सेवा भाव
वासु भाई आणि वीणा बेन गुजरातमधील एका शहरात राहतात. आज दोघंही प्रवासाला निघण्याची तयारी करीत होते. तीन दिवसांची सुट्टी मिळणार होती. व्यवसायनं ते दोघेही डॉक्टर आहेत.त्यामुळे खूप मोठी सुट्टी ते घेऊच शकत नाहीत. परंतु जेव्हा केव्हा त्यांना दोन तीन दिवसाची सवड मिळते तेव्हा तेव्हा ते त्या काळात दोन तीन दिवस कुठल्यातरी ठिकाणाला भेट देतातच.
आज त्यांचा इंदौर- उज्जैनला भेट द्यायचा विचार होता.
ते दोघेही जेव्हा एकत्र वैद्यकीय महाविद्यालयात शिकत होते तेव्हाच ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि वैद्यकीय शिक्षण पूर्ण होता होता त्यांच्या प्रेमाचा वटवृक्ष तयार झाला होता. वैद्यकिय शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघांनीही आपल्या कुटुंबीयांच्या संमतीनं विवाह केला. आता विवाहाला दोन वर्षे झालेली आहेत, पण अजून तरी ते दोघांचे तीन झालेले नाहीत. म्हणूनच, फुरसत मिळाली की ते कुठेतरी प्रवासाला जाऊन येतात. दोघांनाही प्रवास करायला भारीच आवडतंही.
विवाहानंतर दोघांनीही बँकेचं कर्ज घेऊन आपापली इस्पितळं थाटली आहेत. वीणाबेन स्त्री-रोग विशेषज्ञ आहेत तर वासुभाई एम डी आहेत. दोघेही निष्णात डॉक्टर असल्यामुळे त्यांचा व्यवसाय चांगला सुरू आहे.
तर त्यादिवशी ते आपल्या कारनं प्रवासाला निघाले. आकाशात ढगांनी गर्दी केली होती. मध्यप्रदेशची सीमा अजूनही जवळपास दोनशे किलोमीटर दूर होती तेव्हाच पावसाला सुरुवात झाली होती. म.प्र. सीमेच्या ४० कि.मी. आधीचं एक छोटं शहर पार करण्यासाठी त्यांना बराच उशीर झाला. रस्त्यावरील चिखल आणि वाहनांची गर्दी यातुन कसाबसा रस्ता काढत ते मध्यप्रदेशच्या सीमेकडे जाऊ लागले.
संध्याकाळचं जेवण मध्यप्रदेशातील एखाद्या गावामध्ये उरकण्याचा त्यांचा विचार होता परंतु पावसामुळे त्यांना उशीर होत होता. आता दुपारच्या चहाची वेळ झाली होती. मध्य प्रदेशातील ते शेवटचं छोटं शहर ओलांडून त्यांची कार चार ते पाच किलोमीटरवर पोहोचली असेल नसेल इतक्यात त्यांना रस्त्याच्या लगत असलेले एक छोटसं घर दिसलं त्या घराच्या बाहेर वेफर्सची पाकीटे लटकलेली होती. हे बहुधा एखादं छोटेखानी हॉटेल असावं असं त्यांना वाटलं.
वासुभाईनं त्या ठिकाणी आपली कार थांबवली. ते दुकानावर गेले परंतु समोर कुणीच नव्हतं.
त्यांनी आवाज दिला. घरातून एक महिला बाहेर आली. तिनं विचारलं, "काय हवंय भाऊ आपल्याला ?"
वासुभाईनं वेफर्सची दोन पाकिटं घेतली आणि ते म्हणाले, "ताई, जरा दोन कप चहा बनवून देता का? जरा लवकर हं, आम्हाला अजून बरंच दूर जायचं आहे." ती हो म्हणाली.
पाकीटं घेऊन वासूभाई कार मध्ये जाऊन बसले. दोघांनीही वेफर्सचाच नाष्टा केला. अजून पर्यंत चहा आला नव्हता. दोघंही कार मधून बाहेर निघून दुकानासमोर ठेवलेल्या खुर्च्यांवर जाऊन बसले.
वासुभाईनं फिरून आवाज दिला.
इतक्यात घरातील ती महिला आतून बाहेर आली आणि म्हणाली, "माफ करा हं! परसात तुळशी आणायला गेले होते. तुळशीची पानं आणायला वेळ लागला. आता लगेच चहा बनवून देते."
काही वेळानंतर एका प्लेटमध्ये दोन मळकट कप घेऊन त्यातून गरमागरम चहा घेऊन ती बाहेर आली. ते मळके कप बघून वासूभाई एकदम अपसेट झाले आणि आता त्यावर ते काही बोलणार इतक्यात वीणाबेननं वासूभाईंच्या हातावर अलगद आपला हात ठेवला आणि काहीही न बोलण्याचा त्यांना इशारा केला.
दोघांनी चहाचे कप आपल्या हाती घेतले चहाला मस्त आल्याचा आणि तुळशीच्या पानांचा सुगंध येत होता. दोघांनीही चहाचा एक घोट घेतला. इतका स्वादिष्ट आणि सुगंधित चहा ते दोघेही जीवनात पहिल्यांदाच पित होते. त्यांच्या मनाची अस्वस्थता कुठल्या कुठे पळून गेली.
चहा पिऊन झाल्यावर वासू बाईंनी त्या महिलेला विचारलं, "किती पैसे झाले?"
महिला म्हणाली, "वीस रुपये"
वासुभाईनं शंभराची नोट पुढे केली.
महिला म्हणाली, "भाऊ सुट्टे पैसे नाहीत. कृपया वीस रुपये सुट्टे द्याना."
वासुभाईनं वीस रुपयांची नोट देऊ केली.
महिलेनं शंभराची नोट परत केली.
वासुभाई म्हणाले, "आम्ही तर वेफर्सची पाकीटंही घेतली आहेत !
महिला म्हणाली, "वीस रुपये त्याचेच झाले. चहाचे पैसे नाही घेतले."
"अरे! चहाचे पैसे कां नाही घेतलेत ?"
ती म्हणाली, "आम्ही चहा विकत नाही. हे हॉटेल नाही."
"मग आपण चहा कशाला बनवून दिलांत ?"
"आपण अतिथि आहात. आपण चहा मागितला. आमच्यापाशी दूधही नव्हतं. आमच्या छोट्या मुलाकरता थोडं दूध वेगळं काढून ठेवलं होतं. परंतु आता तुम्हाला नाही कसं म्हणायचं? म्हणून मग मुलासाठी बाजूला काढून ठेवलेल्या दुधाचा चहा तुम्हाला करून दिला."
"मग आता त्या छोट्या मुलाला काय पाजणार ?"
"एक दिवस दूध प्यायला मिळालं नाही म्हणून कांही तो मरून नाही जाणार. याचे वडील आजारी आहेत. ते शहरात जाऊन दूध आणू शकले असते. पण त्यांना कालपासुन ताप आहे. आज जर ते बरे झाले तर उद्या सकाळी गावात जाऊन ते दूध घेऊन येतील."
वासुभाई त्या महिलेचे हे बोलणं ऐकून एकदम गप्प झाले. त्यांच्या मनात विचार आला, 'या महिलेनं हे तिचं हॉटेल नसून घर असतानासुद्धा आपल्या मुलासाठी काढून ठेवलेल्या दुधाचा चहा बनवून दिला आणि ते सुद्धा केवळ एवढ्यासाठीच की मी मागितला म्हणून, आणि मी अतिथी आहे आणि अतिथीनं कांही मागितलं आहे असं समजून! संस्कार आणि सभ्यता यामध्ये ही महिला माझ्या खूप पुढे आहे.'
ते त्या महिलेला म्हणाले, "आम्ही दोघेही डॉक्टर आहोत. आपले पति कुठे आहेत?"
महिला त्यांना घराच्या आत घेऊन गेली घरातलं दारिद्र्य बघता क्षणीच लक्षात येण्यासारखं होतं.
आंत एका खाटेवर एक गृहस्थ झोपून होता. फार हडकुळा दिसत होता.
वासुभाईनं जाऊन त्याच्या कपाळावर आपला हात ठेवला. त्याचं कपाळ बरंच गरम वाटत होतं. त्या गरम कपाळावर ठेवलेला त्यांचा हातही गरम झाला होता. थंडी आणि तापामुळं त्या गृहस्थाचं सर्वांग थरथरत होतं.
वासुभाई परत आपल्या कारपाशी गेले. कार मधून त्यांनी आपली औषधाची बॅग उचलली. त्यातून २, ३ औषधी गोळ्या काढून त्यांनी त्या आजारी माणसाला पाण्यासोबत घ्यायला सांगितल्या आणि ते त्याला म्हणाले, "केवळ या गोळ्यांनी हा रोग बरा होण्यासारखा नाही. मी हा असाच मागल्या शहरात जाऊन इंजेक्शन आणि सलाईनची बाटली घेऊन येतो."
वीणाबेनला रोग्यापाशी बसायला सांगून ते गाडी घेऊन शहरात गेले. तिथून अर्ध्या तासामध्ये सलाईनची बाटली आणि इंजेक्शन्स घेऊन ते परत आले. सोबतच त्यांनी दुधाच्या पिशव्याही आणल्या होत्या.
त्यांनी पहिल्यांदा त्या आजारी माणसाला इंजेक्शन दिलं, सलाईनची बाटली वर भिंतीला लटकवून त्याला सलाइन लावलं. सलाईनची बाटली संपेपर्यंत ते दोघेही डॉक्टर पती-पत्नी त्याच्या उशाशी बसून होते.
त्या महिलेनं पुन्हा एकदा तुळशी आणि आलं घालून केलेला चहा दोघांनाही प्यायला दिला. दोघांनीही चहा घेतला आणि चांगला चहा पाजल्याबद्दल त्या महिलेचे फिरून एकदा आभार मानले.
जेव्हा आणखी कांही वेळानंतर त्या आजारी माणसाची तब्येत थोडी सुधरली तेव्ह मग डाॅक्टरद्वय आपल्या पुढील प्रवासाला रवाना झाले.
तीन दिवस इंदौर-उज्जैनला राहून जेव्हा ते परतले, तेव्हा येतांना त्यांनी त्या महिलेच्या मुलासाठी ढिगभर खेळणी आणि दुधाची पाकिटं आणली. त्यांनी त्याच दुकानासमोर आपली गाडी उभी केली.
बाहेरूनच त्यांनी त्या महिलेला आवाज दिला. आवाज ऐकून ती दोघंही नवराबायको घराबाहेर आले. समोरच्या डॉक्टरद्वयांना पाहून त्यांना खूप आनंद झाला. तो आजारी माणूस सांगू लागला, "डाॅक्टर, तुम्ही दिलेल्या औषधांनी मला लगेच दुसऱ्या दिवशीपासूनच बरं वाटू लागलं होतं."
वासुभाईंनी त्याच्या लहान मुलाला खेळणी दिली. दुधाची पाकीटं त्या महिलेच्या हवाली केली.
फिरून एकदा, तशाच आलं, तुळशीपानं घातलेल्या चहानं त्या डॉक्टरांचं स्वागत झालं. आता दोन्ही कुटुंबात आपलेपणा निर्माण झाला होता.
वासुभाईंनी आपलं व्हिजिटिंग कार्ड त्यांच्या हाती ठेवलं आणि म्हणाले, "तुमचं जेव्हा केव्हा आमच्या गावी येणं होईल तेव्हा आमच्याकडे नक्की या." त्यानंतर ते दोघंही आपल्या गांवी रवाना झाले.
शहरात परतल्यावर वासुभाईं त्या महिलेची गोष्ट विसरले नाहीत. त्यांनी आपल्या मनाशीच एक निर्धार केला.
आपल्या इस्पितळातील रिसेप्शनवर बसलेल्या व्यक्तिला ते म्हणाले की येथून पुढे आपल्या इस्पितळात जे कुणी रोगी येतील त्यांचं नांव तेवढं रजिस्टरवर नोंदवायचं, त्यांच्याकडून फी वसूल करायची नाही. फी मी स्वतःच त्यांच्याकडून घेईन.
आणि मग त्या दिवसापासून जेव्हा पेशंट त्यांच्या दवाखान्यात येत ते गरीब असतील तर त्यांच्याकडून डॉक्टर फी घेत नसत. केवळ ऐपत असलेल्या पेशंट्सकडूनच ते फी घेऊ लागले.
हळू हळू शहरात त्यांची भरपूर प्रसिद्धी झाली.
दुसर्या डॉक्टरांच्या कानावर ही प्रसिद्धी पडली तेव्हा यामुळे आपली प्रॅक्टिस कमी होईल आणि लोक आपली निंदा करू लागतील अशी त्यांना भिती वाटू लागली. त्यांनी असोसिएशनच्या अध्यक्षांना हे सांगितलं :
असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वासुभाईंना भेटायला आले आणि ते त्यांना म्हणाले, "आपण हे सारं कशासाठी करीत आहात?"
तेव्हा वासुभाईंनी जे उत्तर दिलं ते ऐकून असोसिएशनचे अध्यक्ष देखिल प्रभावित झाले.
वासुभाई म्हणाले, "मी माझ्या जीवनातील प्रत्येक परीक्षेत मेरिटमध्ये पहिल्या क्रमांकाने पास होत आलेलो आहे; एम.बी.बी.एस. मध्येही, एम.डी. मध्येही गोल्ड मेडलिस्ट होतो परंतु सभ्यता, संस्कार आणि अतिथि सेवा यांत ती खूप गरीब असलेली गांवातली महिला माझ्या समोर निघून गेली आहे. मग मी कसा मागे राहू ? म्हणूनच मी अतिथि-सेवा आणि मानव-सेवा यांतही गोल्ड मेडलिस्ट होणारच. तेवढ्याच साठी मी ही सेवा सुरू केली आहे. आणि मी तर म्हणतो की आपला वैद्यकीय व्यवसाय हा मानव सेवेचाच व्यवसाय आहे. सगळ्या डॉक्टर लोकांना मी आवाहन करतो की त्यांनी सेवा भावनेनं आपला व्यवसाय करावा. गरीबांची नि:शुल्क सेवा करावी, उपचार करावा. हा व्यवसाय केवळ कमाईचा व्यवसाय होऊन रहायला नको. भगवंतानं आपल्याला मानव-सेवेची संधी दिलेली आहे."
असोसिएशनच्या अध्यक्षांनी वासुभाईंना प्रणाम केला आणि त्यांना धन्यवाद देत ते म्हणाले की मीही यापुढे याच भावनेनं माझा व्यवसाय चालवणार आहे.
___________________________________________________________________________________
अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.
ब्लॉग शेअर करा -
ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com
__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________