आईचा शोध


आईचा शोध

आईचा शोध



तुझ्यासारखीच झाले आता मी ही


सिल्क ची साडी महाग आहे 

म्हणून तिथेच ठेवून द्यायचीस तू आई,

पण पाहुण्यांसाठी महागडे कप मात्र जमवत रहायचीस.

तुझ्या काटकसरीचे किस्से बनवून ,

आम्ही तुला खुप हसायचो आई...

सणासुदीला पाहिलेच नाही तुला कधी

सगळ्यांबरोबर बसून आनंद वाटून घेताना.

तू तर कायम स्वयंपाकघरातच असायचीस

काहीनाकाही तयारी करीत ...


तेंव्हा कायम मला वाटायचे

की तुला आयुष्य जगायचे कसे 

ते समजतच नाही आई

पण आता अनुभवते आहे मी

की जबाबदारीच्या छिद्रांमधून

गळून जातात सगळे हास्य विनोद


कधी वेळ काढून नटताना पाहिले नाही तुला,

चिडचिडच करीत राहिले मी

तुझ्या घाई आणि गडबडीवर,

कशी गरम कढईवर हात भाजून घेतेस अजून?

वाईट दिसतात ग त्या भाजल्याच्या खुणा हातावर..

पायांना भेगा पडल्या आहेत तुझ्या

थोडी तरी काळजी घे स्वत:ची

भाजी, भाजी कटर ने कापत नाहीस;

बोटांवरच्या त्या सुरीच्या खुणा

चांगल्या नाही वाटत...

बेंटेक्स वापरू नकोस ग...

तुझ्या या सगळ्या निष्काळजीपणावर बोलून

लाजवत होते मी तुला...


पण आता धुराच्यामधे उभे राहून काम करताना

समजायला लागले आहे सगळे

स्त्री हरवून बसते आपल्या जाणिवा, सौंदर्य, नटणे

आवडी निवडी आणि वय

आपल्या कुटुंबाचा आत्माच स्वत:त धारण करताना...

मी जेंव्हा ओल्या केसांनीच स्वयंपाकघरात शिरते

तुझ्यासारखीच वाटायला लागते अगदी

तुझ्यासारखीच टाळ्या वाजवून देवांना उठवते, 

तुझ्यासारखीच जागते...


सगळे ऋतू...

सणवारांची तयारी करत निघून जातात...

स्वयंपाकघर, गच्ची, आंगण सगळीकडे

फिरत रहाते काम उरकत

आणि संध्याकाळी थकल्यावर दमून गेल्यावर 

अगदी तुझ्यासारखी दिसायला लागते

डोळ्यांतून पाणी येईपर्यंत हसली आहे

असे आठवतच नाही किती दिवसांत...

तुझ्यासारखीच फिकट नि:सत्व झाली आहे मी पण आई


कोणी मैत्रिण तिच्या स्नेहाने जेंव्हा

माझ्या मनावर शिंपण घालते ना आई

क्षणभर त्या प्रेमात तूच दिसू लागतेस मला

तुला दुरावूनही कधी माझ्यात 

तर कधी जवळच्या नात्यांमधे 

तुला शोधत रहातेच मी आई...

माझी आई





 ___________________________________________________________________________________


अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.



ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com


____________________

______________________________________________________________________________________________________________________________________________________

फॉलोअर