अप्रूप


 अप्रूप .....




परवा बऱ्याच वर्षांनी माझ्या शाळेत गेलो होतो ... फिरता फिरता एक कपाट नजरेस पडलं...... वर लिहिलं होतं .. “हरवले सापडले विभाग” ..... तीच पूर्वीची  

 जागा ..  कपाटही तेच असावं बहुधा .... पण आज ते खूपच खिन्न वाटत होतं .... सुरवातीला वाटलं की कपाटाच्या वयोमानामुळे असेल ... पण नंतर नजर त्या कपाटातल्या वस्तूंवर गेली आणि मग त्याची उद्विग्नता नेमकी कशामुळे होती याचा अंदाज आला ... आत इतक्या वेगवेगळ्या महागड्या वस्तू  , Tupper ware च्या बाटल्या , रुमाल , चित्रकलेच्या वस्तू ,  पेनं , key chains, कंपास , पेन्सीलचा तर खचंच पडला होता ....... शाळेतल्या बाईंना विचारलं तर त्या म्हणाल्या, आज काल मुलं आपली वस्तू हरवली की विचारतच नाहीत . 

कित्येकदा आम्ही वर्गावर्गात जाऊन विचारतो तरी आमचं नाही असं म्हणतात . 


कदाचित घरी गेल्यावर ती वस्तू काही मिनिटात त्यांच्या हातात येऊन  पडत असेल . याला कारणं अनेक असतील. उंचावलेला आर्थिक स्तर , जे आपल्याला मिळालं नाही तर ते आपल्या मुलांना मिळावं ही वारसा हक्कानी मिळालेली विचारसरणी, कुटुंब छोटी झाल्याने एकाच्याच वाट्याला येणारे सगळे लाड आणि अशी अनेक कारणं  .... ही कारणं त्या त्या ठिकाणी योग्य असतीलही.......पण ....


 पूर्वी आमचा साधा Eraser जरी शाळेत विसरला ज्याला त्या काळी आम्ही “खोड रबर “ म्हणायचो , तरी दुसऱ्या दिवशी तो याच हरवले सापडले विभागाच्या कपाटात ‘याची देही याची डोळा’ बघत नाही तो पर्यंत होणारी घालमेल , मग ती वस्तू आपलीच कशी आहे  , त्यावर पेनानी काढलेला star मीच काढला होता हे पटवून देण्यासाठीची धडपड .... त्यासाठी वेळप्रसंगी मधल्या सुट्टीत वर्गातून आयात करावे लागणारे साक्षीदार .... आणि शेवटी ती हरवलेली वस्तू पुन्हा आपल्या हातात पडली की मिळणारे समाधान .... अशा अनेक गोष्टींमधली गंमत ही आजकालच्या मुलांना माहितीच नाहीये . आम्ही एका वेळेस १-२ पेन्सिल्स घ्यायचो , आता अख्खा box घेतो  ... आधीच्या वर्षीच्या वह्यांमधली उरलेली पानं फाडून त्याचं binding करुन ती रफ वही म्हणून आनंदानी वापरायचो आता वेगवेगळ्या design च्या वह्या घेतो ...... जुन्या जाड कॅलेंडर ची पानं कव्हर म्हणून घालायचो आता Plastic Coated वगैरे वगैरे ... एकंदरीत लक्षात आलं कि आजकालच्या मुलांना कसलं अप्रूपच राहिलं नाहीये .  अप्रूप ...........खरंच... सगळ्याच्या व्याख्याच बदलल्यात आता ...... पण या घटनेनी मला मात्र Flashback मध्ये नेलं...


खडूंचा पूर्ण भरलेला box बघण्याचं अप्रूप .....

तो रंगीत खडूंचा असेल तर जरा जास्तंच अप्रूप......

बाईंनी खडू आणायला पाठवलेल्या मुलाने हळूंच खिशातून स्वतःसाठी आणलेला एक खडू सगळ्या वर्गाला World Cup जिंकल्याच्या थाटात दाखवण्याचं अप्रूप.....

धडपडल्यावर गुलाबी-लाल रंगाचं औषध लावून घेण्याचं अप्रूप.....

Lab मधल्या काकांना मस्का मारून Litmus Paper ढापण्याचं अप्रूप....

हस्तकलेच्या वेळेस हाताला चिकटून वाळलेल्या फेविकॉलचे पापुद्रे काढण्याचं अप्रूप......

स्पोर्ट्स च्या वेळेस एखाद्याला काही कारणास्तव ग्लुकॉन डी दिलं कि त्याचं अप्रूप....

gathering च्या practice साठी एकाचा टेप रेकॉर्डर घेऊन दुसऱ्याच्या घरी जाण्याचं अप्रूप....आणि बरंच काही...


आजच्या जमान्यात “फालतू” वाटणाऱ्या अशा अनेक साध्या साध्या गोष्टी आम्ही जगलो होतो आणि खूप enjoy केल्या होत्या .


त्या हरवले सापडले कपाटातल्या हरवलेल्या वस्तू त्या त्या मुलांना सापडल्या नसल्या तरी मला मात्र त्या कपाटामुळे माझ्या “हरवलेल्या अनेक जुन्या आठवणी सापडल्या” ...


तेवढ्यात लक्ष घड्याळ्याकडे गेलं ... मी भूतकाळातून वर्तमानात आलो आणि लगेच तिकडून निघालो ... बाहेर एक मित्र भेटला .... घाईत होता ... त्याचा मुलगा काल शाळेत colour box हरवून आला होता .. त्यामुळे नवीन घ्यायला चालला होता .....


लेखक :- क्षितिज दाते, ठाणे



  ___________________________________________________________________________________


अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.

ब्लॉग शेअर करा - 

                                 

ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com


__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________

फॉलोअर