तान बसविले आहे?" असे विचारले. पार्वतीने हे ऐकताच तिचा क्रोधाग्नि भडकला. ओठ थरथरले, जीभ फडफडली. ती म्हणाली "तू माझा सन्मान नाही केलास तरी चालेल, पण माझ्या पतीचा अपमान मी विनाकारण सहन करणार नाही. माझ्या पतीला भिकारी म्हणताना तुला काहीच कसे वाटले नाही? खरतर तुझ्या पतीला दुताखेरीज काहीच काम नाही. तोच भिक्षुक बनून शिवाकडे आणि वामन बनून बळीकडे गेला. सतत सगळीकडे आपली झोळी फिरवून भीक मागत असतो. दधिच ऋषींकडे तर त्याने हाडे भिक्षा म्हणून मागितली होती, विसरलीस का? शंकर तर जगाचे तारणहार, भोले-भंडारी आहेत"

                    पार्वती चिडून उद्विग्नह मनाने कैलास पर्वतावर परतली. पार्वतीला पाहून भगवान भोले-भंडारी म्हणाले "देवी, आज तुझा चेहरा एव्हढा उदास का?" त्यावर पार्वतीने लक्ष्मीने केलेल्या उपहासाच वर्णन शंकराला सांगितले. आजपासून मी अन्न-पाणी अजिबात घेणार नाही, उपाशी राहून माझे प्राण गेले तरी बेहत्तर. तुम्हाला जर माझे प्राण प्रिय असतील, तर मी सांगते तसा महाल मला बनवून द्या. महाल बनविल्यावर गृह्प्रवेशासाठी लक्ष्मीला आमंत्रित करून मला माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. माझ्या अपमानाचा असा बदला घेईन कि सारी दुनिया बघत राहील. " ह्यावर शंकरानी पार्वतीला खूप समजावलं "मानापमान हे सारे आपण मानण्यावर असतं. कडवट बोलणे विसरून तुझे मन शांत कर, त्यातच सुख आहे. "

                    पण पार्वती ऐकता हट्टाने रडू लागली. मग शंकरानी विश्वकर्माला संदेश पाठवून आमंत्रित केले सांगितले "पार्वती दुखी कष्टी आहे. तुम्ही तिला हवा तसा महाल बांधून देऊन तिचे कष्ट दूर करा. " पार्वती खुश होऊन विश्वकर्माला सांगू लागली "मला समुद्राच्या मध्यभागी एक नगर वसवायचे आहे. ज्याला चार दरवाजे असतील, असा किल्ला बनवायचा आहे. जिथे थंड-गरम पाण्याचे तलाव असतील, सुंदर सुंदर बागबगीचे, स्वच्छ रस्ते असतील. माझ्या महालाच्या छतालाही तुम्ही सोने लावा. सगळे दरवाजे सोन्याचे बनवून मध्ये-मध्ये सोने हिरे, मोती, माणिक जडवा. चमचमत्या फरश्यावर रंगीबेरंगी मीनाकारी करा. भिंती, छत, अंगण सोन्याचेच बनवा. मंच, पलंग इतकंच काय, महालातील भांडीसुद्धा सोन्याचीच हवीत आजपर्यंत असा महाल कुणीच बनविला नसेल, बघितला नसेल. लक्ष्मीने असा महाल बघितल्यावर मान खाली घातली पाहिजे. "

                    विश्वकर्माने सगळे समजून घेतल्यावर ब्रम्हलोकातून आपले अनुयायी बोलावून घेतले. अनुयायी येताना भवन निर्माण कलेचे सगळे सामान सोबत घेऊन आले. सर्वोत्कृष्ट वास्तुकलाकार म्हणून आदिकाळापासून विश्वकर्मा प्रख्यात होता. चित्रकला, मूर्तिकला ह्या सारख्या नानाविध कला वापरून भवन वास्तू निर्माण करण्यात तो निपुण होता. डोळे मिटून आपल्या मनात जी कल्पना करी, ती डोळ्यासमोर पूर्णत्त्वास आणी. तसाच एक चमत्कार विश्वकर्माने या वेळीही दाखविला. समुद्राच्या मधोमध एक दिव्य भवन, अनोखा महाल उभारून दाखविला.



                    शंकर पार्वती तेथे आल्यावर पार्वती खूप हर्षित झाली. माझ्या कल्पनेतील, माझ्या स्वप्नातील सुंदर असा स्वर्णमहाल बनला आहे. पार्वतीने शंकराला सांगितले "हे त्रिपुरारी, ह्याच्या गृह्प्रवेशाला मला एक यज्ञ करायचा आहे. सर्व देवीदेवतांसोबत लक्ष्मीला बोलवायचे आहे. " तिचे आनंदाश्रू पाहून भगवान विचारात पडले. त्यांना पार्वतीचे मन मोडविले नाही. ३३ कोटी देवीदेवतांना निमंत्रणे गेली. विश्रवा पंडित यांना पूजेसाठी बोलावण्यात आले. लक्ष्मी-विष्णू, ब्रह्मा, इंद्र सगळे देव समुद्राच्या मध्ये असलेला स्वर्णमहाल बघून हर्षभरित झाले.

                    पार्वती लक्ष्मीच्या हाताला धरून आपला सोन्याच्या विटांनी बनलेला महाल दाखवू लागली आणि म्हणाली "बघ, ज्याला तू भिक्षुक म्हणाली, त्या त्रिपुरारीचा हा चमत्कार आहे. हा त्याच भिकाऱ्याचा महाल आहे, जो बघायला आज सारी दुनिया आली आहे. झरोके, खिडक्या, दरवाजे, इतकंच काय जमीनही सोन्याची आहे. माझ्या महालाच्या कोपऱ्याइतकीही तुझ्या महालाची लायकी नाही. "

                    यज्ञासाठी मंडप सजवून तयार केला गेला. त्यात शंकर पार्वतीने पूजा करून यज्ञ केला. विश्रवा ऋषींनी विधी-विधान करीत मंत्र पठण करीत, होम, आहुती, पूजेच्या प्रत्येक क्रिया समजावून देत होते. पूर्णाहुती पडल्यावर सर्व देवीदेवतांनी फुलांचा वर्षाव केला. नभांगण शिवपार्वतीच्या जयजयकाराने दुमदुमू लागले. देवदेवता, योगी, ब्राम्हण, साधू, भिक्षु सगळ्यांची भोजने झाली. मान-सन्मान, दक्षिणा दिल्यावर सर्वानी प्रस्थान केले. शेवटी शिवशंकरानी विश्रवा ऋषींना आपल्याजवळ बोलावून म्हणाले "आपल्या येण्याने आज आम्ही धन्य झालो. तुम्हाला हवे ते मागा. आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न आहोत. " त्यावर विश्रवा ऋषी म्हणाले "भगवंत, तुम्ही खरच माझी झोळी भराल? आता जे म्हणालात, ते वचन नक्की पुरे कराल? भगवान म्हणाले "मनात कसलीही शंका आणू नका. माझे वचन पूर्ण होते, असा त्रिवेणी डंका आहे. मी खरच खूप प्रसन्न आहे. तुम्हाला काय वरदान पाहिजे, ते मागा. " शीर झुकवून विश्रवा ऋषी म्हणाले "मला हा सुवर्णसिंधु हवा आहे, जिथे हे सुंदर भवन उभारले आहे."

                    हे ऐकता क्षणी उपस्थित सर्व लोक आश्चर्याने पाहू लागले. पार्वतीच्या मनावर जसा वज्राघात झाला. एका क्षणात तिच्या स्वप्नाची राखरांगोळी झाली. तिने विश्रवा ऋषीला शाप दिला "एक दिवस तुझे नामोनिशाण मिटून जाईल. काळाच्या ओघात तुझी हि सुवर्ण नगरी राख होऊन जाईल. तुझा दिवा विझून गणघोर रात्र होईल. " आपल्याजवळ होते-नव्हते ते दाग-दागिने, सारे वैभव, तिने विश्रवा ऋषींना दान केले. पार्वती निष्कांचन झाली. लंकेची पार्वती म्हणजे निर्धन स्त्री, अशी म्हण रुढ झाली.

                    विश्रवा ऋषी म्हणजे रावणाचे पिता. पुढे वीर हनुमानाने श्री रामाला सीतेच्या शोधात मदत करत असताना लंकेला जाऊन लंकेचे दहन केले. पुढे झालेल्या युद्धात रावण हत्येसह रावणाचा निर्वंश झाला. पार्वतीचा शाप खरा ठरला. वीर हनुमानही भगवान शिवाचाच अवतार. कर्ता करविता तोच, भोळा सांब !!!


 ___________________________________________________________________________________


अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.

ब्लॉग शेअर करा - 

                                 

ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com


__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________

फॉलोअर