दहा दिवस गणपती प्रतिष्ठापन का करतात ?
भाद्रपद महिना आला की एक प्रकारचे आनंदमयी वातावरण तयार होऊ लागते. सगळीकडे श्री गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी होऊ लागते. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. नंतर दहाव्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला बाप्पाचे विसर्जन केले जाते. पण बाप्पाला दहा दिवस का बसविले जाते, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
आपल्या धर्मग्रंथानुसार महर्षि वैद्यांनी महाभारत हे महाकाव्य रचले. परंतु त्यांना लिखाण करणे शक्य होत नव्हते. म्हणून त्यांनी गणपतीची आराधना केली आणि गणपतीला महाभारत हे महाकाव्य लिहिण्याची विनंती केली. गणपतीने होकार दिला. हे लिखाण दिवस रात्र चालले. त्यामुळे गणपतीच्या शरीरातील पाणी वर्ज्य होऊन त्याला थकवा आला. अशा वेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये, म्हणून गणपतीला मातीचे म्हणजे मृतिकेचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला यथासांग पूजा केली. मातीचे लेपन केले म्हणून गणपती आखडून गेला, म्हणून त्याला पार्थिव गणेश असे नाव पडले. हे लिखाण दहा दिवस चालले. अनंत चर्तुदशीला हे लिखाण संपल्यावर व्यासांनी गणपतीकडे पाहिले असता, त्याच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते. ते तापमान कमी व्हावे आणि गणपतीच्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपतीला पाण्यात विसर्जित केले. या दहा दिवसात व्यासांनी गणपतीला वेगवेगळे पदार्थ खाण्यास दिले. तेंव्हा पासून गणपती बसवण्याची प्रथा पडली.
आजही दहा दिवसांच्या काळात गणपतीला वेगवेगळ्या मिठाई व खाद्यपदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. बाप्पाला प्रतिष्ठापित करताना मनमोहक अशी सजावट केली जाते. तसेच अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातून वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, गरजूंना दानधर्म अशी कार्ये केली जातात. अनेक मंडळांतर्फे वेगवेगळे खेळांचे किंवा कार्यक्रमांचे आयोजन होते. नाटके व एकांकिका सादर केल्या जातात. विविध धार्मिक व सामाजिक विषयांवर भाष्य करणारे देखावे सादर होतात. ढोल-ताशे, लेझीम, कवायती, नृत्य असे विविध कलाविष्कार या दहा दिवसात सादर करण्यात येतात. अनंत चतुर्दशीला भव्यदिव्य अशा विसर्जन मिरवणुकांनी परिसर व्यापला जातो. जल्लोषाच्या आणि आनंदाच्या वातावरणात भक्तिमय रित्या गणपती बाप्पाला निरोप दिला जातो.
थोडक्यात श्री गणपती बाप्पाचे दहा दिवस हे आनंदाचे, हर्षोल्लासाचे, भक्तीचे, एकोप्याचे, कलाविष्काराचे, समानतेचे असतात. प्रत्येक भक्तगण या दिवसात सर्वात जास्त आनंदी असतो. आपणही असेच आनंदी राहावे व श्री गणेशाची कृपा आपल्यावर सदैव राहावी, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
___________________________________________________________________________________
अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.
ब्लॉग शेअर करा -
ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com
__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________