आईच्या चप्पलची किंमत
एक मुलगा आपल्या पहिल्या पगारातून आपल्या आईसाठी चप्पल खरेदी करण्यासाठी दुकानात जातो. दुकानदाराला लेडीज चप्पल दाखवण्याची विनंती करतो. दुकानदार पायाचे माप विचारतो त्यावर तो मुलगा "माझ्याकडे आईच्या पायाचे माप नाही, पण कागदावर आकृती आहे. त्यावरून तुम्ही चप्पल देऊ शकाल?" असे विचारतो. दुकानदाराला हे ऐकून नवल वाटले.”आजपर्यंत अशी आकृती पाहून आम्ही चप्पल कधी दिली नाही. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या आईलाच का सोबत आणत नाही?" असे विचारतो.
मुलगा म्हणतो "माझी आई गावाला आहे. आजवर तिने कधीच चप्पल घातली नाही. माझ्यासाठी मात्र खूप कष्ट घेऊन तिने माझे शिक्षण पूर्ण करून दिले. आज मला माझ्या नोकरीचा पहिला पगार मिळाला आहे, त्यातून आईला भेट म्हणून मी चप्पल घेणार आहे. हे ठरवूनच मी घरून निघताना आईच्या पावलाची आकृती एका कागदावर काढून आणली होती.” असे म्हणून त्याने तो आकृतीचा कागद दुकानदाराला दिला. दुकानदाराचे डोळे पाणावले. त्याने साधारण अंदाज घेत त्या मापाच्या चप्पला दिल्या. सोबत आणखीन एक जोड देत म्हणाला "आईला सांगा, मुलाने आणलेला चप्पलेचा जोड खराब झाला तर दुसऱ्या मुलाने दिलेला जोड वापरा. पण अनवाणी पायाने फिरू नकोस.”
हे ऐकून मुलगा भारावला गेला. त्याने पैसे देऊन दोन्ही जोड घेतले आणि जायला निघाला.”तुमची हरकत नसेल तर आईच्या पायाच्या मापाची आकृती असलेला कागद मला द्याल का?" असे दुकानदाराने विचारले. मुलाने प्रतिप्रश्न न करता कागद दुकानदाराला दिला आणि निघाला. दुकानदाराने तो कागद घेऊन देवघरात ठेवला व श्रद्धापूर्वक नमस्कार केला. बाकीचे कर्मचारी अवाक झाले. त्यांनी कुतुहलाने दुकानदाराला तसे करण्यामागचे कारण विचारले, तेव्हा दुकानदार म्हणाला "ही केवळ पावलांची आकृती नाही, तर साक्षात लक्ष्मीची पावले आहेत. ज्या माऊलीच्या संस्कारानी या मुलाला घडवले, यशस्वी होण्याची प्रेरणा दिली. ही पावले आपल्याही दुकानाची भरभराट करतील याची खात्री आहे. म्हणून त्यांना देवघरात स्थान दिले" आणि अशा रीतीने जर प्रत्येकाने आईची किंमत ओळखून तिची सेवा केली, योग्य सन्मान केला, तर खऱ्या अर्थाने परमेश्वराची सेवा होईल.
___________________________________________________________________________________
अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.
ब्लॉग शेअर करा -
ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com
__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________